Pages

Thursday, January 3, 2019

मराठवाडयातील पशुधनामध्ये सेंद्रीय शेतीला आधार देण्याची क्षमता.....प्राचार्य डॉ. नितिन मार्कंडेय

वनामकृवित आयोजित हिंगोली जिल्हयासाठीच्‍या दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडयातील आठही जिल्हयांसाठी दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्‍यात आले असुन दिनांक 2 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हयासाठी आयोजित कार्यक्रमाचा समारोप झाला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी परभणी पशुवैद्यकीय महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. नितिन मार्कंडेय हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संशोधन उपसंचालक डॉ. डी. एस. पेरके, हिंगोली उपविभागीय कृषि अधिकारी श्री बी. एस. कच्छवे, डॉ. आर. एन. खंदारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय म्‍हणाले की, पशुधन आणि त्यापासूनच्या उपउत्पादनामूळे शेतीची क्षमता वाढविणे, कर्ब वाढविणे तसेच जमिनीची सुपिकता वाढविण्या बरोबरच उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोगी ठरेल. मराठवाडयातील हवामान, परिस्थिती पशुधनाच्या दृष्टीने पोषक असून सेंद्रीय शेतीला आधार देता येईल. मराठवाडयातील पशुधनामध्ये दुग्धोत्पादन व उपउत्पादने देण्याची मोठी क्षमता असुन ही क्षमता शेतकऱ्यांनी ओळखून योग्य व्यवस्थापन तंत्राचा वापर केल्यास शेतकरी सेंद्रीय शेती यशस्वीपणे करू शकतील. शुध्द पैदास, योग्य व्यवस्थापन तंत्र, वेळेचे नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास या चतू:सुत्रीचा वापर केल्यास शेतकरी आर्थिक समृध्दी प्राप्त करता येईल, असे सांगितले.
संशोधन उपसंचालक डॉ. ङि एस. पेरके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकऱ्यांनी प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी, बाजारपेठेचा अभ्यास करावा व कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल याचाही विचार करावा. सेंद्रीय उत्पादनास स्थानिक तसेच मोठया शहरात मोठी मागणी आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी मागणीनुसार अभ्यास करून सेंद्रीय शेतीमध्ये उत्पादन घ्यावे.
हिंगोलीचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. बी.एस. कच्छवे यांनी शेतमकरी बांधवांनी गट तयार करून सेंद्रीय शेतीमध्ये निविष्ठा निर्मिती करावी आणि लागवड तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे सांगितले. डॉ. आनंद गोरे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांनी कोणत्याही एका ब्रँडखाली काम केल्यास योग्य लाभ होईल असे सांगितले व भविष्यात आपणास एकत्रित काम करावे लागेल असेही सांगितले.
तांत्रिक सत्रामध्ये डॉ. बी. व्ही. भेदे यांनी जैविक कीड व्यवस्थापन, डॉ. . टी. दौंडे यांनी जैविक रोग व्यवस्थापन, श्री. एस. एन. मोहिते यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण व श्री. उदय वाईकर यांनी सेंद्रीय शेतीमधील संधी तसेच घडामोडी, डॉ. एस. . जावळे यांनी जैविक निविष्ठा निर्मिती व सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास शेतकऱ्यांना भेट देऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच डॉ. एस.एन. सोळंकी यांनी सेंद्रीय शेतीमध्ये अवजारांचा सुयोग्य व कार्यक्षम वापर, डॉ. सौ. एस.एस. धुरगुडे यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी किटकांचा उपयोग व महत्व, डॉ. के.टी. आपेट यांनी जैविक बूरशी संवर्धनाची निर्मिती व उपयोग व संशोधन केंद्रास भेट देवून शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
समारंभाप्रसंगी मनोगतात प्रगतशील शेतकरी रामेश्वर मांडगे यांनी विद्यापिठाच्या तंत्रज्ञानामूळे अनेक शेतकरी उभे राहिल्‍याचे सांगितले, तर अनिलराव कदम  कपिल सोनटक्के यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. कार्यक्रामचे सुत्रसंचालन मनिषा वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित कदम यांनी केले.
सदरिल प्रशिक्षण कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहे. कार्यक्रम यशस्वीसाठी प्रल्हाद गायकवाड, डॉ. सुनिल जावळे, शितल उफाडे, व्दारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतिश कटारे, भागवत वाघ, सचिन रणेर, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.