Pages

Tuesday, October 13, 2015

गृहविज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण कुटूंबियांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात आले विविध उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वसमत तालुक्‍यातील मौजे आरळ हे गांव दत्‍तक घेतले असुन प्राचार्य प्रा विशाला पट्टनम यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविण्‍यात येत आहेत. ग्रामीण युवती व शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या गरजेनुसार गृहविज्ञान महाविद्यालयाचे ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रसार विविध माध्‍यमातुन करण्‍यात येत आहे. या अतंर्गत विद्यार्थ्‍यांचे शालेय संपादणुक वृंध्‍दीगत करण्‍यासाठी बालविकास तज्ञ प्राचार्य प्रा विशाला पट्टनम यांनी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत शालेय विद्याथर्यांसह शिक्षकांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदवीला. याच अतंर्गत शेतकरी महिलां सक्षमीकरणावर डॉ­ प्रभा अंतवाल यांनी तर कमीत कमी कष्‍टात महिलांनी जास्‍तीत जास्‍त कामे करण्‍या पध्‍दती यावर डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. गृहविज्ञान महाविद्यालयात राबवण्‍यात येत असलेले विविध लघु प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती याप्रसंगी देण्‍यात आली. सदरिल कार्यक्रमास शेतकरी महिला मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी विद्यार्थ्‍यींनी गटप्रमुख प्रतिमा ठोंबरे, किरण माने, ऋतुजा संघई आदींनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्‍या वतीने गंगाखेड तालुक्‍यातील मौजे सुपा येथील शेतकरी व जिल्‍हा परिषद शिक्षकांनी आयोजित केलेल्‍या कार्यशाळेत बालविकास तज्ञ प्राचार्या विशाला पट्टनम यांनी ग्रामीण मुलांमध्‍ये शिक्षणाची आवड निर्माण करुन त्‍यांचे शालेय संपादणुक वृध्‍दीगत करण्‍यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी, पालक विद्यार्थी व शिक्षक मोठया संख्‍येने उपस्थित होते. याप्रसंगी आयोजीत गृहविज्ञानावर आधारीत प्रश्‍न मंजुषेमध्‍ये योग्‍य उत्‍तर देणा-यांना मानपत्र देवुन सत्‍कार करण्‍यात आला.
महाविद्यालयात परभणी लायन्‍स क्‍लब व ग्रामीण गृहविज्ञान कार्यानुभव यांच्‍या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनीसाठी हिमोग्‍लोबिन आणि रक्‍तदाब पडताळणीच्‍या शिबीराचे आयोजन करण्‍यात येऊन मार्गदर्शन करण्‍यात आले. महाविद्यालयाचे वतीने दि. 2 ऑक्‍टोंबर महात्‍मा गांधी व लाल बहादुर शास्‍त्री यांच्‍या जन्‍मदिनानिमित्‍त प्राचार्या प्रा विशाला पटणम यांच्‍या नेतृत्‍वाखाली प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थीनी महाविद्यालयाच्‍या परिसरात स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली.