Pages

Monday, June 1, 2015

वनामकृविच्‍या २७ शिफारशींना संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता

वनामकृविच्‍या २०१४-१५ सालातील संशोधन कार्याची फलश्रुती
महाराष्‍ट्रातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यत पोहोचविण्‍यासाठी महत्‍वाचा टप्‍पा मानल्‍या जाणा-या संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास समितीची ४३ वी बैठक राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्‍मा फुले विद्यापीठात दिनांक २८ ते ३० मे या कालावधीत संपन्‍न झाली. तीन दिवस चाललेलया शास्‍त्रज्ञांच्‍या या बैठकीत राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांच्‍या विविध शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठच्‍या एकुण २७ शिफारशींना मान्‍यता देण्‍यात आली असुन यात  विविध पीकांची पाच वाण, एक शेती यंत्र आणि इतर २१ पीक उत्‍पादक तंत्रज्ञानावर आधारीत शिफारशी पारित करण्‍यात आल्‍या आहेत.
खरीप ज्‍वारीचा एसपीएच-१६४१ वाणास मान्‍यता
वनामकृविने विकसित केलेल्‍या खरीप ज्‍वारीचा एसपीएच-१६४१ हा संकरीत वाण महाराष्‍ट्र राज्‍यातील खरीप ज्‍वारी लागवडीखालील क्षेत्रासाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली. हा वाण तुल्‍य वाणांपेक्षा उत्‍पादनात सरस आढळुन असुन काळी बुरशी, खोड माशी व खोड किडीस प्रतीकारकक्षम आहे.



भाताच्‍या पीबीएनआर ०३-२ वाणास मान्‍यता
या पेरसाळ वाणाचे पराग व आविष्‍कार या तुल्‍य वाणांपेक्षा अधिक उत्‍पादन व दाण्‍यांचा आकार लांबट असल्‍यामुळे या वाणाची मराठवाडा विभागामध्‍ये ओलीताखाली पेरसाळीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.

अमेरिकन कपाशीच्‍या एनएच-६३५ वाणास मान्‍यता
अमेरिकन कपाशीचा एनएच-६३५ हा सरळ वाण अधिक उत्‍पादन देणारा असुन धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता, रस शोषण करणा-या किडी, अल्‍टरनेरीया व जीवाणुजन्‍य करपा या रोगांना सहनशील असल्‍याने महाराष्‍ट्र राज्‍यात कोरडवाहू लागवडीसाठी प्रसारीत करण्‍याची शिफारस मान्‍य करण्‍यात आली.




अमेरिकन कपाशीच्‍या एनएचएच-२५० वाणास मान्‍यता
अमेरिकन कपाशीच्‍या एनएचएच-२५० हा संकरीत वाण अधिक उत्‍पादन देणारा असुन धाग्‍याची उच्‍च गुणवत्‍ता, रसशोषण करणा-या किडी, अल्‍टरनेरीया व जीवानुजन्‍य करपा या रोगांना सहनशील असल्‍याने महाराष्‍ट्र राज्‍यात कोरडवाहु लागवडीसाठी प्रसारित करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.


परभणी मिरची पीबीएनसी-१
परभणी मिरची पीबीएनसी-१ हा वाण हिरव्‍या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादनासाठी मराठवाडा विभागामध्‍ये खरीप हंगामासाठी प्रसारीत करण्‍यात आला.




बैलचलित खत पसरणी यंत्र
वनामकृवि विकसित बैलचलित खत पसरणी यंत्राची शेणखत व तत्‍सम खते पसरविण्‍यासाठी व ५०० किलो क्षमता असलेली बैलगाडी म्‍हणुन प्रसरणासाठी शिफारस करण्‍यात आली.



या व्‍यतिरीक्‍त पीक उत्‍पादन तंत्रज्ञानावर आधारीत इतर २१ शिफारशी मान्‍य झाल्‍या

सौजन्‍य
डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, संशोधन संचालक
डॉ. दिगंबर पेरके, संशोधन उपसंचालक
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

