वनामकृवित शिवजयंती उत्सव निमित्त गुंफले पहिले पुष्प
छत्रपती
महाराजांचे धोरण सर्वसामान्य जनता, कामगार, शेतकरी, महिला यांच्यासाठी कल्याणकारी
धोरण होते. दुष्काळ परिस्थिती व शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभुमीवर छत्रपतींचे
धोरण आजही मार्गदर्शक आहे. माझ्या शेतक-यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचा
आदेश देणारे ते राजे होते. त्यांच्या राज्यात शेतक-यांच्या उभ्या पिकातुन
घोडे हाकण्यास सक्त मनाई करण्यात आली होती, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील प्रसिध्द
विधिज्ञ अॅड. वैशालीताई डोळस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
वतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत असुन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात
आले आहे, दिनांक १६ फेब्रवारी रोजी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना त्या
बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
होते तर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, गृह विज्ञान महाविद्यालयाचे
प्राचार्या प्रा. विशाला पट्टनम, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
व्हि. डी. पाटील व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यार्थी
प्रतिनिधी प्रतिक पठाडे, कृष्णा होगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा. अॅड. वैशालीताई डोळस पुढे म्हणाल्या की, आरमार बांधण्यासाठी
लागणारी लाकडे शेतक-यांच्या परवानगीने जुनी झाडे तोडावीत असे सक्त आदेश छत्रपतींनी
दिले होते. सैनिकांनी रात्रे दिवे बंद
करुन झोपण्याचे आदेश होते, कारण दिव्याची वात शेतात उंदराने नेवुन शेतमाल भस्मसात
होवु शकतो, असे शेतक-यांच्या हितासाठी बारकाव्यांनी विचार करणारे राजे होते. स्थानिक
शेतक-यांच्या मालास भाव मिळवा म्हणुन परकीय व्यापा-यांच्या मालावर त्यावेळी जकात
लावली जायची. त्यांच्या काळात दुष्काळ परिस्थितीत पीक पाहुनच कर निश्चीत केला
जात असे, यावरुन छत्रपती दुर्लक्षीत अशा शेतकरी घटकांना किती महत्व देत होते हे
निश्चीत होते. सामान्य जनतेचे शोषण थांबविण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी
केले होते, त्यामुळेच आजही लोकांचे या लोकराजावर प्रचंड प्रेम आहे. परस्त्री माते
समान असुन स्त्रीवर अत्याचार केल्यास छत्रपतींच्या राज्यात शिक्षा दिल्या जात
होत्या. आजही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला नाही. पुरुषप्रधान व्यवस्था
समाजाने सोडुन दिली पाहिजे यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा,
असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोह मा. कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी केले तर
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन
प्रा. एस. एल. बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास
कृषि विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन कदम, मुंजा रेंगे आदिसह महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिवजयंती उत्सव निमित्त आयोजित व्याख्यानमालेत
दिनांक १७ व १९ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे पुणे येथील इतिहास संशोधक श्री गंगाधर
बनबरे व प्रा. यशवंत गोसावी यांचे व्याख्याने कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात
सकाळी १०.०० वाजता आयोजीत करण्यात आली आहेत.