Pages

Saturday, February 18, 2017

जागतिक बँकेचे तज्ञ डॉ. एन.एच. रविंद्रनाथ यांच्या उपस्थित हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाची बैठक संपन्न

जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने राज्‍यात रा‍बविण्‍यात येणा-या हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाच्‍या (पोक्रा) पुर्वतयारीची झाली चर्चा
राज्‍यात रा‍बविण्‍यात येणा-या जागतिक बॅकेच्‍या अर्थसहाय्याने हवामान अनुकूल कृषी प्रकल्‍पाच्‍या (पोक्रा) पुर्वतयारी बाबत दि. १० फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय येथे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व जागतिक बँकेचे तज्ञ तथा बेंगळुर येथील भारतीय विज्ञान संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ प्रा. डॉ. एन. एच. रविंद्रनाथ यांच्‍या प्रमुख उपस्थित बैठक संपन्‍न झाली. बैठकीचे आयोजन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते.
महाराष्‍ट्रातील मराठवाडा, विदर्भ व खानदेश (जळगांव) या विभागातील १५ जिल्‍ह्यांमध्‍ये जागतिक बँकेच्‍या सहाय्याने हवामान अनुकूल कृषि प्रकल्‍प (पोक्रा) म्‍हणजेच नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प राबविण्‍यात येणार असुन मराठवाडा विभागातील सर्वच आठही जिल्‍ह्यांचा समावेश राहणार आहे. शेतक-यांची अन्‍न व आर्थिक सुरक्षा टिकवुन ठेवण्‍याच्‍या उद्देशाने पाणी व जमीन यांची उत्‍पादकता टिकवुन ठेवणे, हवामानातील बदलास अनुसरुन पीक बदल करणे, उपलब्ध पाण्‍याचा कार्यक्षम वापर करणे, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांच्‍या सहाय्याने शेतमाल विक्री व्‍यवस्‍था बळकट करणे आदी उपक्रम या प्रकल्‍पात प्रस्‍तावित आहेत. या प्रकल्‍पाच्‍या पुर्वतयारीचा आढावा घेण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अंतर्गत विविध जिल्‍ह्यात कार्यरत कृषि संशोधक, विस्‍तार कृषि विद्यावेता यांचेशी चर्चा करण्‍यात आली. मराठवाडा विभागातील पीक रचना, हवामान, प्रकल्‍प क्षेत्रातील जिल्‍ह्यातील (ग्रीन हाऊस गॅस इमिशन व त्‍यास कारणीभुत घटक) तापमान वाढीस कारणीभुत घटक, जमिनी व जमिनीची वैशिष्‍ट्ये, कर्बाची स्थिती व कर्ब ग्रहण वाढविण्‍यासाठी विविध उपाययोजना आदीवर बैठकीत चर्चा करण्‍यात आली. बैठकीत मार्गदर्शन करतांना कुलगुरु मा. डॉ. बी. वेकंटेश्‍वरलु म्‍हणाले की, कोरडवाहु शेती यशस्‍वी करण्‍यासाठी दिर्घकालीन प्रणाली विकसीत करण्‍याचे व त्‍याचा समावेश या प्रकल्‍पात करणे गरजेचे असुन पावसाच्‍या पाण्‍याचे संवर्धन व कार्यक्षम वापर, जमिनीची सुपिकता व बिजोत्‍पादन या त्रिसुत्रीवर भर देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी यावेळी शास्‍त्रज्ञांना दिला.
शास्‍त्रज्ञ प्रा. डॉ. एन. एच. रविंद्रनाथ यांनी सदरील प्रकल्‍प शेतक-यांना उपयोगी ठरण्‍यासाठी शास्‍त्रज्ञांनी कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करावा तसेच मागील २५ - ३० वर्षाच्‍या पावसाच्‍या आकडेवारीचा अभ्‍यास करुन आदर्श मॉडेल विकसित करावे, असे सांगितले.

     संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी सदरिल प्रकल्‍पाचा प्रकल्‍प अहवाल व अंर्तभुत तंत्रज्ञानामध्‍ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा मोठा सहभाग असुन विद्यापीठ आपले योगदान व तांत्रिक पाठबळ या प्रकल्‍पास उपलब्‍ध करुन देण्‍यास सज्‍ज आहे, असे सांगितले. मुख्‍यशास्‍त्रज्ञ डॉ. बी. व्‍ही. अासेवार यांनी कोरडवाहु शेतीचे तंत्रज्ञान व नवीन उपाययोजना यावर सादरीकरण केले. बैठकीस एकात्‍मीक शेती पध्‍दती, कापुस संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, कोरडवाहु संशोधन केंद्र, कृषि संशोधन केंद्र बदनापुर व विविध संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी, शास्‍त्रज्ञ, विस्‍तार कृषि वेत्‍ता उपस्थित होते. यात डॉ. डब्‍लु, एन. नारखेडे, डॉ. के. एस. बेग, डॉ. व्‍ही. डी. सोळंके, डॉ. एम. के. घोटके, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. डी. एस. पेरके, डॉ. यु. एन. आळसे, प्रा. ऐ. व्‍ही. गुट्टे, डॉ. जी. के. गायकवाड, डॉ. के. के. डाखोरे, डॉ. सरोदे, डॉ. लोमटे आदी उपस्थित होते. प्रकल्‍पात संरक्षित सिंचन, जमिनीची सुपिकता, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, बिजोत्‍पादन, वनशेती, पावसाच्‍या आकडेवारीचा उपयोग, एकात्‍मीक शेती पध्‍दती आदी महत्‍वाच्‍या विषयावर चर्चा करण्‍यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. आनंद गोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. बी. व्‍ही. आसेवार यांनी केले.