Pages

Tuesday, January 26, 2016

गोळेगाव कृषी महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न

६७ व्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केले ६७ स्‍वयंसेवकांनी रक्तदान
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठातंर्गत असलेल्‍या गोळेगाव (ता. औंढे नागनाथ जि हिगोंली) येथील कृषी महाविद्यालयाच्‍या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक २५ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ सुरेश अंबुलगेकर, तालुका कृषी अधिकारी श्री शरद अंभोरे, प्राचार्य डॉ विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले तर डॉ अंबुलगेकर यांनी खडतर परिस्थितीत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन प्रगतीचे कौतुक करून कृषी परिषदेतर्फे महाविद्यालयांच्या प्रगतीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी महाविद्यालयाच्या जडणघडण विषयी माहिती दिली. ६७ व्‍या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे अनोखे स्वागत केले. रक्‍तदान शिबिराकरीता जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ बी एल चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.प्रजाकसत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्‍पर्धेत विजयी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कु भक्ती पुजारी हिने आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व डॉ राजेश कदम यांना राज्यस्तरीय ऍग्रोकेयर आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रोहित सोनवणे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमधिकारी डॉ गजानन भालेराव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ कदम, डॉ चांगुले, डॉ उमाटे, डॉ भालेराव, प्रा शिंदे, प्रा झाटे, डॉ मीनाक्षी पाटील, डॉ सोनवणे, डॉ धुरगुडे, डॉ बडोले, डॉ कोरके, श्रीमती सुरेवाड आदीसह महाविद्यालयाचे कर्मचारी, नवनियुक्त यिन प्रतिनिधी विशाल खेरणार विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.