Pages

Wednesday, May 18, 2016

पुर्वजांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शेतक-यांनीही दुष्काळास धैर्यांनी तोंड द्यावे.......मा. डॉ. गुरबचन सिंह

वनामकृवित खरीप शेतकरी मेळावास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
कृषि प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना
मेळाव्‍याचे उद्घाटन करतांना
विद्यापीठ निर्मीत बियाणे विक्रिचे उद्घाटन करतांना
मार्गदर्शन करतांना मा. डॉ. गुरबचन सिंह
अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डाॅ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

देशातील शेतकरी अन्‍न उत्‍पादन करून देशाची सेवा करीत असुन मानवासोबतच प्राणी, पशुपक्षी यांनाही अन्‍न पुरवण्‍याचे कार्य तो करतो आहे, तोच देशाचा अन्‍नदाता आहे. शेतक-यांच्‍या जोरावर व संशोधनाच्‍या आधारे देशाचे अन्‍नधान्‍य  उत्‍पादन साधारणत: ५० दशलक्ष टनावरून २६० दशलक्ष टन आपण नेऊ शकलो, देश अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. गेल्‍या तीन वर्षाच्‍या सततच्‍या दुष्‍काळ परिस्थितीमुळे काही शेतकरी आत्‍महत्‍यासारखा मार्ग अवलंबीत आहेत. आपल्‍या पुर्वजांनी अनेक संकटाचा धैर्यानी सामना केला, त्‍यांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन शेतक-यांनीही दुष्‍काळाशी दोन हात करावेत, असा सल्‍ला नवी दिल्‍ली येथील कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे अध्‍यक्ष मा. डॉ. गुरबचन सिंह यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ४४ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व महाराष्‍ट्र शासनाचे कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‍दिनांक १८ मे रोजी आयोजीत खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे, मा. श्रीमती सुस्मिताताई पवार, प्रगतशील शेतकरी मा. श्री. गोविंदराव पवार, माजी कृषि संचालक डॉ अनंतराव जावळे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, जिल्‍हा अधिक्षक कृषि‍ अधिकारी जालना श्री. दशरत तांबाळे, कृषी विकास अधिकारी डॉ. बळीराम कच्‍छवे, उपसंचालक श्रीमती रक्षा शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
   मा. डॉ. गुरबचन सिंह पुढे म्‍हणाले की, गावातील एखादा शेतकरी दुष्‍काळ परिस्थितीमुळे चिंताग्रस्‍त असल्‍यास त्‍यांच्‍याशी संवाद साधुन त्‍यास धीर देण्‍याचे आपल्‍या सर्वांचे कर्तव्‍य आहे. विद्यापीठाने उमेद कार्यक्रमातुन मराठवाडयातील तीनशे पेक्षा जास्‍त गावांंत शेतक-यांना धीर देण्‍याचा प्रयत्‍न केला, हा एक स्‍तुत्‍य उपक्रम आहे. हवामान बदलाच्‍या पार्श्‍वभुमीवर शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पीकांचे लागवड क्षेत्र वाढवावे लागेल. पीक लागवडीसह पशुसंगोपन, रेशीम उद्योग, कुकूटपालन आदी शेतीपुरक व्‍यवसायाचा समावेश असलेल्‍या एकात्‍मीक शेती पध्‍दतीचा अवलंब शेतक-यांनी केल्‍यास वर्षभर हातात पैसा खेळात राहील. कमी खर्चात शेतक-यांचे उत्‍पादन वाढीसाठी प्रयत्‍न करावे लागतील. अनेक देशात दुष्‍काळ परिस्थितीत कसा पध्‍दतीने सामना केला जातो याचा अभ्‍यास करण्‍यात यावा. शासन, समाज, विद्यापीठ, खाजगी कंपन्‍या आदींच्‍या सहकार्याने शेतक-यांचे उत्‍पादन वाढीसाठी प्रयत्‍न करावे लागतील. शेतक-यांनी पडणा-या पाऊसाच्‍या पाण्‍याचे जास्‍तीस जास्‍त उपयोग करण्‍यासाठी नियोजन करावे, शेततळयाच्‍या माध्‍यमातुन पाण्‍याची साठवण करावी. आपल्‍या देश नैसर्गिक साधनसंपत्‍तीने जगात समृध्‍द देश असुन भावी पिढीसाठी या साधनसंपत्‍तीचे जतन करावे लागेल, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले. 

     अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्थितीत जनावरांचा चा-याचा प्रश्‍न गंभीर झाला असुन खरिप हंगामात शेतक-यांनी खरिप ज्‍वारीचा पेरा वाढवावा तसेच कडधान्‍य पीकात तुर, मुग व उडिद लागवड क्षेत्रात वाढ करावी लागेल. पुढील वर्षी विद्यापीठ प्रक्षेत्रावर जास्‍तीत जास्‍त बीजोत्‍पादन कार्यक्रम हाती घेऊन विद्यापीठ बियाणाबाबत शेतक-यांची असलेली मोठी मागणी पुर्ण करण्‍याचा विद्यापीठाचा मानस असल्‍याचे त्‍यांनी आपल्‍या भाषणात सांगितले. 

  कार्यक्रमात विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री. रविंद्र पतंगे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतक-यांचा विद्यापीठप्रती मोठा विश्‍वास आहे, बदलत्‍या हवामानास अनूकुल पिक पध्‍दतीत बदल आपणास करावा लागेल, जास्‍त नफा देणा-या पिकांपेक्षा शाश्‍वत उत्‍पादन देणा-या पीकांची लागवड करावी लागेल. प्रगतशील शेतकरी श्री गोविंदराव पवार यांनी आपल्‍या भाषणात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करण्‍याचा सल्‍ला दिला तर जालना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री दशरत तांबाळे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. 

  प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी विद्यापीठाच्‍या कृषि विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख यांनी केले. या निमित्‍त आयोजीत परिसंवादात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी कापुस, सोयाबीन, तुर, हळद आदी पीक लागवड तंत्रज्ञान तसेच हुमणी किडीचे व्‍यवस्‍थापन, विहीर व कुपनलिका पुर्नभरण, शेळीमेंढी पालन, कोरडवाहु शेती व्‍यवस्‍थापन आदी विषयावर मार्गदर्शन केले व शेतक-यांच्‍या विविध शकांचे समाधान विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी केले. 

  कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमात कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या हळद लागवडवरील मोबाईल अॅपचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच विद्यापीठाच्‍या शेतीभाती मासिकाच्‍या खरीप पीक विशेषांकाचे, शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे व घडीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव व भगिनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यापीठ अधिकारी, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विद्यापीठ प्रकाशीत शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना

विद्यापीठ विकसित कृषि अवचाराची पाहणी करतांना

बीटी कपाशीतील एकात्मिक किड व्‍यवस्‍थापन सीटीचे विमोचन करतांना