Pages

Wednesday, December 10, 2014

कृषि शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेतावरील संशोधन प्रात्‍यक्षिकावर भर दयावा...... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन
वनामकृवितील राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलुव्‍यासपीठावर यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवणसंशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेप्राचार्य डॉ डी एन गोखले आदी. 
********************************
देशात राजस्‍थान मध्ये सर्वात कमी पाऊस पडतो पंरतु त्‍या राज्‍यात एकाही शेतक-यांनी आत्‍महत्‍या केली नाही, कारण तेथे शेतीसोबत पशुपालनावर जास्‍त भर आहे. त्‍यामुळे मराठवाडयातील शेतीला पशुपालन, दुग्‍ध व्‍यवसाय, रेशीम उद्योग, शेळी-मेंढी पालन आदी शेती संलग्‍न व्‍यवसायाची जोड देणे अत्‍यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत एकात्मिक शेती पध्‍दती संशोधन प्रकल्‍प व कृषि विद्या विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १० ते १९ डिसेंबर दरम्‍यान उपजीवीकेच्‍या सुरक्षिततेसाठी एकात्मिक शेती पध्‍दती या विषयावर दहा दिवसीय राष्‍ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्‍यात आला असुन या प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते, व्‍यासपीठावर यावेळी शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्राचार्य डॉ डी एन गोखले यांची प्रमुख उपस्थिती उपस्थिती होती. 
    कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु उदघाटनपर भाषणात पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील कोरडवाहु शेती पदध्‍तीत फक्‍त कापुस व सोयाबीन या दोनच पिकांची मुख्‍यता लागवड होत आहे, यामुळे ही दोन पिके हातची गेली कि शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडत आहे तसेच दुष्‍काळ परिस्थित जनावरांच्‍या चाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे, यासाठी पिक पध्‍दतीत बदल करणे आवश्‍यक आहे. एकात्मिक शेती पध्‍दतीचा मुळ हेतु शेतीत कमीत कमी खर्च करून शेतीतील जोखिम कमी करणे व शाश्‍वत उत्‍पादन काढणे हा असुन त्‍यांची आजच्‍या परिस्थिती जास्‍त गरज आहे. विद्यापीठाने एकात्मिक पीक पध्‍दतीच्‍या विविध मोडयुलचे शेतक-यांच्‍या शेतावर संशोधन करावे. अल्‍पभुधारक जिरायत शेतक-यांच्‍या वर्षभराचा पिक लागवड पध्‍दती, रोजगार उपलब्‍धतता व जमाखर्च यांचासह संपुर्ण जीवनामानाचा अभ्‍यास विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी उपस्थित शास्‍त्रज्ञांना दिला.
   शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, राज्‍यातील कोरडवाहु शेतीच्‍या परिस्थितीला एकात्मिक शेती पध्‍दतीत हेच उत्‍तर असुन याचा विस्‍तार होणे आवश्‍यक आहे. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी प्रशिक्षणात सहभागी शास्‍त्रज्ञांनी एकात्मिक शेती पध्‍दतीतील विविध पैलुवर वि‍चारांची देवाण घेवाण करून शेतक-यांन पर्यंत योग्‍य संदेश घेऊन जाण्‍याचा सल्‍ला आपल्‍या भाषणात दिला तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतक-यांना जास्‍त उत्‍पन्‍न काढणा-या तंत्रज्ञानापेक्षा शाश्‍वत उत्‍पन्‍न देणा-या तंत्रज्ञानाची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन केले.
    कार्यक्रमात स्‍वागतपर भाषण प्राचार्य डॉ डी एन गोखले यांनी तर प्रास्‍ताविक प्रमुख शास्‍त्रज्ञ तथा प्रशिक्षण समन्‍वयक डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ के टि जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्‍वयक प्रा डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, वि‍भाग प्रमुख, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
   या दहा दिवसीय प्रशिक्षणात कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आदींसह राज्‍यातील कृषि विद्यापीठे व कृषि संबंधीत संस्‍थामधील शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक सहभागी झाले असुन एकात्मिक शेती पध्‍दती, शेतीसंलग्‍न व्‍यवसायांची योग्‍य सांगड, शेतीतील उपलब्‍ध संसाधनाचा योग्‍य वापर, शेतकरी कुटुंबास वर्षभर रोजगार उपलब्‍धतता, शाश्‍वत उत्‍पादन आदी बाबीसंबंधी विविध विषयावर शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.