Pages

Tuesday, October 8, 2019

वैविध्‍दपुर्ण सांस्‍कृतिक व बौध्‍दिक विचारांनी विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व प्रगल्‍भ होईल.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित देशातील अकरा राज्‍यातील 173 विद्यार्थ्‍यांनी घेतला विविध पदवी अभ्‍यासक्रमास प्रवेश
अकरा राज्‍यातील दिडशे पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यींनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध घटक महाविद्यालयातील पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी अभ्‍यासक्रमात यावर्षी प्रवेश घेतला आहे, या विद्यार्थ्‍यांची सांस्‍कृतीक, भाषिक व सामाजिक पार्श्‍वभुमीत वैविध्‍द आहे. यामुळे महाविद्यालयीन जीवनात वैविध्‍दपुर्ण सांस्‍कृतिक व बौध्‍दिक विचारांचे देवाणघेवाण होऊन विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व प्रगल्‍भ होण्‍यास मदत होणार आहे, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्‍ये भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या माध्‍यमातुन विविध पदवी अभ्‍यासक्रमात प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा स्‍वागत समारंभ व उदबोधन कार्यक्रम दिनांक 7 ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरविंद सावते, लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍नस्‍तर शिक्षण) डॉ डि एन धुतराज, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ जयश्री झेंडे, डॉ हेमंत देशपांडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, पालकांच्‍या आपल्‍या मुलांकडुन अनेक अपेक्षा असतात, शिक्षणाकरिता आपले गाव, राज्‍य सोडतांना निश्चितच सर्वांना त्रासदायक असते. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आई-वडीलांच्‍या संस्‍काराची सातत्‍यांनी जाण ठेवावी. यापुर्वीही परभणी कृषि विद्यापीठातुन विविध राज्‍यातील अनेक विद्यार्थ्‍यांनी पदवी प्राप्‍त करून चांगले यश संपादन केले आहे. विद्यापीठ परिसर सुंदर, स्‍वच्‍छ, हरित व सुरक्षित करण्‍याचा आमचा मानस असुन इतर राज्‍यातील विद्यार्थ्‍यांनाही येथे सुरक्षीत वाटले पाहिजे. परराज्‍यातील विद्यार्थ्‍यांना शिकवितांना प्राध्‍यापकांनाही स्‍वत: च्‍या अध्‍यापनात सुधार करण्‍याची संधी आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रल्‍हाद जायभाये यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या विविध घटक महाविद्यालयातील कृषी, कृषि अभियांत्रिकी, अन्‍नतंत्र, उद्यानविद्या, सामाजिक विज्ञान आदी विद्या शाखेत पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य अभ्‍यासक्रमात देशातील अकरा राज्‍यातील 173 विद्यार्थ्‍यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या माध्‍यमातुन प्रवेश घेतला. यात राजस्‍थान, पश्चिम बंगाल, उत्‍तर प्रदेश, बिहार, तेंलगाणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, ओरिसा, मध्‍य प्रदेश, मनिपुर आदी राज्‍यातील विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.