Pages

Sunday, June 23, 2019

तारूण्‍यभान कार्यशाळा ठरणार तरूण-तरूणीच्या जीवनातील वळणबिंदु.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांची तारूण्‍यभान तीन दिवसीय कार्यशाळा संपन्‍न

महाविद्यालयीन जीवनातच तरूण-तरूणाच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाचा विकास होतो, परंतु तरूण-तरूणातील लैगिंकता याबाबीवर शास्‍त्रशुध्‍द भाष्‍य कोणीही करित नाही, त्‍यामुळे अनेक प्रश्‍न अनुत्‍तरीत राहतात व गैरसमज होतात, चुकीच्‍या वाटेवर तरूण–तरूणी भरकटतात, जीवनतील या चुकीला मात्र माफी नसते, त्‍यामुळे प़द्मश्री मा डॉ राणी बंग यांच्‍या सारख्‍या तारूण्‍यभान कार्यशाळेची गरज भासते. ही कार्यशाळा कृषिच्‍या विद्यार्थ्‍यासाठी जीवनाचा वळणबिंदु ठरेल, असे प्रतिपादन अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महावि़द्यालयाच्‍या वतीने दिनांक 20 ते 22 जुन दरम्‍यान तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेच्‍या समारोपाप्रंसगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर ज्‍येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग, श्रीमती उषाताई ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, सशक्‍त जीवन जगण्‍यासाठी मा डॉ राणी बंग यांच्‍या सर्च फाउंडेशनचे कार्य निश्चितच तरूणामध्‍ये याबाबतीत मोठी जागृती करीत आहे. स्‍वच्‍छ परिसर, सुंदर परिसर व सुरक्षित परिसर करण्‍याचा विद्यापीठाचा मानस आहे, विद्यापीठ परिसर मुली व महिलांसाठी सुरक्षित करण्‍याच्‍या दृष्‍टीने ही कार्यशाळा निश्चितच उपयोगी ठरले, असे मत व्‍यक्‍त केले.  
ज्‍येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कार्यशाळेत घेतलेले ज्ञान केवळ आपल्‍यापुरते न ठेवता वाटत जा, ज्ञान दिल्‍याने ज्ञान वाढते. तरूणाईची ऊर्जा समाज हितासाठी सकारात्‍मक कार्यासाठी लावा. समाजातील अंधार दुर करण्‍यासाठी ज्ञानाची ज्‍योत बना.
तीन दिवसीय कार्यशाळेत प्रेम व आकर्षण, जोडीदार कसा निवडावा, सुरक्षीत लैगिंकता, व्‍यसनाधिनता, एडस, गुप्‍तरोग, गर्भवस्था, पोषक आहार आदीवर सर्च फाउंडेशनच्‍या संचालिका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांच्‍यासह ज्ञानेश्‍वर पाटील, राजेंद्र इसासरे, सुनंदा खोरगडे आदींनी सादरिकरणाच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन केले तसेच विविध गीत व खेळाच्‍या माध्‍यमातुन जीवन शिक्षणाचे अनेक धडे दिले. समारोपीय कार्यक्रमात अनेक सहभागी प्रशिक्षणार्थीनी कार्यशाळेमुळे लैगिंकता बाबतीत अनेक गैरसमज दुर झाल्‍याचे मत व्‍यक्‍त केले तर अनेकांनी ही कार्यशाळा जीवनातील वळणबिंदुच ठरेल अशी भावना व्‍यक्‍त केली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ संदिप बडगुजर यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
प्रतिकात्मक ज्ञान ज्योत प्रज्वलीत करतांना