Pages

Friday, November 29, 2019

सकारात्‍मक दृष्‍टीकोनच जीवनात यश मिळवुन देतो......मा सौ स्‍वाती शिंगाडे

फौजदारकी सोडली शेती केली.....प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी सौ स्‍वाती शिंगाडे यांचा प्रेरणादायी प्रवास
जीवन खडतर प्रवास आहे, याच खडतर प्रवासात व्‍यक्‍ती घडत असतो. जीवनाकडे पाहाण्‍याचा दृष्‍टीकोन सकारात्‍मक असला पाहिजे, सकारात्‍मक दृष्‍टीकोनच जीवनात यश मिळवुन देतो. कौशल्‍य अनुभवातुन शिकता येते, प्रत्‍येक वेळी अनुभवातुन आपण विकसित होत असतो. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना कॅरियरच्‍या अनेक वाटा आहेत. केवळ शासकीय नौकरी हेच कॅरियरचे ध्‍येय नको. कृषि उद्योजकता क्षेत्रात अमर्याद संधी आपणास खुणवत आहेत. महिलांनाही यात मोठया संधी आहेत. कृषि क्षेत्रातील नैराश्‍याचे वातावरण कमी करण्‍यासाठी कृषि पदवीधरांनी पुढे यावे. शेतीकडे वळा, शेतीतही मोठे करिअर करता येते, असे प्रतिपादन प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी व कृषी उद्योजिका सौ स्‍वाती शिंगाडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राजमाता जिजाऊ मुलींचे वसतीगृहात दिनांक 28 नोव्‍हेबर रोजी आयोजित व्‍याख्‍यानात त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रभारी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, सौ उषाताई अशोक ढवण, डॉ जयश्री एकाळे, डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने नवीन कृषि शिक्षण अभ्‍यासक्रमात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषि उद्योजकता विकास व्‍हावा यावर विशेष भर आहे. अनेक मुली कृषि शिक्षणाकडे वळत असुन शासकीय व निमशासकीय क्षेत्रात कॅरियर घडवीत आहेत. परंतु मुलींना कॅरियर व कौंटुबिक जबाबदारी यात समतोल राखतांना मोठा संघर्ष करावा लागतो. कृषि पदवीधर असलेल्‍या सौ स्‍वाती शिंगाडे हिने यांनी पोलिस उपनिरिक्षक पदाचा राजनामा देऊन यशस्‍वी महिला शेतकरी व कृषि उद्योजकता म्‍हणुन एक आदर्श निर्माण केला. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन सुवर्णा चौधरी हिने केले तर आभार शितल हुलगुंडे मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ फरिया खान, डॉ मिनाक्षी पाटिल, डॉ पपिता गौरखेडे, डॉ गोदावरी पवार आदीसह वसतीगृहातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

फौजदारकी सोडली शेती केली.....प्‍युअर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्‍यक्षा तथा यशस्‍वी महिला शेतकरी व कृषी उद्योजिका सौ स्‍वाती शिंगाडे यांचा प्रेरणादायी प्रवास
सौ स्‍वाती शिंगाडे या राहुरी येथील कृषि विद्यापीठाच्‍या कृषी पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनी असुन त्‍यांची 2006 साली पोलिस उपनिरिक्षक पदावर निवड झाली होती. त्‍यानंतर त्‍यांनी या पदाचा राजीनामा देऊन शेतीक्षेत्राकडे वळाल्‍या. बारामती परिसरात माळरानावरील पडीत केवळ साडेतीन एकर शेती पासुन सुरूवात करून आज तब्‍बल 55 एकर शेती त्‍या कसतात. हायटेक शेती, पॉलिहाऊस मधील फुलशेती व भाजीपाल त्‍या पिकवतात. तसेच सेंद्रिय शेती करून प्‍युअर ऑरगॅनिक नावाच्‍या ब्रँडने विक्री करतात. तसेच विदेशातही त्‍याचा माल विक्री होतो. आज त्‍यांनी अनेक शेतकरी गट स्‍थापन करून एकत्र जोडले आहेत. शासकीय नौकरी सोडुन शेतीत स्‍वताचे स्‍वतंत्र अस्ति‍त्‍व त्‍यांनी निर्माण केले असुन त्‍यांना राष्‍ट्रीय पातळीवरील सर्वोत्‍कृष्‍ट भारतीय महिला किसान पुरस्‍कारांनी सन्‍माननित करण्‍यात आले आहे.