Pages

Sunday, April 5, 2015

वनामकृविच्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयामध्‍ये निरोप समारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयावतीने दि ३१ मार्च रोजी आयोजीत निरोप समारंभात अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यींना निरोप देण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील, सह्योगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, विविध विभागाचे विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
करियर म्‍हणुन कोठेही काम करतांना सदैव प्रामाणिक काम करा व दुस-यास मदत करण्‍यास सदैव तत्‍पर रहा, असा संदेश कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करतांना दिला. कृषि महाविद्यालयातील चार वर्षाच्‍या कार्यकाळात आपणात मोठा आत्‍मविश्‍वास प्राप्‍त झाला असुन त्‍याचा भावी काळात निश्चित उपयोग होईल, असे मत शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी आपल्‍या भाषणात व्‍यक्त केले. 
याप्रसंगी अनुभवतुन शिक्षण कार्यक्रमातंर्गत आयोजीत करण्‍यात आलेल्‍या कृषि प्रदर्शनात उत्‍कृष्‍ट कार्य केल्‍याबाबत दुग्ध उत्‍पादन केंद्रास प्रथम, अंळबी उत्‍पादन युनिटला व्दितीय तर रेशीम उत्‍पादन केंद्रास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मान्‍यवरांच्‍या हस्‍ते देऊन गौरविण्‍यात आले तर रासेयोच्‍या विशेष शिबीरात रक्‍तदान केलेल्‍या विद्यार्थ्‍यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुष्‍पगुच्‍छ देऊन कौतुक करण्‍यात आले. विद्यार्थीनी कु आधीरा हीने कार्यक्रमात कथ्‍थकनृत्य सादर केले.
कार्यक्रमात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ विलास पाटील यांनीही मार्गदर्शन केले तसेच अंतिम सत्राचे विद्यार्थी मनिषा दहे, प्रविण तिडके यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात सह्योगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले यांनी विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या तर सुत्रसंचालन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी सहाव्‍या सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी, प्राध्‍यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.