Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Pages
▼
Monday, May 30, 2016
Thursday, May 19, 2016
शेतक-यांसाठी कार्य करतांना कृषी पदवीधरांनी अभिमान बाळगावा.....मा. डॉ. गुरबचन सिंह
वनामकृवित आयोजीत विशेष व्याख्यान
कार्यक्रमात मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले कृषी पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषी क्षेत्राचा
वाटा केवळ १४ टक्के असुन देशाची ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कृषी
क्षेत्रावर अवलंबुन आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी कृषी विकासाशिवाय पर्याय
नाही. कृषी पद्वीधरांनी विविध क्षेत्रात कार्य करतांना शेतक-यांसाठी कार्य करावे,
शेतक-यांची सेवा करण्याची संधी आपणास प्राप्त झाली याबाबत रास्त अभिमान
बाळगावा, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष
तथा भारतीय कृषी विद्या संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी विद्या विभाग व भारतीय कृषीविद्या संस्था
शाखा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ मे रोजी आयोजीत कार्यक्रमात पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण हे होते तर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ. डि एन गोखले, डॉ. बी. व्ही. आसेवार
यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. गुरबचन सिंह पुढे म्हणाले
की, कृषी पदवीधरांना केंद्र व राज्य शासनात अनेक नौकरीच्या संधीसोबतच बॅकिंग
क्षेत्र, खाजगी कंपन्यातही मोठया संधी उपलब्ध आहेत. कृषी पदवीधर स्वत:चा कृषी
व्यवसाय सुरू करून अनेकांना रोजगारही देऊ शकतात, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त
केले. याप्रसंगी देशापातळीवरील कृषि शास्त्रज्ञ निवड प्रक्रियाची माहिती देऊन
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात शिक्षण संचालक
डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कृषी क्षेत्र वैविध्यपूर्ण क्षेत्र असुन विविध
प्रकाराची पीके, पशु आदींवर काम करणा-यां अनेक संशोधन केंद्र व संस्था देशात व
राज्यात कार्यरत आहेत, तेथे काम करण्याची मोठी संधी कृषी पदवीधरांना आहेत. महाराष्ट्रातील
कृषी पदवीधर संवाद कौशल्यात कमी पडतो, त्यामुळे देशापातळीवरील अनेक संधीपासुन तो
वंचीत राहतो.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. डि एन
गोखले यांची भारतीय कृषि विद्या संस्थेच्या सल्लागार मंडळावर सदस्य म्हणुन
निवडी झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक प्राचार्य डॉ डि एन गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. ए. एस. कार्ले
यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मेधा सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे
प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया
संख्येने उपस्थित होते.
Wednesday, May 18, 2016
पुर्वजांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शेतक-यांनीही दुष्काळास धैर्यांनी तोंड द्यावे.......मा. डॉ. गुरबचन सिंह
वनामकृवित खरीप शेतकरी मेळावास
शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना |
मेळाव्याचे उद्घाटन करतांना |
विद्यापीठ निर्मीत बियाणे विक्रिचे उद्घाटन करतांना |
मार्गदर्शन करतांना मा. डॉ. गुरबचन सिंह |
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डाॅ. बी. व्यंकटेश्वरलु |
देशातील शेतकरी अन्न उत्पादन
करून देशाची सेवा करीत असुन मानवासोबतच प्राणी, पशुपक्षी यांनाही अन्न पुरवण्याचे
कार्य तो करतो आहे, तोच देशाचा अन्नदाता आहे. शेतक-यांच्या जोरावर व संशोधनाच्या
आधारे देशाचे अन्नधान्य उत्पादन
साधारणत: ५० दशलक्ष टनावरून २६० दशलक्ष टन आपण नेऊ शकलो, देश अन्नधान्यात स्वयंपुर्ण
झाला. गेल्या तीन वर्षाच्या सततच्या दुष्काळ परिस्थितीमुळे काही शेतकरी आत्महत्यासारखा
मार्ग अवलंबीत आहेत. आपल्या पुर्वजांनी अनेक संकटाचा धैर्यानी सामना केला, त्यांचा
