Pages

Saturday, December 12, 2015

वनामकृवित कृषि व अन्‍नप्रक्रिया प्रदर्शनीचे आयोजन

शेतक-यांत उद्योजकता विकासासाठी अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेत आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या अन्‍नतंत्र महाविद्यालय व म्‍हैसुर येथील अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञ मंडळ यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय अन्‍नशास्‍त्रज्ञ व तंत्रज्ञांच्‍या चौव्‍वीसाव्‍या परिषदेचे (फीस्‍ट २०१५) आयोजन करण्‍यात आले असुन शेतक-यांचे कृषि प्रक्रिया व शाश्‍वत तंत्रज्ञानाव्‍दारे सक्षमीकरण याविषयावर आधारीत या परिषदेचे म्‍हैसुर केंद्रिय अन्‍न तंत्रज्ञान संशोधन संस्‍था (सिएफटीआरआय) व डिफेन्‍स फुड रिसर्च लॅबोरॉटरी सह-आयोजक आहे. परिषदेच्‍या निमित्‍ताने महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक १८ व २० डिसेंबर दरम्‍यान अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाच्‍या परिसरात करण्‍यात आले असुन यात शंभर पेक्षा अधिक दालनांचा समावेश राहणार आहे. यात कृषि अन्‍न प्रक्रिया व मुल्‍यवर्धित पदार्थ निर्मीतीत राज्‍यातील नामवंत उद्योग नासिक येथील नामधारी फ्रेश, लातुर येथील बेकरी उद्योग चाकोते फुड प्रोडक्टस, कृषि व अन्‍नप्रक्रियात उद्योग उभारणीस प्रसिध्‍द असलेले सातारा येथील थ्री पी सोलुशनस, कृषिमाल आयात-निर्यातीसाठी आवश्‍यक असणारी विविध प्रक्रिया, कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अन्‍नसुरक्षा संकरप्रणाली आदींबाबत मार्गदर्शन करणारी कंपनी पनवेल येथील सेफ फुडस सोल्‍युशनस, फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग मे. झेन नॅचरल अॅग्रो प्रा लिमिटेड, जनहार, मोती नमकीन, शिवम् मसाले आदीच्‍या दालनांचा समावेश राहणार आहे.    अशा प्रकारचे प्रदर्शनाचे आयोजन प्रथम परभणीत होते असुन सर्व शेतकरी बांधव, ग्रामीण महिला, बचत गटाच्‍या महिला, उद्योजक, युवकांना व नागरिकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन आयोजक प्राचार्य प्रा पी एन सत्‍वधर, प्रा दिलीप मोरे व संयोजक श्री महंम्‍मद गौस यांनी केले आहे.
  कृषि उत्‍पादित माल हा नाशवंत व हंगामी स्‍वरूपाचा असल्‍यामुळे त्‍याची उपलब्धता विशिष्‍ट काळात होत असते, काढणी तंत्रज्ञानाचा अभाव व प्रक्रिया व साठवणुकिच्‍या अपु-या सोयीमुळे उत्‍पादित कृषि मालांची मोठया प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान, हे दुष्‍टचक्र थांबवण्‍यासाठी शेतक-यांनीच आपल्‍या उत्‍पादित मालावर प्रक्रिया करून त्‍यापासुन मुल्‍यवर्धीत व प्रक्रियायुक्‍त अन्‍नपदार्थाच्‍या निर्मीती केली तर शेतक-यांना अधिक आर्थिक फायदा होऊ शकतो. विशेषत: मराठवाडयातील शेतीला कृषि पुरक जोडधंद्याशिवाय गत्‍यंतर नसुन अन्‍नप्रक्रिया उद्योगाची कास शेतक-यांना धरावी लागणार आहे. शेतक-यांत उद्योजकता विकास चालना मिळावी, हा उद्देश ठेऊन या अन्‍नप्रक्रिया औद्योगिक प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामुळे अन्‍नप्रक्रियाबाबतचे नाविन्‍यपुर्ण तंत्रज्ञानाची शेतक-यांना ओळख होणार आहे. या प्रदर्शनीत अन्‍नप्रक्रिया, काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाचा व विपणन व्‍यवस्‍था यावर अधिक भर राहणार आहे.