पीक उत्‍पादन तंत्रज्ञानावर आधारीत इतर २१ शिफारशी त्‍या पुढील प्रमाणे
१.   कोरडवाहु अमेरिकन नॉन बीटी कपाशीच्‍या अधिक उत्‍पादनासाठी आणि चांगल्‍या प्रतीसाठी शिफारस केलेली मात्रा प्रती हेक्‍टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्‍फुरद, ४० किलो पालाश आणि १.५ टक्‍के म्‍युरॅट ऑफ पोटॅशच्‍या दोन फवारण्‍या पहिली बोंडे धरतेवेळी म्‍हणजे पेरणीनंतर ७० दिवसांनी आणि दुसरी फवारणी भरपूर बोंडे असतेवेळी म्‍हणजे पेरनीनंतर ८५ दिवसांनी करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
२.   उथळ, हलक्‍या व मुरमाड जमीनीची सुपीकता आणि उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी तळ्याचा १५० सेंमी खोलीपर्यंतचा वरचा गाळाचा थर, तळ्याच्‍या वरच्‍या भागातील गाळाचा प्रथमत: उपयोग करावा. त्‍यानंतर मधल्‍या भागातील गाळ उपयोगात आणावा अशी शिफारस करण्‍यात आली.
३.  सोयाबीन – गहू पीक पध्‍दतीत अधिक धान्‍य उत्‍पादन, धान्‍याची उत्‍तम प्रत, जमीन सुपीकता निर्देशांकात सुधारणा व जास्‍त आर्थिक फायद्यासाठी सोयाबीन पिकास शिफारस केलेल्‍या खत मात्रेसह (३०:६०:३० नत्र, स्‍फुरद, पालाश किलो प्रती हेक्‍टरी) द्रवरुप रायझोबियम व स्‍फुरद विद्राव्‍य जिवाणु खत प्रत्‍येकी दहा किलो बियाण्‍यास ५० मिली तसेच गहू पिकास शिफारस केलेल्‍या खत प्रत्‍येकी मात्रेसह (१२०:६०:६० नत्र, स्‍फुरद, पालाश किलो प्रती हेक्‍टरी) द्रवरुप अॅझोटोबॅक्‍टर व स्‍फुरद विद्राव्‍य जिवाणु खत प्रत्‍येकी दहा किलो बियाण्‍यास 100 मिली पेरणीपुर्वी बीज प्रक्रिया करावी अशी शिफारस करण्‍यात येते.
४.    मराठवाड्यातील मध्‍यमखोल काळ्या चुनखडीयुक्‍त जमिनीत चिकुच्‍या कालीपती या वाणाची अधिक वाढ व आर्थिकदृष्‍टया किफायतशीर उत्‍पादनासाठी लागवडीच्‍या पहिल्‍या वर्षी प्रत्‍येक झाडाला १५ किलो शेणखत, ०.३ कि. नत्र, ०.१५ कि. स्‍फुरद व ०.१५ कि. पालाश द्यावे. तसेच प्रत्‍येक वर्षी ५ कि. शेणखत, ०.१ कि. नत्र, ०.०५ कि. स्‍फुरद व ०.०५ कि. पालाश प्रती झाड बारा वर्षापर्यंत वाढवावे व तद्नंतर प्रत्‍येक झाडाला ७० कि. शेणखत, १.४ मि. नत्र, ०.७ कि. पालाश देण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
५. हळदीचे अधिक उत्‍पादन, आर्थिक फायदासाठी व पाणी वापर क्षमतेसाठी हळद पिकाची गादीवाफ्यावर ४५ x १५ सेमी जोडओळीमध्‍ये लागवड करुन एक दिवसाच्‍या खंडाने एकत्रीत बाष्‍पीभवनाच्‍या ५० टक्‍के प्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्‍याची शिफारस करण्‍यात येते. एक मीटर लांबीच्‍या, पायथ्‍याची रुंदी १५० सेंमी. व माथ्याची रुंदी ०.९ मीटर असलेल्‍या गादीवाफ्यासाठी पाण्‍याची मात्रा ठरविण्‍याकरीता पुढील सुत्राचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली,
    क्ष (लिटर) = ०.४५ + दोन दिवसाचे एकत्रित बाष्‍पीभवन (मि.मी.)
६.      मराठवाडा विभागातील ओलीत पेरसाळीचे अधिक उत्‍पादन व आर्थिक फायद्यासाठी ३५ किलो प्रती हेक्‍टर बियाणे वापरण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
७.  हळद पिकातील प्रभावी तण नियंत्रणासाठी व अधिक आर्थिक फायद्यासाठी पीक उगवणीपुर्वी मेट्रीब्‍युझीन ७० टक्‍के डब्‍लू, पी. ०.७ कि. क्रियाशील घटक प्रती हेक्‍टरीचा वापर, लागवडीनंतर ९ आठवड्यांनी काडाचे आच्‍छादन १० टन प्रती हेक्‍टरी व लागवडीनंतर १२ आठवड्यांनी एक खुरपणी करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
८.   मराठवाडा विभागातील ओलीत पेरसाळीचे अधिक उत्‍पादन, निव्‍वळ आर्थिक फायदा व तण नियंत्रण क्षमतेसाठी पेरणीनंतर परंतु पीक उगवण्‍यापुर्वी पेंडीमिथॅलीन (३० ईशी) तणनाशकाची १ किलो ग्रॅम क्रियाशील घटक प्रती हेक्‍टरसाठी किंवा ब्‍युटॅक्‍लोर (५० ईशी) तणनाशकाची १.५ किलो क्रियाशील घटक प्रती हेक्‍टरसाठी व तद्नंतर १५ ते २० दिवसानंतर बायस्‍पीरीबॅक सोडियम (१० टक्‍के एससी) तणनाशकाची @ ३५ ग्रॅम क्रिशाशील घटक प्रती हेक्‍टरसाठी फवारणी करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
