वनामकृवित राष्ट्रीय पातळीवरील करडई व जवस पीकासंबंधी शास्त्रज्ञांची वार्षिक गट बैठक संपन्न
देशभरातील विविध राज्यातील सव्वाशे शास्त्रज्ञांचा सहभाग
मार्गदर्शन करतांना डॉ. जे. एस. संधु |
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु |
आज भारतास खाद्यतेल मोठया प्रमाणावर आयात करावे लागत असुन पुढील दहा वर्षात ही
मागणी मोठया प्रमाणात वाढणार आहे. यासाठी
तेलबिया पीकांच्या लागवडी खालील क्षेत्र वाढविणे आवश्यक असुन करडई सारख्या कमी
पाण्यावर येणा-या पीकांना अधिक महत्व द्यावे लागेल.
हवामान बदलाच्या पार्श्वभुमीवर कोरडवाहु क्षेत्रात करडई या पीकास
मोठा वाव असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे
उपमहानिदेशक मा. डॉ. जे. एस. संधु यांनी केले. वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे राष्ट्रीय
पातळीवरील करडई व जवस पीकांसंबंधी शास्त्रज्ञांची वार्षिक गट बैठकीचे आयोजन दिनांक
२ ते ४ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते,
बैठकीत उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु हे होत तर आयसीएआर चे सहाय्यक महानिदेशक
डॉ. बी. बी. सिंग,
संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, हैद्राबाद
येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विष्णुवर्धन
रेडडी, डॉ. पी. के. सिंग, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर.
शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा. डॉ.
जे. एस. संधु पुढे म्हणाले
की, जवस या पीकास तेलबीया पीक पेक्षा तंतुमय पीक म्हणुन प्रसार करावा लागेल.
शेतक-यांच्या परिस्थितीशी अनुकूल तंत्रज्ञान
दिले तरच त्याचा अवलंब शेतकरी करतील, यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्या गरजा व मागणी नुसार संशोधन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु म्हणाले की, इतर खाद्यतेलाच्या तुलनेत
करडई तेलात पोषणमुल्य अधिक आहेत, करडई तेलाचा औषधी व सौ़दर्य
प्रसाधनात वापर मोठया प्रमाणात करणे शक्य आहे. तसेच जवस पीकाच्या
धाग्यापासुन तयार कापडयास लोकांची मागणी वाढत आहे, यास मोठी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध असुन या पीकातील औषधी मुल्य वाढण्याच्या दृष्टीने
संशोधनाची गरज आहे.
प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी करडई पिकांच्या वाणाबाबत वनामकृविचे मोठे योगदान असुन विद्यापीठ विकसित परभणी कुसुम (परभणी-१२), बिनकाटेरी वाण परभणी-४०, परभणी
८६ (पुर्णा) आदी वाणांची
लागवड राज्याच नव्हे तर इतर राज्यात मोठया क्षेत्रावर केली जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर करडई पैदासकार
डॉ एस बी घुगे आभार मानले. बैठकीस महाराष्ट्र, कर्नाटक,
उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, बिहार,
आंध्रप्रदेश, तेलंगणा, आसाम,
मेघालय आदी राज्यामधुन करडई व जवस पीकासंबंधी १२५ शास्त्रज्ञ
उपस्थित होते. बैठकीत करडई व जवस पिकांबाबत संशोधनाबाबत चर्चा करून या पीकाच्या
पुढील संशोधनाची दिशा निश्चित करण्यात आली.