Pages

Wednesday, February 17, 2016

महा‍पुरूषांचे विचार आपल्या वर्तणुकीत उतरली पाहिजेत........इतिहास संशोधक श्री. गंगाधर बनबरे

वनामकृवित शिवजयंती उत्‍सव निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे गुंफले दुसरे पुष्‍प

  महा‍पुरूषांचे विचार व आदर्श आपल्‍या वर्तणुकीत उतरली पाहिजेत, हा उद्देश महापुरुषांच्‍या जयंत्‍या व पुण्‍यतिथ्‍या साजरे करण्‍याचा असला पाहिजे. समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर मोठी स्‍वप्‍ने पाहावी लागतात, यासाठी मॉ जिजाऊ, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, बुध्‍द, महात्‍मा फुले, सावित्रीबाई फुले, अहील्‍याबाई आपले आदर्श झाली पाहिजेत. या महापुरुषांना जातीच्‍या चौकटीत बंदिस्‍त करु नका, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास संशोधक श्री गंगाधर बनबरे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने शिवजयंती उत्‍सव साजरा करण्‍यात येत असुन यानिमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानमालेचे दुसरे पुष्‍प गुंफतांना दिनांक १७ फेब्रवारी रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले, माजी प्राचार्य श्री तनपुरे, प्रा. दिलीप मोरे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक पठाडे, कृष्‍णा होगे यांची उपस्थिती होती.
  इतिहास संशोधक श्री गंगाधर बनबरे पुढे म्‍हणाले की, स्‍वत: शिवाजी महाराजांना आठ भाषेचे ज्ञान अवगत होते, शिवाजी महाराजांचे हेरखाते अत्‍यंत मजबुत होते, त्‍या जोरावर ते युध्‍दनिती ठरवित असत. शिवाजी महाराज स्‍वराज्‍य स्‍थापनेत यशस्‍वी होण्‍याचे मुख्‍य कारण म्‍हणजे त्‍यांनी अनेक माणसे घडविली. त्‍यांच्‍या राज्‍यात मनुष्‍य हा केंद्रस्‍थानी होता. आज आपणास शिवाजी महाराजांप्रमाणे तलवारीच्‍या बळावर युध्‍द लढायचे नसुन त्‍यांच्‍या विचाराच्‍या व आदर्शाच्‍या बळावर समाजात परिवर्तन करावयाचे आहे. शिक्षणाद्वारे समाज व्‍यवस्‍थेत परिवर्तन घडु शकते. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनींनी महापुरुषापासुन प्रेरणा घेवुन मोठे स्‍वप्‍न पहावित, ती साकार करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
  अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलू म्‍हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजची प्रशासकीय धोरणे आजही उपयुक्‍त असुन संपुर्ण देश त्‍यांचा आदर्श घेतो. शिवचरित्रापासुन तरुणांनी आदर्श घेण्‍याचा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण यांनी आपल्‍या मनोगतात दिला.
  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले यांनी केले. सूत्रसंचलन कुमार पानझडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिक पठाडे यांनी केले. कार्यक्रमास कृषि विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होतेकार्यक्रम यशस्‍वीतेसाठी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी परिश्रम घेतले.