Pages

Thursday, February 13, 2014

हवामान आधारीत जिल्‍हानिहाय व विभागनिहाय मुख्‍य पिक उत्‍पादनाचा अचुक अंदाज आला पाहीजे ..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

फसल योजनेची विभागीय आढावा बैठक संपन्‍न
फसलच्‍या विभागीय बैठकीच्‍या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ बालसुब्रमण्‍यम, डॉ व्‍ही जी मनियार, डॉ बी व्‍ही आसेवार, प्रा प्रल्‍हाद जायभाये आदी 
कृषि हवामानशास्‍त्र विषयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रबंधाचे सारांश पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले
फसलच्‍या विभागीय बैठकीत सहभागी शास्‍त्रज्ञासोबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगूरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ बी बी भोसले, डॉ बालसुब्रमण्‍यम, डॉ व्‍ही जी मनियार, डॉ बी व्‍ही आसेवार, प्रा प्रल्‍हाद जायभाये आदी 
*************************
देशाची अर्थव्‍यवस्‍था शेतीवर किंबहुना मान्‍सुनवर आधारीत असुन हवामान अंदाज वर्तविण्‍यात अधिक अचुकता आली पाहीजे, नजीकच्‍या काळात जिल्‍हानिहाय व विभागनिहाय मुख्‍य पिकांचा अंदाज कृषि हवामानशास्‍त्रज्ञांना देता आला पाहीजे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कृषि हवामानशास्‍त्र विभागातंर्गत कार्यरत असणा-या अवकाश कृषि हवामान व भुमी निरीक्षण आधारावर कृषि उत्‍पादनाचा अंदाज (फसल) प्रकल्‍पाच्‍या पश्चिम विभागाची विभागीय वार्षिक आढावा बैठकीच्‍या दि 12 फेब्रवारी रोजी समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते, याप्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, हवामानशास्‍त्र विभागाचे माजी प्रभारी अधिकारी प्रा डॉ व्‍ही जी मनियार, भारतीय हवामान विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ बालसुब्रमण्‍यम व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता तथा प्राचार्य डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणात पुढे ते म्‍हणाले की, मराठवाडयातील कापुस व रबी ज्‍वारी हे प्रमुख पिकांच्‍या उत्‍पादनाच्‍या दृष्‍टीने मान्‍सुन, तापमान व हवेतील आर्द्रता हया प्रमुख बाबी असुन हवामान – पीक मॉडेलचे विविध प्रकार व त्‍याआधारे पिक उत्‍पादनाचे अचुक अनुमान काढणे यासाठी शास्‍त्रज्ञांना प्रशिक्षीत करण्‍याची गरज आहे. जागतीक स्‍तरावरील हवामान बदल व शेतीवरील परिणाम पाहता कृषि पदवीधरांना या क्षेत्रात कार्य करण्‍याच्‍या मोठया व्‍यवसाय संधी आहेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
विस्‍तार शिक्षण संचालक यांनी आपल्‍या भाषणात हवामान व माती यांचा परिणामकारक वापर पीक उत्‍पादनात कसा होतो याबाबत मार्गदर्शन केले तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी हवामानाचा अचुक अंदाज शेतक-यांपर्यत त्‍वरीत पोहचविण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. याप्रसंगी शास्‍त्रज्ञ डॉ बालसुब्रमण्‍यम व डॉ बी बी भोसले यांनीही कृषि हवामानावरील आपले मत व्‍यक्‍त केले.
या प्रसंगी हवामानशास्‍त्र विभागाचे निवृत्‍त प्रभारी अधिकारी प्रा डॉ व्‍ही जी मनियार यांचा विद्यापीठाच्‍या  हवामानशास्‍त्र विभागाच्‍या उभारणीतील योगदानाबाबत कुलगुरू मा डॉ व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमात कृषि हवामानशास्‍त्र विषयाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांच्‍या संशोधन प्रबंधाचे सारांश पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले.
दिनांक 11 व 12 फेब्रवारी दरम्‍यान आयोजित या दोन दिवशीय बैठकीस गुजरात येथील आनंद, जुनागड, अहमदाबाद, नवसारी तसेच महा‍राष्‍ट्र राज्‍यातील पुणे, अकोला, दापोली व भारतीय हवामान विभागातील 18 शास्‍त्रज्ञांच्‍या चमुने सन 2013-14 वर्षातील आपआपल्‍या विभागातील जिल्‍हानिहाय संख्‍याशास्‍त्रीय समाश्रणीय आधारे तसेच संगणक प्रणाली समाश्रणीय पध्‍दतीने डीसॅट 4.5 मॉडेलव्‍दारे काढलेले पिकांचे अंदाज सादर केले. बैठकीचे आयोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली आयोजक हवामानशास्‍त्र विभागाचे प्रभारी अधिकारी डॉ बी व्‍ही आसेवार व प्रकल्‍प समन्‍वयक प्रा. प्रल्‍हाद जायभाये यांच्‍या पुढाकाराने यशस्‍वीपणे पार पाडले. बैठकीच्‍या यशस्‍वीतेसाठी प्रा मधुकर जाधव, प्रा अस्‍मान खोब्रागडे, श्री प्रमोद शिंदे, श्री गोटे, श्री बुचाले, डॉ महेश वाघमारे, श्री हनुमंत आहेर यांनी विशेष परिक्षम घेतले.