९.    तणांचा प्रादुर्भाव कमी करुन बीटी कपाशीच्‍या अधिक व फायदेशीर उत्‍पादनासाठी पायरीथायोबॅक सोडियम ६२.५ ग्रॅम क्रियाशील घटक प्रती हेक्‍टर + क्‍युझॉलफॉपइथाईल ५० ग्रॅम क्रियाशील घटक प्रती हेक्‍टर या प्रमाणात तणनाशकांची तणे २ ते ४ पानांच्‍या अवस्‍थेत असतांना उगवणी पश्‍चात (फवारणीच्‍या वेळी एकत्र मिसळुन) फवारणी व ४५ दिवसांनी कोळपणी करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
१०.  म्‍हशीच्‍या ३ टक्‍के स्निग्‍धांश असलेल्‍या दुधापासुन खवा करण्‍याच्‍या रबडी अवस्‍थेमध्‍ये दुधाच्‍या १ टक्‍के या प्रमाणात व्‍हे प्रोटिन कॉन्‍सन्‍ट्रेट (डब्‍ल्‍यू.पी.सी.) मिसळुन कमी स्निग्‍धांश असलेला खवा तयार करण्‍याच्‍या तंत्राची शिफारस करण्‍यात आली.
११.  फल्‍युरोसंट डूअल-लेबेल्‍ड तंत्रावर आधारीत वनामकृवि अल्‍ट्राडीटेक्‍ट सन-एबी कीटचा वापर सुर्यफुल पिकामधील संक्रमित बीज, पाने, माती व बुरशीजन्‍य जनुकीय नमुन्‍यातील अल्‍टरनेरिया करपा (अल्‍टरनेरिया हेलिअन्‍थी) या रोगाचे जलद, विश्‍वासार्ह, अचुक व सहज पध्‍दतीने निदान करण्‍यासाठी शिफारस करण्‍यात आली.
१२.  उत्‍तम प्रतीचे निर्जलित केळी काप बनविण्‍यासाठी परिपक्‍व, ग्रॅड नाईन जातीच्‍या केळीच्‍या चकत्‍या ०.५ टक्‍के अॅस्‍कॉर्बिक आम्‍ल व ३ टक्‍के मीठाच्‍या द्रावणात १० मिनीटे ठेवुन, कॅबीनेट ड्रायरमध्‍ये (६०0 सें.ग्रे. तापमानात) ८ तास वाळविण्‍याची शिफारस करण्‍यात येत आली.
१३. ज्‍वारी आणि ज्‍वारी-नाचणीचे पापड बनवण्‍यासाठी परभणी मोती या वाणाची तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विकसीत केलेल्‍या तंत्रज्ञानाची शिफारस करण्‍यात आली.
१४. उत्‍तम प्रतीची चिंचेची पोळी तयार करण्‍यासाठी ०.५ टक्‍के गवार डिंकाचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
१५.  वनामकृवी विकसीत, भरड धान्‍य आधारीत, पोषक, बहुउद्देशीय, स्‍वस्‍त इंस्‍टंट मिश्रणाचा फराळाचे विविध खारे (चकली, धपाटे, खारारापारा, पुरी, शेव, खारे बिस्‍कीट) आणि गोड (गडगीळ, खीर, शक्‍करपारा, गोड बिस्‍कीट) पदार्थ तयार करण्‍यासाठी वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
१६.  शेतीतील हाताने करावयाचे खत पेरणी कार्य सुकर करण्‍यासाठी वनामकृवि विकसीत सुलभा बॅगचा उपयोग करण्‍यात यावा अशी शिफारस करण्‍यात आली.
१७. जून महिन्‍यातील केळी लागवडीसाठी करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात व जास्‍त केळी उत्‍पादन मिळण्‍यासाठी केळी पिकाची लागवड १.५ मी. x २.१ मी. अंतरावर तसेच शिफारशीत खत मात्रेसोबत ५० टक्‍के अधिक पालाश मात्रा देण्‍याची शिफारस मराठवाडा विभागासाठी करण्‍यात येत आली.
१८. बीटी कपाशीच्‍या कायिक वाढ अवस्‍थेतील हवामान आठवड्यात जेंव्‍हा केंव्‍हा किमान तापमान १६.२९0 सें. पेक्षा जास्‍त राहते, तेंव्‍हा तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून येण्‍याचा अंदाज वर्तविण्‍या-या वनामकवि विकसीत सुत्राची (J48 decision tree based) मराठवाडा विभागासाठी शिफारस करण्‍यात आली.
१९. जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्‍ह्यांसाठी भुपृष्‍ठीय निचरा प्रणालीचे आरेखन करण्‍याकीरता वनामकृवि विकसीत निचरा गुणांकाचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
२०. पर्जन्‍यमानाची आकडेवारी वापरुन सुलभरित्‍या निचरा गुणांक काढण्‍यासाठी वनामकृविसीडीएस संगणक आज्ञाप्रणालीचा वापर करण्‍याची शिफारस करण्‍यात आली.
२१. शेतक-यांच्‍या तांत्रिक व आर्थिक उन्‍नतीकरिता विस्‍तार यंत्रणामार्फत (कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, निमशासकीय संस्था) विविध अधिक मुल्‍य असलेल्‍या पिकांमध्‍ये व विविध गांवामध्‍ये पिकनिहाय शेतक-यांचे गट स्‍थापन करण्‍यात यावेत अशी शिफारस करण्‍यात आली.