Pages

Sunday, September 17, 2017

शेतक-यांनी सामुहिकरित्‍या गटशेतीच्‍या माध्‍यमातुन शेती करावी.......सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील

वनामकृविच्‍या रब्‍बी पीक शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद
मेळाव्‍याचे उद्घाटन दिपप्रज्‍वलनाने करतांना

विद्यापीठ बियाणे विक्रीचे उद्घाटन करतांना
विद्यापीठ प्रकाशित शेतीभाती मासिकांच्‍या रबी पीक विशेषांकाचे विमोचन करतांना

देशाची व राज्‍याची प्रगती ही शेती व शेतकरी यांच्‍यावर अवलंबुन आहे. मराठवाडयातील शेती मुख्‍यत: कोरडवाहु असुन शासनाच्‍या अनेक योजना शेवटच्‍या शेतक-यापर्यंत पोहचविण्‍याचा शासनाचा प्रयत्‍न आहे. शेतक-यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्‍यासाठी शेतीपुरक जोडधंदा करणे आवश्‍यक असुन मराठवाडयात शेतमाला प्रक्रिया उद्योग विकसित झाले पाहिजेत. शेतक-यांनी एकत्रित येऊन सा‍मुहिकरित्‍या गटशेतीच्‍या माध्‍यमातुन शेती करावी, असे प्रतिपादन सहकार राज्‍यमंत्री तथा परभणी जिल्‍हयाचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, परभणी (महाराष्‍ट्र शासन) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक 17 सप्‍टेबर रोजी रबी पीक शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते, तर परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव, परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे, प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील पुढे म्‍हणाले की, यावर्षी पडलेल्‍या पाऊसाचा जलयुक्‍त शिवार योजनेच्‍या कामामुळे रब्‍बी हंगामात निश्चितच उपयोग शेतक-यांना होणार आहे. पडलेल्‍या पाऊसाच्‍या पाण्‍याचा शेतीत चांगल्‍या प्रकारे उपयोग करण्‍यासाठी प्रत्‍येक शेतक-यांनी कुपनलिका व विहिर पुनर्भरण केलेच पाहिजे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ रा‍बवित असलेला शेतक-यांना दिलासा देणारा उमेद कार्यक्रम निश्चितच कौतुकास्‍पुद असुन विद्यापीठ विकसित विविध पिकांचे वाण निश्चितच ठरत उपयुक्‍त आहेत.  शेतक-यांच्‍या विकासासाठी शासन व विद्यापीठ सदैव पाठिशी आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठाकडे रब्‍बी पीकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्‍ध असुन शेतकरी गटांना बीजोत्‍पादनासाठी विद्यापीठ प्रो़त्‍साहित करित आहे. विद्यापीठाचे कापसाचे वाण नांदेड 44 यांचे बीटीमध्‍ये परावर्तन करण्‍यात येत असुन येणा-या खरिप हंगामात नांदेड 44 या वाणाचे बीटी बियाणे मर्यादित प्रमाणात शेतक-यांसाठी उपलब्‍ध होईल. उस्‍मानाबादी शेळीचे शुध्‍द वंश निर्मितीचे संशोधन कार्य विद्यापीठात प्रगतीपथावर असल्‍याचे प्रतिपादन त्‍यांनी केले.    
परभणी लोकसभा सदस्‍य मा. खा. श्री. संजय जाधव यांनी आपल्‍या भाषणात परभणी जिल्‍हयात शेतमाला प्रक्रिया उद्योगास चालना देण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर परभणी विधानसभा सदस्‍य मा. आ. डॉ. राहुल पाटील यांनी जलयुक्‍त शिवार कामामुळे पाऊसाच्‍या पाण्‍याचा रबी हंगामासाठी उपयोग होईल असे प्रतिपादन आपल्‍या भाषणात केले.
प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ विना भालेराव यांनी केले तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. विद्यापीठ विकसित रब्‍बी पीकांच्‍या वाणांचे बियाणे विक्रीचे उद्घाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच विद्यापीठ कृषि तंत्रज्ञानावर आधारीत कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. विद्यापीठाचे शेतीभाती मासिकाचा रब्‍बी पीक विशेषांकाचे व शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपत्रिकांचे विमोचन करण्‍यात आले.
मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ यु एन आळसे, प्रा. बी व्‍ही भेदे, डॉ गोसावी, प्रा. एस एस सोळंके, डॉ एम बी पाटील, डॉ एस व्‍ही पवार, डॉ ए पी सुर्यवंशी, प्रा. डि डि टेकाळे, डॉ बी व्‍ही आसेवार, डॉ एस जे शिंदे, प्रा. दिलीप मोरे, डॉ बी एम ठोंबरे, डॉ ए जी पंडागळे, डॉ एस बी पवार, प्रा ए व्‍ही गुट्टे, डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, डॉ सी बी लटपटे, डॉ आनंद बडगुजर आदींनी रब्‍बी पीक लागवड तंत्रज्ञान, पीकांवरील कीड रोग व्‍यवस्‍थापन व इतर विविध विषयावर मार्गदर्शन करून शेतक-यांच्‍या शेती विषयक शंकाचे समाधान केले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.