Pages

Thursday, December 11, 2014

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ देणार शेतक-यांना - ‘उमेद’

मराठवाडयातील निवडक गावांत करणार उपक्रमाव्‍दारे प्रबोधन
परभणी, ता. ११ : मराठवाडा विभागातील दुष्‍काळी परिस्थितीमुळे खचलेल्‍या शेतक-यांना धीर, जगण्‍याचं बळ देण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातर्फे उमेद हा उपक्रम राबविला जाणार असुन कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या संकल्‍पनेतुन कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी करण्‍यात आली आहे. येत्‍या दोन महिन्‍यात मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात प्रत्‍येक तालुक्‍यातील किमान दोन गावांत उपक्रम राबविला जाणार असुन साधारणत: दिडशे पेक्षा जास्‍त गावात पोहचण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न राहणार आहे. मराठवाडा विभागात उदभवलेल्‍या दुष्‍काळी परिस्थितीमुळे काही शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहेत. शेतक-यांमध्‍ये आलेली नैराश्‍याची भावना दुर करून त्‍यांना जगण्‍याचे बळ देण्‍यासाठी गावात जाऊन जागृतीचा प्रयत्‍न होणार आहे. दुष्‍काळामुळे आलेले नैराश्‍य दूर करण्‍यासाठी प्रयत्‍नांचा भाग म्‍हणुन उमेद हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. कृषि विद्यापीठातंर्गत विभागीय विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता, कृषि विज्ञान केंद्र, सर्व घटक महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक, विविध संशोधन केंद्रे, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
सदरिल गावात शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या फेरीव्‍दारे शास्‍त्रज्ञ व राष्‍ट्रीय सेवा योजनेचे स्‍वयंसेवक घोषवाक्‍यांच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांचे प्रबोधन केले जाणार असुन चर्चासत्रात सद्यपरिस्थितीत काही भागात उभी असलेली रब्‍बी पीकांचे व्‍यवस्‍थापन,  दुष्‍काळी परिस्थितीत चारा व्‍यवस्‍थापन, काळानुरूप बदलावी लागणारी पीक पध्‍दती, जनावरांची निगा व देखभाल, मृद व जलसंधारणाचे उपाय, आधुनिक सिंचन पध्‍दती, शाश्‍वत उत्‍पन्‍नासाठी शेतीपूरक उद्योग तसेच स्‍थानीक परिस्थिती लक्षात घेऊन विद्यापीठाने विकसित केलेले कमी खर्चाचे तंत्रज्ञान आदी विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. कोणतीही औपचारीकता न पाळता अतिशय साधेपणाने हा उपक्रम पार पाडण्‍यात यावा, असे निर्देश कुलगुरू यांनी दिले असुन विस्‍तार शिक्षण संचालकनालयातर्फे या उपक्रमाची आखाणी करण्‍यात आली आहे. लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्‍याचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सांगितले.