Pages

Friday, June 1, 2018

माननीय कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या कार्यकाळातील वनामकृविच्‍या उपलब्‍धी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सतरावे कुलगुरू म्‍हणुन कोरडवाहु शेती संशोधनातील आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ मा.  डॉ.  बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०१४ रोजी पदभार स्‍वीकारला, ३१ मे २०१८ म्‍हणजेचे चार वर्ष चार महिने या पदाचा कार्यकाळ यशस्‍वीपणे पुर्ण केला. या कार्यकाळात विद्यापीठाच्‍या संशोधन, शिक्षण व विस्‍तार कार्यास दिशा दिली. त्‍यांच्‍या कार्यकाळातील विद्यापीठाच्‍या काही महत्‍वाच्‍या उपलब्‍धी पुढील प्रमाणे.
संशोधन कार्य
  या कार्यकाळात विद्यापीठाने महाबिज सोबत सांमजस्‍य करार करून विद्यापीठ विकसित व शेतक-यांमध्‍ये पुर्वी मोठया प्रमाणात प्रचलित असलेला नांदेड-४४ हा कापसाचा संकरित वाण बीजी-२ मध्‍ये परावर्तीत करण्‍यात आला. त्‍याचे बियाणे येणा-या खरीप हंगामात मर्यादित प्रमाणात शेतक-यांना उपलब्‍ध होणार असुन बीटी स्‍वरूपातील विद्यापीठाचे हे पहिलेच वाण ठरले आहे. या कालावधीत विद्यापीठाने सोयाबिन, कापुस, ज्‍वारी, बाजरी आदी गळीतधान्‍ये व कडधान्‍याचे एकुण १२ नवीन वाण संशोधित करून शेतक-यांसाठी लागवडीसाठी उपलब्‍ध झाले. यातील एमएयुएस-१६२ हा सोयाबीनचा यंत्राव्‍दारे काढणीसाठी उपयुक्‍त वाण शेतक-यांमध्‍ये मोठया प्रमाणात प्रचलित झाला आहे. याच काळात एकुण १२ नवीन कृषी औजारे विकसित करण्‍यात आले. फवारणी करतांना आरोग्‍यासाठी घातक असलेल्‍या कीडकनाशकांची फवारणी करतांना शेतक-यांचा कमीत कमी संपर्क यावा यासाठी सौर ऊर्चाचलित व बैलगाडीचलित फवारणी यंत्र विकसित करण्‍यात आले.
शेतक-यामध्‍ये विद्यापीठ विकसित विविध पिकांच्‍या बियाणास मोठी मागणी आहे. विद्यापीठातील मध्‍यवर्धी प्रक्षेत्रावरील सिंचन सुविधांचे सक्षमीकरण करून बीजोत्‍पादनाखालील क्षेत्रात वाढ करण्‍यात आली. सद्यस्थितीत या प्रक्षेत्राची क्षमता वार्षिक दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाची असुन बीजोत्‍पादन मोठया प्रमाणावर यांत्रिकीकरणाच्‍या माध्‍यमातुन कार्यक्षमरित्‍या राबविण्‍यात येऊन मजुरीवरील खर्चात बचत करण्‍यात येत आहे.
एकुण आठ प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन संशोधनाकरिता रू ११.२१ कोटीचा अतिरिक्‍त निधी उपलब्‍ध झाला. यातील कडधान्‍यासाठी दोन सीडहब व सोयाबीनसाठी एक सीडहब साठी सहाय्य करण्‍यात आले. भारतइस्‍त्राईल सहयोगाने औरंगाबाद येथे केशर आंबा वरील सेंटर ऑफ एक्‍सेलन्‍स प्रकल्‍प कार्यान्‍वीनीत करण्‍यात आला. मराठवाडयातील कोडरवाहु क्षेत्रात रुंद वरंबा व सरी पध्‍दत व विहीर कुपनलिका पुर्नभरण पध्‍दत आदी जलसंवर्धन तंत्रज्ञानाचे विद्यापीठाने प्रमाणिकरण करून मोठया प्रमाणावर शेतक-यांमध्‍ये प्रसार करण्‍यात केला. महाराष्‍ट्र शासनाच्‍या जलयुक्‍त शिवार कार्यक्रमास वनामकृविच्‍या वतीने शास्‍त्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन प्रशिक्षण व तांत्रिक सहकार्य केले.
विद्यापीठाचे तंत्रज्ञान अति दुर्गम भागातील आदिवासी शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍याच्‍या दृष्‍टीने आदिवासी उपयोजनेच्‍या माध्‍यमातुन भारत सरकारच्‍या निधीचा कार्यक्षमरित्‍या उपयोग करून नांदेड जिल्‍हयातील एकघरी व हिंगोली जिल्‍हयातील वाई या गावात विशेष प्रकल्‍प राबवुन आदिवासी शेतक-यांच्‍या शेतीमध्‍ये मोठया प्रमाणात परावर्तन घडवुन आणले. राष्‍ट्रीय कृषि विकास योजनेच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील अल्‍प-भुधारक शेतक-यांसाठी उपयुक्‍त असे शेतीपुरक जोडधंदा रेशीम उद्योगास व उस्‍मानाबादी शेळीपालनाच्‍या संशोधनास चालना देण्‍यात आली.
शैक्षणिक कार्य
कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये कौशल्‍य विकासावर अधिक भर देणारा व भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या पाचव्‍या अधिष्‍ठाता समितीच्‍या अहवालानुसार पदवी अभ्‍यासक्रम विद्यापीठात सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासुन राबविण्‍यास प्रारंभ करण्‍यात आला. पदवी अभ्‍यासक्रमाचे परीक्षेचे निकाल वेळेत लावण्‍यासाठी बारकोड यंत्रणा  सुरूवात करण्‍यात आली तसेच उत्‍तरपत्रिकेचे वेळेत मुल्‍यमापनासाठी लातुर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्‍यात आले. सन २०१७ पासुन सर्व घटक महाविद्यालयात ऑनलाईन फि भरण्‍याची सुविधा सुरू करण्‍यात आली असुन सर्व शिष्‍यावृत्‍तीची रक्‍कम देखिल ऑनलाईन माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांच्‍या खात्यावर जमा करण्‍यात येत आहे.
आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे कृषि शिक्षण व संशोधनाची संधी विद्यापीठाचे विद्यार्थ्‍यी व शास्‍त्रज्ञांना प्राप्‍त व्‍हावी याकरिता स्‍पेन, पोर्तुगाल, तुर्की व जर्मनीतील विद्यापीठे व संस्‍थेशी सामंजस्‍य करार करण्‍यात आले. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासावर विशेष भर देण्‍यात येऊन विविध क्षेत्रातील नामांकित तज्ञ व विद्यापीठाचे यशस्‍वी माजी विद्यार्थ्‍यांच्या व्‍याख्‍यान कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन करण्‍यात आले. तसेच विद्यार्थ्‍यामध्‍ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्‍हावी याकरिता वेळोवेळी स्‍वच्‍छ भारत अभियान, वृक्ष लागवड व प्‍लास्‍टीक मुक्‍त परिसरासाठी महाविद्यालयात अभियान राबविण्‍यात आले. विद्यार्थ्‍यामधील सांस्‍कृतिक व क्रीडा क्षेत्रातील कला गुणांना वाव मिळावा याकरिता राज्‍यस्‍तरिय सन २०१६ मध्‍ये क्रीडा महोत्‍सव व सन २०१७ मध्‍ये इंद्रधनुष्‍य या कार्यक्रमाचे यशस्‍वीरीत्‍या आयोजन करण्‍यात आले. विद्यार्थ्‍यी रोजगार मार्गदर्शन व समुदेशन कक्षाचे सक्षमीकरण करण्‍यात आले.
भारतीय कृषि संशोधन परिषदेने विद्यापीठास अधिस्‍वीकृती देतांना विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खासगी महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा व विद्यापीठातील रिक्‍त पदांचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याचा विचार करता मराठवाडयातील विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व खासगी महाविद्यालये व शाळेचे मुल्‍यमापन पुर्ण करून शैक्षणिक गुणावत्‍तेनुसार श्रेणी प्रसिध्‍द करण्‍यात आली. विद्यापीठातील विविध स्‍तरावरील शैक्षणिक पदभरतीसाठी प्रयत्‍न करण्‍यात आले. गेल्‍या तीन वर्षात नामनिर्देशण व बढतीच्‍या माध्‍यमातुन एकुण ६९ सहाय्यक प्राध्‍यापक व ३८ सहयोगी प्राध्‍यापकांची नेमणुक करण्‍यात आली. तसेच कृषि परिषदेच्‍या समन्‍वयाने गेल्‍या दहा वर्षातील प्रलंबीत असलेली विद्यापीठ कर्मचा-यांची कारकीर्द प्रगती योजनातील बढती प्रकरणे पुर्णपणे निकाली काढण्‍यात आली. विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य तसेच संचालकांची पदे शासनाने मान्‍यतेच्‍या मर्यादेपर्यत पुर्णपणे भरण्‍यात आली. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, विशेष प्रवर्ग व शारिरीक अपंग प्रवर्गातील ५२ चर्तुथ श्रेणीतील अनुशेष भरण्‍यात आला. विद्यापीठ अधिस्‍वीकृतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या बाबींची एप्रिल २०१८ पर्यंत पुर्णत: करण्‍यात येऊन स्‍वयं मुल्‍यांकन अहवाल भारतीय कृषि अनुसंधान परिषदेस सादर करण्‍यात आला आहे.
