Pages

Tuesday, January 19, 2016

कृषि पदविधरांनी माता व मातीस विसरू नये......... मा. डॉ. राम खर्चे

महाराष्‍ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदपुणे चे उपाध्‍यक्ष माडॉ राम खर्चे यांनी साधला विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचा-यांशी संवाद

कृषि विद्यापीठातील शैक्षणिक अभ्‍यासक्रमात विद्यार्थ्‍यांना सर्वकष असे ज्ञान मिळते, त्‍यामुळे स्‍पर्धा परिक्षेत मोठया प्रमाणात ते यश प्राप्‍त करतात. प्रशासकिय क्षेत्रात कार्य करतांना कृषि पदविधरांनी आपल्‍या मातेला व मातीस विसरू नये. कोणत्‍याही क्षेत्रात करियर करतांना कृषि पदविधरांनी शेतक-यांचे मनोबल उंचावण्‍यासाठी कार्य करावे, असे प्रतिपादन पुणे येथील महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. डॉ. राम खर्चे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात दिनांक १९ जानेवारी रोजी विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, अधिकारी व कर्मचारी यांच्‍याशी एका कार्यक्रमात संवाद साधतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बालाजी भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, प्राचार्य डॉ डि एन गोखले व प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
  मा. डॉ. राम खर्चे पुढे म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी व्‍यसनापासुन दुर राहावे, स्‍वत:हुन कृषि विस्‍तारात व शासनाच्‍या शेती विषयक विविध योजना गावात राबविण्‍यासाठी योगदान द्यावे. शेती व शेतक-यांच्‍या विकासासाठी दर्जात्‍मक कृषि शिक्षणाच्‍या आधारे गुणवंत मनुष्‍यबळ निर्मीतीसाठी कृषि विद्यापीठाच्‍या बळकटीकरणाची गरज आहे. कृषि परिषदे हे राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठात समन्‍वयकाचे कार्य करते. कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व कर्मचारी रिक्‍त पदांमुळे कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार कार्यावर परिणाम होत आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी व कर्मचारी यांचे प्रश्‍न कृषि परिषदेच्‍या स्‍तरावर त्‍वरित सोडविण्‍यात येतील व जे प्रश्‍न शासनस्‍तरावर प्रलंबित आहेत ते शासनासमोर प्रभावीपणे मांडण्‍यात येतील, असे आश्‍वासन त्‍यांनी यावेळी दिले.
  याप्रसंगी कृषि विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यी, अधिकारी व कर्मचारी यांनी आपले विविध समस्‍या व सुचना उपाध्‍यक्ष मा. डॉ राम खर्चे यांच्‍या समोर मांडल्‍या. त्‍यात मुख्‍यत: कृषि पदविधरांना परिसर मुलाखती आयोजीत करणे, शैक्षणिक शिष्‍यवृत्‍तीचे प्रश्‍न, विद्यापीठ सलंग्‍न महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा, आचार्य पदवीसाठी सामायिक प्रवेश परिक्षा, दुष्‍काळ परिस्थित शुल्‍क माफी आदींचा समावेश होता. तर विद्यापीठातील वनामकृवि कर्मचारी संघाचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे यांनी अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांचे प्रश्‍न मांडले.
  कार्यक्रमात रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा अनिस कांबळे यांना शासनाचा उत्‍कृष्‍ट कार्यक्रम अधिकारी म्‍हणुन मिळालेल्‍या सन्‍मानाबद्दल व गुलबर्गा येथे पार पडलेल्‍या राष्‍ट्रीय एकात्‍मता शिबीरात कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव व स्‍वयंसेवकांनी सक्रीय सहभागाबाबत मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख डॉ बाबासाहेब ठोंबरे यांनी तर आभार प्रदर्शन कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, प्राध्‍यापक व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते