Pages

Wednesday, October 14, 2015

जास्‍त पाणी लागणारी पिके केवळ ठिंबक वरच घ्‍यावीत..........कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे झरी येथे रबी शेतकरी मेळावा संपन्‍न 
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना प्रगतशील शेतकरी मा श्री कांतराव देशमुख
हवामान बदलामुळे तापमानात वाढ होत असुन मराठवाडयातील पाऊसमान दिवसेंदिवस कमी होत आहे, पाऊसाचे दिवस कमी होत आहेत. शेतीसाठी लागणा-या निविष्‍ठा बाजारातुन विकत घेता येतात पंरतु पाणी मिळत नाही, म्‍हणुन जलसंधारणाला प्राधान्‍य देणे गरजेचे आहे. भुगर्भजलाची पातळी वरचेवर कमी होत असुन विहीर व कुपनलिका पुर्नभरणावर भर दयावा लागेल. जास्‍त पाणी लागणारी पिके केवळ ठिंबक वरच घ्‍यावीत, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय व अखिल भारतीय समन्‍वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्‍प यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे झरी येथे दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी आयोजीत रबी शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रगतशील शेतकरी मा. श्री. कांतरावजी देशमुख हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, सरपंचा सौ आश्विनीताई देशमुख, डॉ. जी. एम. वाघमारे, रावे समन्‍वयक डॉ. राकेश अहिरे, डॉ एस पी म्‍हेत्रे, डॉ यु एन आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, राजस्‍थान मध्‍ये कमी पर्यन्‍यमान असुन शेतकरी आत्‍महत्‍याचे प्रमाण नाही, याचे मुख्‍य कारण शेतीपुरक जोडधंदे असुन मराठवाडयातील शेतक-यांनी शेतीपुरक जोडधंद्याकडे वळावे. शेतक-यांना अनेक संकटांना तोंड दयावे लागत असुन शेतकरी, शासन व विद्यापीठ सर्वांनी मिळुन या परिस्थितीचा मुकाबला करू, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
  अध्‍यक्षीय भाषणात प्रगतशील शेतकरी मा. श्री. कांतराव देशमुख म्‍हणाले की, विद्यापीठातील ग्रामीण कृषि कार्यानुभवामुळे एक चांगले कृषि पदवीधर घडत असुन त्‍याचा लाभ कृषि विकासासाठी होत आहे. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी आपल्‍या भाषणात हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापनावर मार्गदर्शन करून शेतक-यांनी सामुदायिकरित्‍या या किडीचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचे आवाहन केले तर प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी आपल्‍या भाषणात ग्रामीण कृषि कार्यानुभवामुळे कृषिच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या ज्ञान मोठी भर पडत असुन कृषिदुतांच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान विस्‍ताराचेही कार्य होत असल्‍याचे सांगितले.
  कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात रावे समन्‍वयक डॉ. राकेश अहिरे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत नितीन ठोकर यांनी केले तर विजय घाटोळ यांनी आभार मानले. तांत्रिक सत्रात लिंबुवर्गीय फळ लागवडीवर डॉ जी एम वाघमारे यांनी मार्गदर्शन केले तसेच रबी ज्‍वारी लागवडीवर डॉ यु एन आळसे, करडई लागवडीवर डॉ एस बी घुगे, हरभरा लागवडीवर डॉ पी के वाघमारे, पशुधन व्‍यवस्‍थापनावर डॉ ए टी शिंदे, रबी पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनावर डॉ डि जी मोरे, रेशीम उद्योगावर डॉ सी बी लटपटे तर रबी पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ एस एल बडगुजर यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ एस पी म्‍हेत्रे व डॉ डि जी दळवी यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिदुत मंगेश गोरे, सुभाष इरतकर, वैजनाथ कदम, जीवन धोत्रे, राम कदम, अजित गावडे, अमोल जोंधळे, व्‍दौपद घुगे, युवराज धावणे व गोपाळ डोंबे यांनी परिश्रम घेतले. 
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले