Pages

Saturday, April 4, 2015

लोहगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर संपन्न

रासेयोच्‍या स्‍वयंसेवकांनी उमेद अतंर्गत मौजे लोहगांव येथे प्रभातफेरी काढुण जागर केला
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय गृहविज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दिनांक २४ मार्च ते ३० मार्च दरम्‍यान मौजे लोहगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरांतर्गत मृद व जलसंधारण, बेटी बचाव, दारूबंदी, स्वच्छता मोहीम, कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग, महिला आर्थिक स्वावलंबन, ज्ञानेश्वरीच्या निवडक गाथांमधून सामाजिक प्रबोधन, रक्तदान शिबीर आदी विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच दुष्‍काळसदृश्‍य परिस्थितीस धैर्याने तोंड देण्‍यासाठी शेतकरी बांधवाना धीर देण्‍यासाठी उमेद कार्यक्रमातंर्गत स्‍वयंसेवकांनी गावात प्रभातफेरी काढुन जागर केला तर रक्‍तदान शिबीरात ३५ स्‍वयंसेवकांनी रक्‍तदान केले, या उल्‍ले‍खनिय कार्याबाबत जिल्‍हा आरोग्‍य रूग्‍नालयाव्‍दारे मानचिन्‍ह देऊन विद्यापीठास गौरविण्‍यात आले.
या शिबीराची सांगता दि ३० मार्च रोजी प्राचार्य डॉ. विलास पाटीलप्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांच्‍या प्रमुख उपस्थिती झाली. यावेळी प्राचार्य डॉ. विलास पाटीलप्राचार्य डॉ. उदय खोडके व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण कथाकथनकार राजेंद्र गहाळ यांनी त्यांच्या विनोदी शैलीतून केलेल्या मार्गदर्शनातून स्वयंसेवकाना सामाजिक आरोग्य जपण्याबद्दलची शिकवण दिली.
शिबिराच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. रवींद्र शिंदे, प्रा. ए एम कांबळे, प्रा. विजय जाधव, प्रा. एस. पी. सोळंके, प्रा. विना भालेराव, हनुमान गरुड आदींसह रासेयोचे स्‍वयंसेवक व स्‍वयंसेवीकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास लोहगावचे सरपंच शिवानंद पाटील, जि.प. माजी सदस्य सखारामजी देशमुख, तानाजी भोसले आदींचे सहकार्य लाभले.
रक्‍तदान शिबीर