विद्यापीठ प्रकल्‍पग्रस्‍तांचा प्रलंबीत असलेल्‍या प्रश्‍न म्‍हणजेच ११७ विद्यापीठ प्रकल्‍पग्रस्‍त व्‍यक्‍तींना वर्ग-३ व वर्ग-४ पदावर नौकरीवर विद्यापीठात सामावुन घेण्‍यात आले. तर ३५३ रोजंदारीवर असलेल्‍या मजुरांना वर्ग-४ पदावर नियमित सेवेत घेण्‍यात आले तर २६७ कुशल व अर्धकुशल कामगारांना वर्ग-३ व वर्ग-४ रिक्‍तपदावर विद्यापीठात सामावुन घेण्‍यात आले.
कृषि विस्‍तार कार्य
विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांच्‍या सहभागाने मराठवाडयातील नैराश्‍यग्रस्‍त शेतक-यामध्‍ये उमेद निर्मिताकरिता चारशेपेक्षा जास्‍त गावात उमेद हा विशेष कार्यक्रम राबविण्‍यात आला. सुधारित कृषि तंत्रज्ञानाचा शेतक-यापर्यंत प्रभावी व त्‍वरीत प्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात येत असुन गेल्‍या तीन वर्षात विद्यापीठाच्‍या वतीने दहा मोबाईल अॅप्‍स विकसित करण्‍यात आले असुन याचे एक लाख पेक्षा जास्‍त वापरकर्ते झाले आहेत. विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान प्रसारासाठी व संयुक्‍त संशोधनासाठी खासगी संस्‍थे सोबत तीन साम्‍यजंस्‍य करार करण्‍यात आले आहेत.
मुलभुत सुविधा
परभणी येथे शंभर खाटांची सोय असलेले देवगिरी हे मुलांच्‍या वसतीगृहाचे उदघाटन करून विद्यार्थ्‍यांसाठी उपलब्‍ध करण्‍यात आला असुन कृषि शिक्षणाकडे मुलींचा वाढता ओढा लक्षात घेता परभणी व लातुर येथे एक मुलींचे वसतीगृहाचा प्रस्‍ताव भारतीय कृषि अनुसंधान परिषदेस सादर करण्‍यात आला असुन तो मान्‍यतेसाठी विचारधीन आहे. तसेच विद्यापीठास्‍तरिय शैक्षणिक संग्रहालय व अतिथी गृहाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाची प्रशस्‍त वर्गखोल्‍या व प्रयोगशाळा सह बहुउद्देशीय इमारतीचे काम पुर्ण झाले असुन मुख्‍य महाविद्यालयाच्‍या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे.
इतर कार्य
याच कार्यकाळात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी महाराष्‍ट्र शासनाने सोपविलेले विविध जबाबदा-या यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या. यात दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ व अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू पदाचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळला. तसेच राहुरी व अकोला कृषि विद्यापीठाच्‍या विभाजनासाठी महाराष्‍ट्र शासनाने नियुक्‍त केलेल्‍या समितीचे अध्‍यक्ष म्‍हणुन काम करून अहवाल शासनास सादर केला. महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठे कायदा व अधिनियमात सुधारणेसाठी राज्‍य शासनाने गठित केलेल्‍या समितीचे अध्‍यक्ष म्‍हणुन काम पाहिले. चारही कृषि विद्यापीठाच्‍या कुलगुरू समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष म्‍हणुन काम पाहिले.
राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाच्‍या सहभागाने वाल्‍मी, औरंगाबाद येथे हवामान बदल व कृषिक्षेत्रावरील परिणाम यावर आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे यशस्‍वी आयोजन करून ही परिषद म्‍हणजे राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील नामांकित शास्‍त्रज्ञांचे विचार ऐकण्‍याची राज्‍यातील युवा कृषि शास्‍त्रज्ञांसाठी मोठी पर्वणी ठरली.

विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपले कार्य हे कोणत्‍याही प्रकारची त्रुटी न ठेवता तत्परतेने करण्‍याचा नेहमीच माडॉबीव्‍यंकटेश्‍वरलु यांचा आग्रह असायचा. विद्यापीठाच्‍या कृषि संशोधन, शिक्षण व विस्‍तार कार्यास त्‍यांनी दिलेली दिशा विद्यापीठाच्‍या उत्‍कृर्षासाठी भावी काळात निश्चितच उपयुक्‍त ठरेल.