Pages

Saturday, July 18, 2015

सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग मराठवाडयातील शेतक-यांसाठी सुवर्णसंधी.....शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात सोयाबीन प्रक्रिया लघुउद्योगावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
कार्यशाळेत प्रशिक्षण घेतांना शेतकरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाव्‍दारे सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग’’ या विषयावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दि. १६ जुलै रोजी एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळाचे उद्घाटन शिक्षण संचालक तथा आधिष्ठाता डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले तर हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ उद्य खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील सोयाबीनचे क्षेत्र वाढत असुन शेतक-यांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी सोयाबीनवर आधारित लघुउद्योगाचा विकास होणे गरजेचे आहे. मराठवाडयातील शेतक-यांसाठी सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग ही सुवर्णसंधी असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याबाबत तांत्रिक मदत करण्‍यास तत्‍पर असल्‍याचे ते म्‍हणाले.
प्रमुख पाहुणे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने यांनी आपल्‍या भाषणात सोयाबीन प्रक्रीया लघुउदयोग उभारण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी मराठवाड्यातील सोयाबीनचे महत्व व प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री व्यवस्था यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी सोयाबीनचे तेलाव्यतिरिक्त इतर उदयोगाबाबत मा‍हीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुमंत जाधव यांनी केले. कार्यशाळेत तोंडापूर (जि हिंगोलीयेथील कृषी विज्ञान केंद्रांनी स्थापन केलेल्या शेतकरी गटातील अनेक शेतकरी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग उभारण्याचा मानस व्यक्त केला. तांत्रिक चर्चासत्रात सोया दुध, सोया पनीर व सोयाआधारित इतर लघूउदयोगाच्या तंत्रज्ञानाबद्दल डॉ.स्मिता खोडके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी कृषि प्रक्रिया विभागाचे प्रा. प्रमोदिनी मोरे, श्री. शिवणकर, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वनामकृवि अंतर्गत असलेले सोयबीन प्रक्रिया केंद्रहे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन आणि विस्तार केंद्र असून या मार्फत आजपर्यंत राज्‍यातील अनेक लघुउद्योजक, शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रम राबविण्यात आले असुन या केंद्राची उभारणी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि वैधानिक विकास महामंडळ यांचे सहकार्यांने करण्‍यात आलेली आहे.