आदर्श डोळयासमोर ठेऊन शेतक-यांनीही दुष्काळाशी दोन हात करावेत, असा सल्ला नवी
दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी
दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार
शिक्षण संचालनालय व महाराष्ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक
१८ मे रोजी आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर विद्यापीठ
कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. रविंद्र पतंगे, मा. श्रीमती सुस्मिताताई
पवार, प्रगतशील शेतकरी मा. श्री. गोविंदराव पवार, माजी कृषि संचालक डॉ अनंतराव
जावळे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना श्री. दशरत
तांबाळे, कृषी विकास अधिकारी डॉ. बळीराम कच्छवे, उपसंचालक श्रीमती रक्षा शिंदे, यांची
प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ. गुरबचन सिंह पुढे म्हणाले
की, गावातील एखादा शेतकरी दुष्काळ परिस्थितीमुळे चिंताग्रस्त असल्यास त्यांच्याशी
संवाद साधुन त्यास धीर देण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विद्यापीठाने
उमेद कार्यक्रमातुन मराठवाडयातील तीनशे पेक्षा जास्त गावांंत शेतक-यांना धीर देण्याचा
प्रयत्न केला, हा एक स्तुत्य उपक्रम आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर शाश्वत
उत्पादन देणा-या पीकांचे लागवड क्षेत्र वाढवावे लागेल. पीक लागवडीसह पशुसंगोपन,
रेशीम उद्योग, कुकूटपालन आदी शेतीपुरक व्यवसायाचा समावेश असलेल्या एकात्मीक
शेती पध्दतीचा अवलंब शेतक-यांनी केल्यास वर्षभर हातात पैसा खेळात राहील. कमी
खर्चात शेतक-यांचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. अनेक देशात दुष्काळ
परिस्थितीत कसा पध्दतीने सामना केला जातो याचा अभ्यास करण्यात यावा. शासन,
समाज, विद्यापीठ, खाजगी कंपन्या आदींच्या सहकार्याने शेतक-यांचे उत्पादन
वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील. शेतक-यांनी पडणा-या पाऊसाच्या पाण्याचे जास्तीस
जास्त उपयोग करण्यासाठी नियोजन करावे, शेततळयाच्या माध्यमातुन पाण्याची साठवण
करावी. आपल्या देश नैसर्गिक साधनसंपत्तीने जगात समृध्द देश असुन भावी पिढीसाठी या
साधनसंपत्तीचे जतन करावे लागेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, दुष्काळ परिस्थितीत जनावरांचा चा-याचा प्रश्न गंभीर झाला असुन खरिप हंगामात शेतक-यांनी खरिप ज्वारीचा पेरा वाढवावा तसेच कडधान्य पीकात तुर, मुग व उडिद लागवड क्षेत्रात वाढ करावी लागेल. पुढील वर्षी विद्यापीठ प्रक्षेत्रावर जास्तीत जास्त बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेऊन विद्यापीठ बियाणाबाबत शेतक-यांची असलेली मोठी मागणी पुर्ण करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमात विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. रविंद्र पतंगे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, शेतक-यांचा विद्यापीठप्रती मोठा विश्वास आहे, बदलत्या हवामानास अनूकुल पिक पध्दतीत बदल आपणास करावा लागेल, जास्त नफा देणा-या पिकांपेक्षा शाश्वत उत्पादन देणा-या पीकांची लागवड करावी लागेल. प्रगतशील शेतकरी श्री गोविंदराव पवार यांनी आपल्या भाषणात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करण्याचा सल्ला दिला तर जालना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरत तांबाळे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी विद्यापीठाच्या कृषि विस्तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले. या निमित्त आयोजीत परिसंवादात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी कापुस, सोयाबीन, तुर, हळद आदी पीक लागवड तंत्रज्ञान तसेच हुमणी किडीचे व्यवस्थापन, विहीर व कुपनलिका पुर्नभरण, शेळीमेंढी पालन, कोरडवाहु शेती व्यवस्थापन आदी विषयावर मार्गदर्शन केले व शेतक-यांच्या विविध शकांचे समाधान विद्यापीठ शास्त्रज्ञांनी केले.
कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हळद लागवडवरील मोबाईल अॅपचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यापीठाच्या शेतीभाती मासिकाच्या खरीप पीक विशेषांकाचे, शास्त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे व घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. मेळाव्यास शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यापीठ अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
विद्यापीठ प्रकाशीत शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना |
विद्यापीठ विकसित कृषि अवचाराची पाहणी करतांना |
बीटी कपाशीतील एकात्मिक किड व्यवस्थापन सीटीचे विमोचन करतांना |
Thursday, May 12, 2016
अवर्षण परिस्थितीमुळे यंदा विद्यापीठाचे बियाणे विक्रीस उपलब्ध नाही
शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद
आदी खरिप पिकांतील सरळवाणांचे स्वत:कडील बियाणे वापरण्याचे विद्यापीठाचे आवाहन
शेतक-यांना बियाणे पुरवण्याच्या दृष्टीकोनातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत प्रक्षेत्रावर मागील खरीप
हंगामात मोठया प्रमाणावर सोयाबीन, मुग, उडीद आदी खरीप पिकांचे बिजोत्पादन
कार्यक्रम घेण्यात आला होता, परंतु अवर्षण परिस्थितीमुळे खरीप हंगामातील
पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट येऊन बिजोत्पादनाचे उदिदष्ट साध्य करता येऊ
शकले नाही. कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या मराठवाडयातील लातुर, उस्मानाबाद, बीड,
परभणी, हिगोंली, नांदेड, औरंगाबाद व जालना जिल्हयातील संशोधन केंद्राच्या
प्रक्षेत्रावर पेरणी केल्यानंतर अवर्षण परिस्थितीमुळे ३० ते ४० टक्केच बीजोत्पादन
झाले. येत्या हंगामासाठी कृषि विद्यापीठातर्फे सोयाबीन, मुग, उडिद आदी बियाणांची
कमतरता असल्यामुळे बियाणे विक्रीस उपलब्ध होणार नाही. खरिप पिकांतील तुरीचे
बीडीएन-७११, बीएसएमआर ७३६, खरिप ज्वारीचे पीव्हीके ८०१ व बाजरीचे एबीपीसी ४-३ या
वाणाचे मर्यादित बियाणे विक्रीस उपलब्ध आहे. शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद आदी खरिप
पिकांतील सरळवाणांचे स्वत:कडील बियाणे उगवण क्षमता तपासुन वापरावे, असे आवाहन
विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
वनामकृवित खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन
खरीप पीक परिसंवाद व कृषि
प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे विद्यापीठातर्फे आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय व
महाराष्ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप शेतकरी मेळाव्याचे
आयोजन नविन पदव्युत्तर वसतीगृह मैदान येथे दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले असुन मेळाव्याचे उद्घाटन नवी
दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांच्या
हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
हे राहणार असुन परभणी लोकसभा संसद सदस्य मा. श्री. संजय जाधव, विधानपरिषद सदस्य
मा. श्री. सतीश चव्हाण, विधानपरिषद सदस्य मा. श्री. विक्रम काळे, विधानपरिषद
सदस्य मा. श्री अब्दुला खान दुर्राणी (बाबाजानी), विधानपरिषद सदस्य मा.
श्री. रामराव वडकुते, परभणी विधानसभा सदस्य मा. डॉ. राहुल पाटील, जिंतुर विधानसभा
सदस्य मा. श्री. विजय भांबळे, गंगाखेड विधानसभा सदस्य मा. डॉ. मधुसूदन केंद्रे,
पाथरी विधानसभा सदस्य मा. श्री. मोहन फड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या निमित्त
खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असुन सदरील मेळाव्यास
जास्तीत जास्त शेतक-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ.
बी. बी. भोसले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. एस. के. दिवेकर व मुख्य विस्तार
शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले आहे. खरीप पीक परिसंवादात विद्यापीठ
शास्त्रज्ञ कापुस, सोयाबीन, तुर, हळद आदी पीक लागवड तंत्रज्ञान तसेच हुमणी किडीचे
व्यवस्थापन, विहीर व कुपनलिका पुर्नभरण, शेळीमेंढी पालन, कोरडवाहु शेती व्यवस्थापन
आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतक-यांच्या शेतीशी निगडीत विविध शंकांचे
समाधान करणार आहेत. कृषि प्रदर्शनीत विद्यापीठातील विविध संशोधन केंद्राच्या दालनासह
बियाणे, किडनाशके, शेती अवचारे आदी खाजगी कंपनाच्या दालनाचाही समावेश राहणार आहे.
