Pages

Saturday, June 6, 2015

जमीनीचे आरोग्य तपासणीसाठी माती परीक्षण गरजेचे.......आमदार मा मोहनराव फड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग मार्फत व रामेटाकळी ग्रामपंचायत यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १ जुन रोजी माती परीक्षण शिबीर व शेतकरी मेळाव्‍याचे रामेटाकळी येथे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी आमदार मा श्री मोहनराव फड हे होते तर विभाग प्रमुख डॉ विलास पाटील, डॉ हरिहर कौसडीकर, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आमदार मा श्री मोहनराव फड मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, माती परीक्षण म्‍हणजेच जमीनीचे आरोग्‍य तपासणी असुन प्रत्‍येक शेतक-यांनी माती परिक्षण करूनच खरिप पीकांचे नियोजन करावे, विद्यापीठाच्‍या फिरत्‍या माती परीक्षण प्रयोगशाळेच्‍या माती परीक्षण उपक्रम शेतक-यांसाठी अत्‍यंत उपयुक्‍त असुन शेतक-यांनी याचा लाभ घ्‍यावा. विभाग प्रमुख तथा मृदाशास्‍त्रज्ञ डॉ. विलास पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माती परीक्षण ही शेतक-यांची एक मुलभूत गरज असुन याच्‍या आधारेच पिकांना एकात्मिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन करावे. जमिनीच्‍या आरोग्‍याचे महत्‍व स्‍पष्‍ट करून शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन माती परीक्षण उपक्रमाबद्ल सविस्‍तर मार्गदर्शन केले तर डॉ. हरिहर कौसडीकर यांनी पिक पोषण व सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍‍थापनाबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी फिरती माती प्रयोगशाळे तर्फे रामेटाकळी परीसरातील शेतक-यांचे १५० मातीचे नमुने गोळा करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मृद विज्ञान विभागातील पर्यवेक्षक जावेद जानी, पदव्‍युत्‍तर विदयार्थी फुलमाळी, जाधव, खोकले, शिनगारे तसेच रामेटाकळी ग्रामस्‍थ कापसे, रामराव कदम, स्‍वामी गिरी यांनी परिश्रम घेतले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.