Pages

Friday, December 11, 2015

वनामकृवि व भाभा अनुसंशोधन केंद्राच्‍या शास्‍त्रज्ञांची भुईभुग बीजोत्‍पादन प्रक्षेत्रास भेट

जिंतुर तालुक्‍यातील मौजे केहाळ येथील कृषिभुषण श्री मधुकररा घुगे यांच्‍या शेतास भेट
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले, विस्तार कृषि विद्यावेता डॉ. यु एन आळसे, विस्तार शिक्षण अधिकारी प्रा. पी. एस. चव्हाण तसेच मुंबई येथील भाभा अनुसंशोधन केंद्राचे डॉ. . एम. बडीगन्नावार, डॉ. अभिजीत शीत्र, बीजप्रमाणीकरण अधिकारी श्री सुदामराव घुगे यांनी दिनांक १० डिसेंबर रोजी रोजी जिंतुर तालुक्‍यातील मौजे केहाळ येथील कृषिभुषण श्री मधुकरराव घुगे यांच्‍या शेतावरील बीजोत्‍पादन प्रक्षेत्रास भेट देवून रब्बी भुईमुग, तुर, गहु, कापुस आदी पिकांची पाहणी केली.
  यावर्षी प्रतिकुल परिस्थितीतही विद्यापीठ विकसित एमएयुएस-७१ या सोयाबीनचे हेक्टरी २५ क्विंटल उत्पन्न घेवून श्री घुगे यांनी उच्चांक गाठला आहे. वि द्यापीठ विकसित बदनापूर-७११ या तुरीचा वाण सध्या काढणीस तयार असुन अंदाजे २५ ते ३० क्विंटल हेक्टरी उत्पन्न येवू शकते, असे त्यांनी सांगितले. भारतीय काजू म्हणून नावालौकीक असलेला भुईमुगाचा वाण टिएलजी-४५ याची काढणी झाली असून हेक्टरी ६० ते ७० क्वींटल उत्पन्न येईल असा अंदाज आहे. रबी भुईमुगाचे वाण टिजी-५१ व टिअेजी-३७ या वाणाचेही चांगले उत्पन्न येईल, अशी आशा श्री घुगे यांनी व्‍यक्‍त केली. वातावरणातील बदलामुळे शरबती गव्हाचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत असले तरी श्री घुगे यांनी भाभा अनुसंशोधन केंद्राच्या सहकार्याने एचडी-१०९८ हा डायकोकम (खपली /जोडगहु) वाणापासुन गतवर्षी हेक्‍टरी ४५ क्विंटलाचे उत्पन्न काढले असुन यावर्षी थंडी कमी असली तरीही हे पीक चांगले आहे, हेक्‍टरी ५५-६० क्विंटलाचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे. गेल्‍या १६ वर्षापासुन कुषीभुषण श्री मधुकर घुगे भुईमुग पीक घेत असुन भुईमुग पिकामध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आहे, शेती क्षेत्रातील सर्वोच्च असा महाराष्ट्र पातळीवरचा "कृषि भुषण" पुरस्कार प्राप्त केला आहे. श्री घुगे विद्यापीठाचा प्रत्येक संशोधीत वाण आपल्या शेतावर प्राधान्याने घेतात तर वनामकृविचे शास्त्रज्ञ नेहमीच त्‍यांना मार्गदर्शन करतात.
  या प्रसंगी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी बी भोसले यांनी भुईमुग, तुर व कापुस आदी पिकांवर येणा-या किडी व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबदद्ल महत्वाच्या सुचना श्री घुगे यांना दिल्या. सतत भुईमुगावर भुईमुग घेतल्यामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर होत असुन जमिनीतून एकाच भागातून अन्नद्रव्य पीक घेत असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे, त्याकरिता पिकांची फेरपालट करण्याचा सल्ला डॉ यु एन आळसे यांनी दिला. वातावरणातील बदल, मजूरांची कमतरता, निविष्ठांची महागाई, डुकरांसहित वन्यप्राण्यांचा त्रास, पाणी टंचाई व इतर बाबींवर मात करीत श्री घुगे यांनी एकत्रित जवळपास दोनशे एकर शेतीचे सुयोग्‍य व्यवस्थापन अगदी सहजतेने केले आहे. डॉ. भोसले, डॉ. आळसे व प्रा. चव्हाण यांनी संपूर्ण शेतीला भेट देवून चांगल्या व्यवस्थापनाचे कौतूक केले.