Pages

Sunday, March 19, 2017

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र प्रेरित गृहउद्योगाच्‍या दालनास “एक भारत श्रेठ भारत” प्रदर्शनात पुरस्कार


ओडिशामधील भुवनेश्‍वर येथे आयोजित एक भारत श्रेष्‍ठ भारत प्रदर्शनात औरंगाबाद जिल्‍हयातील दितिजा गृह उद्योग व सिध्‍दी गृह उद्योगाच्‍या दालनास पुरस्‍कार देऊन नुकतेच सन्‍मानित करण्‍यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या मार्गदर्शनाखाली सदरिल गृहउद्योगाची उभारणी करण्यात आली असुन विविध प्रदर्शनात त्‍यांच्‍या यशस्‍वी सहभागामुळे त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले. प्रदर्शनात एमएसएसआयडीसी मार्फत निवड करून कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद प्रेरित तीन स्टॉलची निवड करून पाठविण्यात आले. यापैकी दितिजा गृहउद्योग व सिद्धि गृहउद्योग या स्टॉल ला पुरस्कार देऊन उघोजिकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राचे संस्कृती विभागाचे संचालक श्री संजय पाटील, ओडिसा राज्याचे संस्कृती विभागाचे संचालक श्री नितिन बागडे व एम.एस.एम.इ. ओडिसा चे मुख्य सचिव मा. श्री. गुप्ताजी यांचा हस्ते पुरस्कार देण्यात आले.
दितिजा गृहउद्योगाचे रेखा रविंद्र बहटूरे यांनी ऑगस्ट 2016 मध्‍ये कृषि विज्ञान केंद्राव्‍दारे आयोजित 20 दिवसीय अन्नप्रक्रिया प्रशिक्षणात प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणात कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) प्रा. दीप्ती पाटगावकर यांनी फळे व भाजी-पाला प्रक्रिया, दूध प्रक्रिया, सोया प्रक्रिया, बेकरी उद्योग, शेवगा प्रक्रिया आदी विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले होते. यात आरोग्यासाठी शेवग्याचा पानाचा वापर करून शेवगा पराठा शिकविण्यात आले. रेखा बहटूरे यांनी कृषि विज्ञान केंद्राचे सतत मार्गदर्शन घेऊन पौष्टिक शेवगा पराठाचा उद्योग दितिजा गृहउद्योगा मार्फत सुरवात केली. माहे ऑक्टोबर 2016 पासून आज अखेर पर्यन्त औरंगाबाद मधील प्रत्येक प्रदर्शनात सहभाग घेऊन पौष्टिक शेवगा  पराठयाची ओळख करून त्यांनी एक कुशल व सफल उद्योजिका होऊन 1 लाख 30 हजारा पर्यन्तचे उत्पन्न मिळविले. तसेच सिद्धि गृहउद्योगाचे जया जगदीश सबदे या कृषि विज्ञान केंद्राच्‍या मार्गदर्शनाखाली विविध प्रकाराचे शेवया तयार करून पोष्टिक शेवयाचा उद्योग करतात. त्‍यांनीही चार वर्षापूर्वी कृषि विज्ञान केंद्रात प्रशिक्षिण घेतले होते. आज त्या 15 प्रकारचे फ्लेवर मध्ये शेवया बनवितात व महिना 15000/- पर्यन्त उत्पन्न मिळवितात. या दोन्ही यशस्वी उद्योजिकांना विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले व कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून प्रोत्साहीत केले.