Pages

Thursday, August 16, 2018

देशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची निर्णायक भुमिका.....कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित स्‍वांतत्र्य दिन उत्‍साहात साजरा

स्‍वातंत्रोत्‍तर काळामध्‍ये देशाला अन्‍नसुरक्षा मिळुन देण्‍यात कृषि विद्यापीठांची एक निर्णायक अशी भुमिका असुन राज्‍यातील तसेच मराठवाडयातील कृषी विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे मोठे योगदान आहे. शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थ्‍यी आणि संपुर्ण समाज यांच्‍या सामाजिक व आर्थिक उन्‍नतीसाठी विद्यापीठ सतत कार्यरत आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७२ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, प्राचार्य डॉ डि एन गोखले, प्राचार्य डॉ हेमांगिनी संरबेकर, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ तांबे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, कृषि विकासात विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण या तिन्‍हीच्‍या समन्‍वयातुन योग्‍यरित्‍या कार्य करत आहे. कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाने देशाला व राज्‍याला अनेक अधिकारी व कर्मचारी दिले आहेत. परंतु आज गरज आहे, कृषि उद्योजक निर्माण करण्‍याची, यासाठी गेल्‍या वर्षी विद्यापीठाने स्‍वीकारलेल्‍या पाचव्‍या अधिष्‍ठाता समिती शिफारशीं निश्चितच उपयुक्‍त ठरणार आहे. विविध पिकांचे वाण विद्यापीठाने विकसित केली आहेत, त्‍याचा शेतक-यांना निश्चितच फायदा होत आहे. यावर्षी विद्यापीठाने विकसित केलेला देशातील पहिला जैवसमृध्‍द परभणी शक्‍ती या ज्‍वारीच्‍या वाणांची भर पडली आहे. यापुढेही कृषि संशोधनात भरीव कामगिरी करण्‍याचा विद्यापीठाचा प्रयत्‍न आहे. मनुष्‍यबळाच्‍या मर्यादा असतांनाही कृषि तंत्रज्ञानाच्‍या विस्‍ताराचे कार्य योग्‍यरित्‍या चालु आहे. विशेषत: यावर्षी गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापन मोहिमेत कृषि पदवीचे कृषिदुत व कृषिकन्‍या चांगले कार्य करित आहेत. विद्यापीठाचा संपुर्ण परिसर स्‍वच्‍छ, सुंदर व पर्यावरण पुरक करण्‍याचा आपण सर्व प्रयत्‍न करत आहोतच, परंतु यासर्व बाबीं केवळ अभियांनापुरते मर्यादी न राहता, आपल्‍या सवयीचा भाग झाला पाहिजे. प्राध्‍यापक हे समाजातील आदर्श व्‍यक्‍ती असुन प्राध्‍यापकांच्‍या प्रत्‍येक कृ‍तीकडे समाजाचे लक्ष असते, त्‍यामुळे प्राध्‍यापकांचे आचरण आदर्शवत असले पाहिजे, असे प्रतिपादन त्‍यांनी केले. देशाच्‍या स्‍वातंत्र्याकरिता ज्‍यांनी आपले बलिदान दिले व स्‍वातंत्र्यानंतर ज्‍यांनी सुराज्‍य निर्मातीसाठी आपले आयुष्‍य वेचले, त्‍या सर्वांना त्‍यांनी अभिवादन करून स्‍वातंत्र्य दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. 
यावेळी राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी छात्रसेना अधिकारी लेफ्ट डॉ आशिष बागडे यांच्‍या नेतृत्‍वाखाली माननीय कुलगुरू यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांनी तंबाखु मुक्‍तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्य वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.