Pages

Thursday, May 12, 2016

अवर्षण परिस्थितीमुळे यंदा विद्यापीठाचे बियाणे विक्रीस उपलब्‍ध नाही

शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद आदी खरिप पिकांतील सरळवाणांचे स्‍वत:कडील बियाणे वापरण्‍याचे विद्यापीठाचे आवाहन

शेतक-यांना बियाणे पुरवण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत प्रक्षेत्रावर मागील खरीप हंगामात मोठया प्रमाणावर सोयाबीन, मुग, उडीद आदी खरीप पिकांचे बिजोत्‍पादन कार्यक्रम घेण्‍यात आला होता, परंतु अवर्षण परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांच्‍या उत्‍पादनात लक्षणीय घट येऊन बिजोत्‍पादनाचे उदिदष्‍ट साध्‍य करता येऊ शकले नाही. कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील लातुर, उस्‍मानाबाद, बीड, परभणी, हिगोंली, नांदेड, औरंगाबाद व जालना जिल्‍हयातील संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावर पेरणी केल्यानंतर अवर्षण परिस्थितीमुळे ३० ते ४० टक्केच बीजोत्‍पादन झाले. येत्‍या हंगामासाठी कृषि विद्यापीठातर्फे सोयाबीन, मुग, उडिद आदी बियाणांची कमतरता असल्‍यामुळे बियाणे विक्रीस उपलब्‍ध होणार नाही. खरिप पिकांतील तुरीचे बीडीएन-७११, बीएसएमआर ७३६, खरिप ज्‍वारीचे पीव्‍हीके ८०१ व बाजरीचे एबीपीसी ४-३ या वाणाचे मर्यादित बियाणे विक्रीस उपलब्‍ध आहे. शेतक-यांनी सोयाबीन, मुग, उडिद आदी खरिप पिकांतील सरळवाणांचे स्‍वत:कडील बियाणे उगवण क्षमता तपासुन वापरावे, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्‍यात आले आहे.