Wednesday, May 4, 2016
दुष्काळस्थितीतही योग्य नियोजन व व्यवस्थापनाच्या आधारे वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाचे प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक
वनामकृवि उत्पादित बहुवार्षीक चारापिकाच्या विविध जातीचे ठोंबे शेतक-यांसाठी उपलब्ध
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठांतर्गत असलेल्या संकरित गो-पैदास प्रकल्पात चारापिके प्रक्षेत्र
विकसीत करण्यात आले असुन फुले जयवंत, फुले यशवंत, बीएसएच-१०, कोईम्बतुर-४,
पैरागवत, धारवाड-६ आदी बहुवार्षीक चारापिकांचे दहा एकर प्रक्षेत्रावर लागवड करण्यात
आली आहे. यामुळे विद्यापीठांतर्गत पशुधनास दुष्काळसदृष्य परिस्थितीत देखिल
वाळलेला चा-यासोबत हिरवाचारा सुध्दा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. दुष्काळस्थितीतही योग्य नियोजन व व्यवस्थापनाच्या आधारे विकसित केलेले प्रक्षेत्र पशुपालक शेतक-यांना मार्गदर्शक ठरत असुन शेतक-यांना या बहुवार्षीक
चारापिकांचे विविध वाणांची ठोंबे एक रूपया प्रतिनगाने उपलब्ध असुन लागवडीसाठी विशेषत: खरिप हंगामासाठी चारापिक ठोंबाचा लाभ शेतक-यांनी घ्यावा, असे आवाहन संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी केले आहे. सदरिल प्रक्षेत्रास कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी दिनांक १ मे रोजीच्या भेटी दरम्यान चारापिकांविषयी
शेतक-यांना मार्गदर्शन करून चारापिके ठोंबे मोठया प्रमाणात शेतक-यांना पुरवठा करण्यासंदर्भात संबधित वि़द्यापीठ अधिका-यांना सुचना दिल्या. सदरिल प्रक्षेत्रास परिवहन मंत्री तथा परभणी
जिल्हयाचे पालकमंत्री मा. श्री. दिवाकररावजी रावते, खासदार मा. श्री. संजय जाधव,
आमदार मा. डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रंजन महिवाल आदींनी भेट
देऊन सदरिल कार्याबाबत विद्यापीठाचे अभिनंदन केले. सदरिल प्रकल्प संशोधन संचालक डॉ.
दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दिनेश सिंह
चौहान व त्यांचे सहकारी राबवित आहेत.
Tuesday, May 3, 2016
हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील..... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
वनामकृविच्या हुमणी व्यवस्थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानास प्रारंभ
उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु |
गत दोन-तीन वर्षापासुन हुमणी किडीचा
प्रादुर्भाव मराठवाडा व विदर्भ विभागात मोठया प्रमाणावर झाला असुन या किडीचे व्यवस्थापन
करण्याच्या दृष्टीने मे व जुन हे दोन महिने अत्यंत महत्वाचे आहेत. सदरिल
किडीचे नियंत्रणाचे उपाय हे वैयक्तिकरित्या शेतक-यांनी केल्यास प्रभावी ठरणार
नसुन शेतक-यांना सामुदायिकरित्या प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन कुलगुरू
मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व
रिलायन्स फाऊंडेशन यांचे संयुक्त विदयमाने परभणी जिल्हयात दिनांक २ ते २७ मे
दरम्यान हुमणी व्यवस्थापन जनजागृती मोहिम व फळबाग वाचवा अभियानाचे आयोजन करण्यात
आले असुन दिनांक २ मे रोजी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी.
बी. भोसले, प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. कांताराव झरीकर,
श्री.
सोपानराव अवचार, श्री. प्रतापराव काळे,
श्री.
विठ्ठलराव जवंजाळ, श्री. पी. जी. शिंदे,
श्री.
रोहिदास जाधव, श्री. माऊली पारधे आदींची प्रमुख
उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू
पुढे म्हणाले की, किडीच्या व्यवस्थापनासाठी योग्य माहिती विविध माध्यमातुन
शेतक-यांपर्यंत त्वरित पोहोचविणे गरजेचे असुन किडीचा संपुर्ण जीवनक्रमाबाबतची माहिती
शेतक-यांना द्यावी लागेल.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आपल्या
भाषणात म्हणाले की, हुमणी किडीबाबत मराठवाडयातील अनेक शेतकरी अनभिज्ञ असुन ही किड
एकदम संपुर्णपणे नियंत्रणात येऊ शकत नाही. हुमणी किड व्यवस्थापन करतांना मशागतीय
पध्दतीसह जैविक व रासायनिक पध्दतीचा एकात्मिकरित्या अवलंब शेतक-यांना करावा
लागेल. तसेच दुष्काळ परिस्थितही फळबागा वाचविण्यासाठी कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा
प्रसार सदरिल अभियानांतर्गत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. यु. एन. आळसे यांनी केले तर सुत्रसंचलन
प्रा. डी. डी. पटाईत यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी व विदयापीठातील विविध महाविदयालयाचे
प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते. जनजागृती अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्या हस्ते हिरवा
झेंडा दाखुन करण्यात आली. सदरिल अभियान विस्तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले
यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हयात दिनांक २ ते २७ मे दरम्यान तर हिंगोली
जिल्हयात दिनांक १ जुन ते १५ जुन २०१६ दरम्यान राबविण्यात येणार आहे.
अभियानाची सुरूवात प्रगतशील शेतक-यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आली |
परभणी कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला मशरूम कार्निव्हल
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या परभणी येथील कृषि महाविद्यालयातील आठव्या
सत्रातील विद्यार्थ्यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक १ मे रोजी
मशरूम कार्निवलचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा.
डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक
डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ
डि एन गोखले, सहयोगी अधिष्ठाता (निम्न शिक्षण) डॉ. डि. बी. देवसरकर, विभाग प्रमुख डॉ. डि. एन. धुतराज आदिंची प्रमुख
उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, अनुभव
आधारित शिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागत
आहे. आळंबी बाबत समाजात अनेक गैरसमज असुन मधुमेह असणा-यासाठी मशरूम हे कमी कॅलरी
असलेले चांगला आहार असुन विद्यार्थ्यांनी याबाबत समाजात जनजागृती करावी.
यावेळी विद्यार्थ्यांनी मशरूम पासुन बनविलेले विविध पदार्थ जसे लोणचे, केचप,
भजे, मशरूम बिर्याणी आदी तयार केले होते. मशरूमवर
आधारित घडीपत्रिका, पोस्टर, रंगोली आदीचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात
विद्यार्थ्यी कल्पना राठोड व आकाश यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाबाबत
आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. के. पी. आपेट यांनी
विद्यार्थ्यांनी राबविलेल्या आळंबी उत्पादन कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थ्यी विजय घाटोळ व अनुराधा बुचाले यांनी केले तर
आभार प्रदर्शन अत्युल्या नायर हिने केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख डॉ के टी
आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दहातोंडे, प्रशांत गिते, अरूणकुमार कठाळे, सुरेश चौरे, रत्नप्रकाश
लोखंडे, सुमित तुमोड, सुभाष इरतकर, ज्ञानेश्वर
सुरसेटवाड, जगन्नाथ निकम, नेहा गरूड, अश्विनी जगताप, जयश्री अंभोरे, जॉन के पी, योगेंद्र बनसोड, भारत खेलबाडे, मुकेश मिना, गोरख देवरे, श्रीलक्ष्मी, माधव पवार, अजित गावडे, गजानन शिंदे, बालाजी बोयेवार, प्रमोद पुंडगे, यशवंत देवरे
आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.
Monday, May 2, 2016
आदिवासी शेतकरी आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासुन वंचित राहु नये....... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
अखिल भारतीय समन्वित पाणी व्यवस्थापन प्रकल्पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित पाणी व्यवस्थापन
प्रकल्पामार्फत आदिवासी उपयोजनेंतर्गत हिंगोली तालुक्यातील मौजे आमदरी व करवाडी
येथील निवडक तेरा आदिवासी शेतक-यांना तुषार सिंचन संचाचे वाटप दिनांक १ मे रोजी
महाराष्ट्र दिनी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते करण्यात
आले. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कृषि महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
अध्यक्षयीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु
म्हणाले की, मराठवाडयातील दुष्काळ परिस्थिती पाहता शेतीसाठी पाणीचे नियोजन
करतांना ठिबक व तुषार सिंचन या आधुनिक सिंचन पध्दती अवलंबाशिवाय गत्यांतर नाही.
आदिवासी शेतकरीही या आधुनिक तंत्रज्ञानापासुन वंचीत राहु नये म्हणुन विद्यापीठ
निवडक आदिवासी बहुल गावांत कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करित आहे. आदिवासी
शेतक-यांनीही विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहुन आधुनिक कृषि तंत्रज्ञान
अवगत करावे, असे आवाहन त्यांनी केले. सदरिल प्रकल्पामुळे
आदिवासी शेतक-यांशी विद्यापीठाची नाळ जोडली गेली असल्याचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद
वासकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ए. एस. कडाळे यांनी प्रकल्पाबाबत
माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. जी. डि. गडदे यांनी तर आभार प्रदर्शन
प्रा. यु. एन. क-हाड यांनी केले. कार्यक्रमास मौजे आमदरी व करवाडी गावातील आदिवासी
शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी एन. के. गिराम, पी. एस. सावंत, डि. आर. कुरा, संजय देशमुख, रत्नाकर
पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात प्रकल्पातील पहारेकरी अच्युतराव पौळ हे
सेवानिवृत्त झाले असुन कामगार दिनानिमित्त कुलगुरूंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
Sunday, May 1, 2016
वनामकृवित महाराष्ट्र दिन साजरा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन
साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या मुख्य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. बी.
व्यंकटेश्वरलु यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र
दिन व कामगार दिनाच्या कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव श्री. दिलीपराव कच्छवे,
विद्यापीठ नियंत्रक श्री अप्पासाहेब चाटे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महेश
देशमुख आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व
विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.