Pages

Wednesday, March 6, 2019

सेंद्रीय शेतीत पशुधनाचा कार्यक्षम वापर शक्‍य...कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हानिहाय दोन दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन याच शृंखलेमध्ये जालना व औरंगाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दि. 2 मार्च रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी हया होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन हैद्राबाद येथील केद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे मुख्य शास्‍त्रज्ञ डॉ. मोहमद उस्मान, अपारंपारीक ऊर्जा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आर. टि. रामटेके, सेंद्रीय शेती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. स्मिता सोळंकी म्‍हणाल्‍या की, सेंद्रीय शेतीखालील क्षेत्रात वेगाने वाढ होत असुन सेंद्रीय बाजरपेठ वाढत आहे. याचा शेतकऱ्याना लाभ घेण्यासाठी शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करावी असे सांगितले. सेंद्रीय शेतीमध्ये पशुधनाचा वापर आवश्यक असुन त्यापासुन केवळ निविष्ठांचाच नव्हे तर पशुधनाचा कार्यक्षम वापर केल्यास शेती कामे कमी खर्चात आणि जमिनीचे भौतिक गुणर्धम सुधारता येतील. सेंद्रीय शेती पशुधनाचा कार्यक्षम वापर केल्यास सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल, असे त्‍या म्हणाल्या.
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मोहमद उस्मान यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीमधील तत्वांची ओळख करुन दिली. आंतरपीक पध्दती आणि पीक फेर पालटयासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब सेंद्रीय शेतीमध्ये करावा. मराठवाडा विभागातील तुरी सारख्या पिकांत सेंद्रीय ब्रॅड विकसीत केल्यास शेतकरी देशात आपली ओळख निर्माण करु शकतील असे त्‍यांनी सांगितले. डॉ. आर. टी रामटेके यांनी बायोगॅस सयंत्र आणि सेंद्रीय शेतीयांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगितले.
सेंद्रीय शेतीतील संकल्पना प्रमाणिकरण समजवण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ झाल्याचे प्रशिक्षणार्थी शेतकरी ईश्वरदास वाघ यांनी सांगितले तर प्रशिक्षण हे शिस्तबध्द आणि नाविण्यपुर्ण पध्दतीने राबविण्यात आल्याची भावना राजेश जोगदंड यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या औरंगाबाद जालना जिल्हयातील प्रशिक्षणार्थी शेतकरी बंधु भगिनी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रम कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुनिल जावळे, अभिजीत कदम, प्रल्हाद गायकवाड, शितल ऊफाडे, बाळु धरबळे, सतिश कटरे, भागवत वाघ, सचिन रणेर, द्वारका काळे, मनिषा वानखेडे, नागेश सावंत, दिपक शिंदे आदींनी परिश्रम घेतले.