Pages

Tuesday, October 13, 2015

मराठवाडयात अनेक जिल्‍ह्यात हुमणी किडीचा मोठा प्रादुर्भाव

ब्बी हंगामातील हुमणीचे व्यवस्थापनासाठी शेतक-यांनी सामुदायिक प्रयत्‍न करण्‍याचे वनामकृविचे आवाहन 

मराठवाडयातील जिल्हामध्ये खरिप हंगामा सोयाबीन, कापूस, ज्वारी, ऊस, बाजरी, मका, तुर, हळद, कांदा इत्यादी पिकावर हुमणीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याचे अतिशय नुकसान झाले असुन हुमणी ही एक अतिशय नुकसानकारक बहुभक्षी कीड आहे. हुमणीची अळी जमिनी राहून विविध पिकांच्या मुळा कुरतडते. त्यामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. रबी हंगामा पेरणी झाल्यानंतर या पिकाच्या उगवणीनंतर हुमणीच्या अळया हरभरा, करडई, ज्वारी इत्यादी पिकावर मुळा खाण्याची शक्यता असुन रोपावस्थेतच मुळा कुतडल्यामुळे संपूर्ण रोप वाळून जाईल. तसेच सध्या खरिप हंगामातील तूर, कापूस इत्यादी या उभ्या पिकातदेखील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे वाळत आहेत. हुमणीची अळीची अवस्था जुलै ते नोव्हेबर-डिसेंबर पर्यंत असते व नंतर ही कोषावस्थेत जाते. म्हणून हुमणीच्या अळीपासून होणारे सद्य परिस्थितीतील नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी रबी हंगामात शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे हुमणीचे व्यवस्थापन करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आणि कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले आहे.
सद्यस्थितीत हुमणीचे व्यवस्थापन
      ज्या शेतकऱ्यांना रबी हंगामाचा घ्यावयाचा नाही त्यांनी खरिपातील पीक काढणीनंतर शेता खोल नांगरट करावी व पाळी मारावी. त्यामुळे जमिनीतील अळया पृष्ठभागावर आल्यानंतर सुर्यप्रकाशामुळे किंवा पक्षी वेचून खाल्यामुळे त्याचे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.
      पिकामध्ये शक्य असेल तर आंतरमशागत करावी व उघडया पडलेल्या अळया हाताने वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात बुडवून मारुन टाकावे.
      रबी पिकांची पेरणी करतेवेळी फोरेट 10 टक्के दाणेदार हे कीटकनाशक 25 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत मिसळावे जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे.
      मेटारायझियम ॲनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा. ही बुरशी हुमणीच्या अळयांना रोगग्रस्त करते, त्यामुळे अळयांचा बंदोबस्त होतो.
      तसेच फिप्रोनील 40 टक्के + इमिडाक्लोप्रीड 40 टक्के हे मिश्र कीटकनाशक 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून ऊस इतर पिकाच्या झाडाभोवती आळवणी करावी.
वरील उपाययोजना ही केवळ सद्यपरिस्थितीतील पिकांना हुमणीच्या अळयापासून होणारे नुकसान कमी करण्यसाठी आहेत. हुमणीच्या संपूर्णपणे व्यवस्थापन करण्यासाठी 2 ते 3 वर्ष प्रौढ व अळया यांचे एकात्मिक व्यवस्थापन करणे आवश्यक असुन विशेषत: खरीप हंगामात मृगाचा पाऊस झाल्यानंतर हुमणीचे भुंगे कडुनिंब, बाबुळ, बोर इत्यादी झाडाच्या पांनावर रात्रीच्यावेळी भुंगे खात असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सामुहिकरित्या बंदोबस्त करावा. त्यासाठी प्रकाशसापळयाचा वापर करावा, असे आवाहन करण्‍यात येते.