Pages

Saturday, March 18, 2017

अधिक उत्‍पादनासाठी हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी सांगितली हळद लागवडीतील पंचसुत्रे

वसमत येथील शेतकरी मेळाव्‍यास शेतक-यांचा मोठा प्रतिसाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहीती केंद्र व तालुका कृषि अधिकारी वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे दिनांक 17 मार्च रोजी आयोजन वसमत येथे करण्यात आले होते. मेळाव्यात हळद लागवड तंत्रज्ञान या विषयावर कसबे डिग्रस (ता. मिरज जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राचे हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. व्ही. डी. लोखंडे हे होते तर उपविभागीय कृषि अधिकारी श्री. यु. जी. शिवणगावकर, आत्माचे प्रकल्प उपसंचालक, श्री. एम. डी. तिर्थनकर, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, तालुका कृषि अधिकारी श्री. गजानन पवार, उद्यानविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. एम. कुलकर्णी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. ए. एस. पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना हळद तज्ञ डॉ. जितेंद्र कदम हे म्हणाले की, मराठवाडयातील हळद उत्‍पादक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांपेक्षा उत्पादकतेच्या बाबतीत पुढे जात असुन हळद लागवड करतांना पंचसुत्रांचा विशेष विचार करावा, यात योग्‍य जमिन, बीजप्रकिया, लागवड पध्‍दत, खत व किड व्यवस्थापनप्रक्रिया आदींत आधुनिक तंत्राचा अवलंब करावा. यामुळे निश्चितच हळदीचे अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. याकरिता शेतक-यांनी वेळोवेळी विद्यापीठाची मदत घ्यावी. यावेळी डॉ जितेंद्र कदम यांनी योग्‍य वेळी योग्‍य तंत्राचा कसा अवलंब केला पाहिजेत याविषयी शेतक-यांना सविस्तर माहिती देऊन शेतक-यांच्‍या हळद लागवडीबाबतच्‍या विविध शंकाचे निराकरण केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. व्हि. डी. लोखंडे आपल्‍या मार्गदर्शनात कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्‍यास परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयातील पाचशे पेक्षा जास्त शेतक-यांनी उपस्थिती नोंदवीली. कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी विद्यापीठाच्या विविध विस्तार कार्यक्रमाबद्दल व माहिती केंद्रातर्फे विकसीत हळद लागवडीवर आधारित मोबाईल अॅप बद्दल माहिती सांगितल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डी. डी. पटाईत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस. जी. पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि तंत्रज्ञान माहीती केद्रांच्या व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम केले.