Pages

Sunday, July 19, 2015

आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा बाभुळगांव येथे संपन्‍न

मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत मौजे बाभुळगाव (ता. जि. परभणी) येथे दि. १६ जुलै रोजी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा घेण्‍यात आला. मेळाव्‍यात शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे व डॉ जी के गायकवाड यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सदयस्थितीत पडलेल्‍या पावसाच्‍या खंडामुळे पिकांना पाण्‍याचा ताण पडला असुन शेतात पडलेल्‍या भेगांसाठी हलकी कोळपणी करावी तसेच शेतात असलेला काडीकचरा किंवा सोयाबीनचा भुसा पिकात आच्‍छादन म्‍हणुन वापरावा, शक्‍य असेल तर पाण्‍याची फवारणी करावी. आर्थिक स्‍थैर्यासाठी शेतक-यांना शेती पुरक जोडधंद्या करण्‍याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले. मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. जी. के. गायकवाड यांनी शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्‍य महत्‍वाचे असुन हवामान बदलामध्‍ये सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच त्‍यांनी कपाशी, सोयाबीन या पिकांमध्‍ये खत व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. जमिनीत ओल असल्‍याशिवाय कोरडवाहू कपाशीला नत्र खताची मात्रा देऊ नये, जर पाण्‍याची सोय असल्‍यास हलके पाणी देऊनच खताची मात्रा दयावी. जेथे जमिनीत ओलावा नाही तेथे पोटॅशीयम नायट्रेट १ ते १.५ टक्‍के पाण्‍यात मिसळुण फवारणी करावी. पोटॅशियममुळे पिकात पाण्‍याचा ताण सहन करण्‍याची क्षमता निर्माण होते व पीक कीड- रोगांना कमी प्रमाणात बळी पडते, असा असे त्‍यांनी सां‍गितले.
  विद्यापीठाने वितरीत केलेल्‍या पोटॅशीयम नायट्रेट व आच्‍छादनाचा वापराबाबत माणीक संमीद्रे यांनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे माहिती दिली तर प्रगतशील शेतकरी गिरीष पारधे यांनी विहीर पुनभरण व आंतरपिक पध्‍दती याबाबत आपले अनुभव सांगितले. सुत्रसंचालन सारीका नारळे यांनी तर आभार प्रदर्शन माणीक समीद्रे यांनी केले. मेळावास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल मेळावा मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला तर मेळावा यशस्‍वतीतेसाठी प्रा. मदन पेंडके, डॉ मेघा जगताप, श्री. पिंगळे आदीसह ग्रामिण कृषि कार्यानुभव उपक्रमाच्‍या विद्यार्थीनी सहकार्य केले.
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड

शेतकरी बांधवांनी सद्यस्थितीत तातडीच्‍या उपायांमध्‍ये पुढील बाबींचा अवलंब करण्‍याचे अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने सुचविले आहे.
(१) पाण्‍याची उपलब्‍धता असल्‍यास तुषार सिंचन पदधतीचा अवलंब करून पाणी दयावे. सकाळी किंवा सायंकाळी वा-याचा वेग कमी असतांना पाणी दयावे.
(२) हलक्‍या कोळपण्‍या करून पिकाला मातीची भर दयावी. जमिनीला पडलेल्‍या भेगा बुजवुन घ्‍याव्‍यात. जेणेकरून ओलावा टिकवुन ठेवणे, पाण्‍याचे बाष्‍पीभवन कमी करणे शक्‍य होईल.
(३) फवारणीतुन अन्‍नद्रव्‍ये दयावेत उदा. पोटॅशियम नायट्रेट १०० ते १५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळुन क्षमता निर्माण होईल.
(४) सध्‍या पाण्‍याची फवारणी केल्‍यानेही पिके नत्र धरून राहतील यासाठी सकाळी किंवा सायंकाळी फवारणी पंपात साधे, स्‍वच्‍छ पाणी घेउन त्‍याची पिकावर फवारणी करावी.
(५) केओलीन या बाष्‍परोधकाची विशेषतः कपाशीसारख्‍या पिकावर ७ टक्‍के ७०० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
(६) कमी भेगावर,छोटे शेतकरी किंवा मजुरांची उपलब्‍धता असल्‍यास मोठे शेतकरीही आच्‍छादनाचा वापर करू शकतात. यात सोयाबीन, भात, गहू यांचा भुसा / काड किंवा गिरीपुष्‍प, सुबाभुळ यांचा पाला ३ ते ५ टन हेक्‍टरी यांचा आच्‍छादन म्‍हणुन वापर करावा.
(७) तणाव्‍दारे पिकांना अन्‍न्‍द्रव्‍ये व पाणी यांस मोठी स्‍पर्धा होते. यासाठी त्‍वरीत कोळपणी, खुरपणी द्वारे तण नियंत्रणकरावे. तसेच सोयाबीन पिकामध्‍ये जमिनीत ओल आहे तेथे इमॅझिथॅपायर या तणनाशकाची एकरी ३०० मिली या प्रमाणे तण २ ते ४ पानांवर असतांना फवारणी करावी.
(८) कपाशी पिकामध्‍ये तण नियंत्रणासाठी कोळपणी, खुरपणीसह तणनाशकांचा वापर करावा. जमिनीत ओल असल्‍यास क्‍युनॉलफॉस इथाईल २०० मिली अधिक पायरीथायोबॅक सोडीयम २५० मिली प्रति एकरी एकत्र करून तणे २ ते ४ पानांवर असतांना फवारणी करावी.
(९) पेरनीनंतर ३० दिवसांनी सोयाबीन, मुग, उडीद यांन प्रत्‍येक चार तर कपाशी, तुर या प्रत्‍येक किंवा दोन ओळी नंतर उथळ चर काढाव्‍यात.  यामुळे जल संधारण व निचरा दोन्‍ही होईल.
(१०) २० जुलै नंतर कपाशीची लागवड टाळावी, यापुढे पाउस झाल्‍यास सोयाबीन, बाजरी, तुरृ सुर्यफुल, एरंडी, धने या सांरखी पिके तर सोयाबीन + तुर (४:२), बाजरी + तुर (४:२), एरंडी + धने या आंतरपिक पध्‍तीचा अवलंब करावा. पेरणी योग्‍य पाउस झाल्‍यानंतरच पेरणी करावी. बीज प्रक्रिया केल्‍या शिवाय पेरणी करू नये. पेरणीसाठी योग्‍य अंतर व हेक्‍टरी बियाण्‍यांचा वापर करावा. सेंद्रिय खते, जिवाणु खते, मित्र बुरशी संवर्धनांचा वापर करावा. पेरणी करतांना सरी वरंबे किंवा रूंद वरंबासरी पदध्‍तीचा अवलंब करावा.
(११) सोयाबीन पिकांत उंट अळीचा प्रादूर्भाव आढळुण येत आहे. त्‍यासाठी निंबोळी अर्क ५ टक्‍के किंवा बिव्‍हेरीया बॅसीयाना ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुण फवारणी करावी. पीक संरक्षणासाठी पीक थांबे, विविध चिकट सापळे, सापळा पिके, निंबोळी अर्क या कमी खर्चाच्‍या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
(१२) कपाशी पिकात रसशोषण करण्‍याचा किंडीच्‍या नियंत्रणासाठी असीटामेप्रीड ४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळुण फवारणी करावी.
(१३) तातडीच्‍या उपायासोबतच दिर्घकालीन उपायाकडेही लक्ष दयावे. उदा. मृद व जलसंधारण, गावामध्‍ये व्‍यापक प्रमाणात बीजोत्‍पादन कार्यक्रम व्‍यापक प्रमाणात सेंद्रिय खत निर्मितीएकत्रित निविष्‍ठांची खरेदी व उत्‍पादनांची विक्री, प्रत्‍येक घरामध्‍ये शेती जोडधंदे उदा. दुग्‍धव्‍यवसाय, शेळीपालन, रेशीमउदयोग आदी समावेश असावा.