Pages

Saturday, January 5, 2019

यशस्‍वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठ तंत्र अवगत असणे आवश्यक..…प्राचार्य डॉ. डी.एन. गोखले

वनामकृवित आयोजित नांदेड जिल्हयासाठीच्‍या दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रांच्‍या वतीने मराठवाडयातील चार जिल्‍हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यातील नांदेड जिल्हयाच्‍या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उदघाटन दिनांक 4 जानेवारी रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. गोखले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सय्यद इस्माईल, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. श्री. शरदराव हिवाळे, डॉ. स्मिता सोळंके, श्री. संजय देशमूख (नोका, पुणे), डॉ. सतिश भोंडे, श्री. महेश सोनकुळ, डॉ आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. डी.एन. गोखले म्हणाले की, मराठवारडयातील कोरडवाहु शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत. यातील शेतमालाचा बाजारभावातील चढ-उतार ही प्रमुख समस्या आहेत. अशा वेळी कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता यासाठी सेंद्रीय शेतीकडे शेतकरी आशेने पाहत आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना लाभ होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी योग्य बियाणे, आंतरपिक पध्दती, पिकांची फेरपालट आदी मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सेंद्रीय शेतीसाठी महत्वाचे आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्‍यातील ऊर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्वाचा आहे. यशस्‍वी सेंद्रीय शेतीसाठी बाजारपेठेचे तंत्र अवगत करणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
मा. श्री. शरदराव हिवाळे यांनी भाषणात सांगितले की, शेतकरी बांधवांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि गट शेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती केल्यास फायदेशीर होईल. गट शेतीच्या माध्यमातून विक्री व्यवस्था सोपी जावी म्हणून विद्यापिठ निश्चित पाठीशी राहील. श्री. संजय देशमुख यांनी सांगितले की, नांदेड जिल्हा सेंद्रीय शेतीच्या अवलंबामध्ये अग्रेसर असुन जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रीय शेती करणारे आहेत. सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल. तसेच डॉ. द इस्माईल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, रासायनिक खते व किटकनाशकांचा अयोग्‍य व अतिरेक वापरामूळे जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि किटकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढते आहे, तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश सांगितले. सूत्रसंचलन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजीत कदम यांनी केले. तांत्रिक सत्रामध्ये श्री संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, श्री. महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचे व सापळयांचे फायदे उपयोग व महत्व, डॉ. सतिश भोंडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये माती परिक्षणाचे महत्व, डॉ. सी.व्ही. आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ. .टी शिंदे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये पशुधन व्यवस्थापण तसेच डॉ. .एल. धमक यांनी जैविक खताची निर्मिती व उपयोग तसेच जैविक खते निर्मिती केंद्रास भेट देऊन शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
सदरिल प्रशिक्षण कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.