Pages

Sunday, April 12, 2015

भारतीय राज्‍यघटना भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दिलेली एक अजोड देणगी ...शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वनामकृवित भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिका

सामाजिक आणि आर्थिक अडचणीवर मात करुन भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्‍च शिक्षण पुर्ण केले व भारत देशाची राज्‍यघटनेची निर्मिती केली, ही राज्‍यघटना म्‍हणजे जगाला दिलेली एक अजोड देणगी आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले.    

  कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्‍मा ज्‍योतिबा फुले यांच्‍या संयुक्‍त जयंती निमित्‍त अठरा तास अभ्‍यासमालिकेचे आयोजन दिनांक ११ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, या कार्यक्रमाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. पि. आर. झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थीदशेत अठरा तास अभ्‍यास करीत होते. त्‍यांना अन्‍नापेक्षा ज्ञानाची भुक महत्‍वाची होती, त्‍यामुळेच भारतीय राज्‍यघटनेची निर्मिती ते करु शकले. त्‍यांच्‍या जीवनचरित्रापासुन विद्यार्थ्‍यांनी प्रेरणा घेवुन आपला जास्‍तीत जास्‍त महाविद्यालयीन वेळ हा अभ्यासासाठी द्यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम मंत्रे यांनी केले. अठरा तास अभ्‍यासवर्गाच्‍या उपक्रमात कृषि महाविद्यालयाचे तीनशे विद्यार्थी व विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. व्हि. एस. खंदारे, डॉ. जयश्री एकाळे, प्रा. आशिष बागडे, प्रा. अनिल कांबळे, प्रा. विशाल अवसरमल, प्रा. ए. एम. खोब्रागडे, प्रा. वैशाली भगत, डॉ. जी. पी. जगताप आदिसह विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्‍यापक व कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.