Pages

▼

Monday, October 26, 2026

रब्बी हंगामातील पीक नियोजन व व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविद्वारा ८० वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक संपन्न; दुष्काळसदृश परिस्थितीत जलसंधारण व संशोधनाधारित तंत्रज्ञानाच्या प्रसारावर भर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाच्या सभागृहात दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी ८० वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची (रब्बी झेडआरईएसी - Rabi ZREAC) बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पीक नियोजन व व्यवस्थापनाला विशेष महत्त्व असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरूंनी केले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, जमिनीतील ओलावा संवर्धन, योग्य पीक पद्धतींचा अवलंब, कमी पाण्यात तग धरणाऱ्या पिकांची निवड, सूक्ष्म सिंचन पद्धती आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्रे आणि कृषि विभागाच्या विस्तार यंत्रणेने परस्पर समन्वयाने कार्य करून संशोधनाधारित शिफारशी व सुधारित कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मराठवाड्यातील उपलब्ध पाणीसाठा व जमिनीतील ओलाव्याची परिस्थिती लक्षात घेऊन पिकांची निवड करणे, पेरणीपूर्व नियोजन करणे, पावसाच्या खंडाच्या परिस्थितीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आणि सूक्ष्म सिंचनासारख्या तंत्रज्ञानाचा आवश्यकतेनुसार वापर करणे याबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीस विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री. महेश तीर्थकर (लातूर) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. याशिवाय विद्यापीठातील विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विस्तार अधिकारी तसेच कृषि शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन शीतल कांबळे व आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत पाटील यांनी केले.

बैठकीत रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन, पीक पद्धती, सुधारित कृषि तंत्रज्ञान, पीक संरक्षण, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, उत्पादनवाढ आणि बदलत्या हवामान परिस्थितीत पीक जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रे व विभागांमार्फत रब्बी हंगामासाठी विकसित करण्यात आलेल्या संशोधनाधारित शिफारशींचे सादरीकरण करण्यात आले. विविध पिकांच्या उत्पादनवाढीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान, पीक संरक्षणाच्या उपाययोजना आणि शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांनुसार तंत्रज्ञानाचा प्रसार याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच कृषि विज्ञान केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा आढावा घेण्यात आला. संशोधनातून विकसित झालेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रात्यक्षिके, शेतकरी प्रशिक्षण, पीक प्रात्यक्षिके आणि शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद यांसारख्या उपक्रमांना अधिक गती देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान कमी करून रब्बी हंगामातील उत्पादन टिकविण्यासाठी शास्त्रज्ञांनी स्थानिक परिस्थितीनुरूप तंत्रज्ञान व शिफारशींचा प्रसार करावा, तसेच कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्रांच्या समन्वयातून शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, हा या बैठकीतील चर्चेचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष ठरला.