Pages

Monday, March 20, 2017

मराठवाडयातील दुर्गम आदिवासी भागातही कृषी तंत्रज्ञान पोहचविण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील.....कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित आदिवासी शेतकरी मेळावा संपन्न

विद्यापीठाच्या विविध संशोधन योजनाद्वारे आदिवासी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत व तांत्रिक सहाय्य देण्यात येईल, कृषी तंत्रज्ञान मराठवाडयातील दुर्गम आदिवासी भागातही पोहचविण्‍यासाठी विद्यापीठ प्रयत्‍नशील असुन आदिवासी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने दि. १७ मार्च रोजी आदिवासी शेतकरी मेळावा आयोजित विद्यापीठात करण्यात आले होते, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. विलास पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ डि एन गोखले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. सुनील गोरंटीवार, प्रकल्पाचे मुख्यशास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास विद्यापीठ कटीबध्‍द आहे. सदरिल नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल पाणी व्यवस्थापन प्रकल्पातील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. 
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर यांनी आपल्‍या मार्गदर्शनात विद्यापीठाच्‍या कृषी संशोधनातील योगदानावर प्रकाश टाकुन विद्यापीठामार्फत आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. मौजे जावरला गावचे तंटामुक्ती सभेचे अध्यक्ष श्री माधवराव मरसकोल्हे यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी विद्यापीठ करीत असलेल्या शेतीविषयक विकास कामाबाबत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. मेळाव्यात डॉ. अशोक जाधव यांनी कापूस पिक लागवडीवर तर डॉ. शिवाजी मेहेत्रे व डॉ. दयानंद मोरे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. 
मौजे जावरला (ता किनवट, जि नांदेड) हे गाव महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपालाच्‍या वतीने दत्तक घेतले असुन पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्‍याचा सदरिल प्रकल्‍पाचा उद्देश आहे. मेळाव्यात माननीय कुलगुरू व उपस्थित मान्यवरांचे हस्ते पाणी व्यवस्थापन प्रकल्पामार्फत भारतील कृषी अनुसंधान परिषदेच्या आदिवासी उपयोजना अंतर्गत निवडक शेतकऱ्यांना मोफत तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांसाठी विद्यापीठातील शिवार फेरीचे आयोजन करून ठिबक सिंचनावर लागवड केलेल्या विविध पिक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. तुषार व ठिबक सिंचन संचाची जोडणी, सिंचन पध्दतींचा वापर याबाबतची तांत्रिक माहिती व प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखविण्यात आली. 
कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात मुख्य शास्त्रज्ञ डॉ. उदय खोडके यांनी पाणी व्यवस्थापन प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञान शिफारसीबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन गडदे यांनी केले. मेळाव्यास मौजे जावरला येथील पुरुष व महिला शेतकरी, सरपंच, विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, योजनांचे प्रभारी अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी प्रा. उत्तम कराड, प्रा. बी. एन. आगलावे, श्री नंदकिशोर गिरम, डी. आर. कुरा, दादाराव भरोसे, रत्नाकर पाटील, संजय देशमुख, प्रकाश मोते, विलास जाधव, प्रभाकर रनेर यांनी विशेष प्रयत्न केले.