Pages

Friday, August 17, 2018

शेतकरी समाजातील अत्‍यंत प्रामाणिक व्‍यक्‍ती.......प्रा. डॉ. सरबजित सिंह

वनामकृवित आयोजित स्‍वयंसेवकाची प्रबोधन कार्यशाळेत प्रतिपादन

देशात अनेक व्‍यक्‍ती कर्जबाजारी आहेत, परंतु ते आत्‍महत्‍या करण्‍याचा विचारही करित नाहीत. परंतु कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्‍महत्‍या करत आहे. शेतकरी हा समाजातील अति महत्‍वाचा घटक असुन तो अत्‍यंत प्रामाणिक आहे, तो  संवेदनशील आहे, असे प्रतिपादन लुधियाना येथील पंजाब कृषि विद्यापीठाचे कृषि पत्रकारीता विभागाचे प्रा. डॉ सरबजित सिंह यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असेलेल्‍या कृषी महाविद्यालयातील विस्‍तार शिक्षण विभाग व राष्‍ट्रीय कृषि विज्ञान निधी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी कुटूबांच्‍या सामर्थ्‍य निर्मितीच्‍या माध्‍यमातुन शेतकरी आत्‍महत्‍या बाबींची मिमांसाया प्रकल्‍पांतर्गत दिनांक 16 ऑगस्‍ट रोजी आयोजित स्‍वयंसेवकांची प्रबोधन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ डि बी देवसरकर, डॉ राकेश आहिरे, मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी, अतिरिक्‍त जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक डॉ किशोर सुरवसे, डॉ अमर गाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. सरबजित सिंह पुढे म्‍हणाले की, शेतकरी हा अन्‍नदाता आहे, शेतक-यांप्रती समाजातील संवेदशीलता कमी होत आहे. व्‍यक्‍ती–व्‍यक्‍ती मधील संवाद कमी होत आहे. शेतक-यांना आर्थिक पाठबळासोबतच सामाजिक व मानसिक आधाराची गरज आहे. शेती व शेतीशी निगडीत बाबींमुळे शेतकरी विवंचनेत आहेच, त्‍याच सोबतच मुलींचे लग्‍न, लग्‍नात होणार खर्च, हुंडाप्रथा, मुलांचा शैक्षणिक खर्च आदीं बाबींही यास कारणीभुत आहेत, यासाठी साधेपणाने लग्‍न, सामुदायिक विवाह आदी गोंष्‍टी समाजात रूचवाव्‍या लागतील.  
अध्‍यक्षीय समारोपात शिक्षण संचालक डॉ विलास पाटिल म्हणाले की, कृषिचे विद्यार्थ्‍यी अनेक सामाजिक कार्यात हिरारिरीने सहभाग घेत आहेत. विद्यापीठाचा उमेद कार्यक्रम व विद्यापीठ आपल्‍या दारी, तंत्रज्ञान शेतकरी उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन शेतक-यांपर्यत तंत्रज्ञान पोहचविण्‍यासोबतच शेतक-यांना मानसिक आधार देण्‍याचा विद्यापीठ प्रयत्‍न करित आहेत. यावर्षी विद्यार्थ्‍यी कृषीदुत व कृषिकन्‍या गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनाबाबत विविध गावांत माहिती देत आहेत, निश्चितच ही कौतुकास्‍पद बाब असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
कार्यशाळेत मनोविकार तज्ञ डॉ तारिक अन्‍सारी यांनी स्‍वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना अत्‍यंत तणावात असलेल्‍या व्‍यक्‍तींची लक्षणे सांगुन अशा शेतक-यांना तातडीने मानस उपचाराची गरज असते, यासाठी सरकारी दवाखान्‍यात प्रेरणा या प्रकल्‍पाच्‍या वैद्यकिय अधिका-यांशी संपर्क साधावा किंवा हेल्‍पलाईन नंबर 104 या क्रमांकावर त्‍वरित संपर्क करावा.
कार्यशाळेत स्‍वयंसेवक निलेश बोरे यांनी प्रकल्‍पात कार्य करतांना आलेला अनुभव सांगितला. कार्यक्रमात प्रकल्‍पांतर्गत उत्‍कृष्‍ट कार्य केलेल्‍या स्‍वयंसेवकांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. राकेश आहिरे यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले.


कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ जे व्‍ही एकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, श्री आर बी लोंढे, श्री सी एच नखाते, श्री खताळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.