Pages

Friday, November 29, 2019

महाऍग्रो कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यापीठ तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यास मदत होत आहे.....कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवि अंतर्गत औरंगाबाद येथील कृषीतंत्र विद्यालयाच्‍या प्रक्षेत्रावर आयोजित सहाव्या राज्यस्तरीय महाअग्रॉ कृषी प्रदर्शनाचे उत्साहात उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषीतंत्र विद्यालय प्रक्षेत्रावर सहावे राज्यस्तरीय महाऍग्रो कृषी प्रदर्शन २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्‍यान आयोजित केले असुन दि २९ नोव्हेंबर रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन उत्साहात पार पडले. उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष श्री भागवत कराड, औरंगाबाद शहराचे महापौर मा श्री नंदकुमार घोडले, अपेडाचे संचालक श्री रामचंद्र भोगले, सिआम औरंगाबादचे अध्‍यक्ष श्री अजित मुळे, माफदाचे अध्‍यक्ष श्री जगन्नाथ काळे, कृषी प्रदर्शनाचे आयोजक अॅड वसंतराव देशमुख, विभागीय कृषी सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, श्री जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ तुकाराम मोटे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, प्राचार्य डॉ किरण जाधव, डॉ एस बी पवार, डॉ एम बी पाटील, डॉ किशोर झाडे आदी प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान कृषि प्रदर्शनाच्‍या माध्यमातून थेट शेतकरी बांधवाना माहीत होते, या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढण्यास मदत होते. शेतीतील समस्या कधीच संपत नाहीत केवळ त्‍याचे स्वरूप बदलत राहते. मराठवाडयातील शेतीपुढे अनेक समस्‍या आहेत, विद्यापीठ त्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी तंत्रज्ञानात्‍मक पाठबळ पुरवित आहे. आजपर्यंत विद्यापीठाने विविध पिकाचे १४५ पेक्षा जास्‍त वाणांनी निर्मिती केली असुन शेतकरी बांधव मोठया प्रमाणात त्‍याची लागवड करित आहेत. यामध्ये मूग, उडीद, ज्वारी, तूर, सोयाबीन, कापूस, बाजरा, हरभरा आदींची वाण शेतकरी बांधवांसाठी लाभदायी ठरले आहेत. सातत्‍यांने विविध पिकांवरील किडी व रोग याचे निदान करणे व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्‍यावरही विद्यापीठाचा भर आहे. आज विद्यापीठ निर्मित बायोमिक्स हा घटक विविध पिकाच्या रोग निवारण होण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असुन यावर्षी दीड कोटी पेक्षा जास्‍त महसुल यापासुन विद्यापीठास प्राप्‍त झाला आहे. याची निर्मितीचे प्रयोग औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात होत आहे. विद्यापीठ विकसित बियाणे पूर्वी केवळ परभणी येथेच विक्री होत होती, त्यामुळे सर्व गरजू शेतकरी परभणी येथे येणे होत नव्हते, यावर्षी प्रत्‍येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठ बियाणे उपलब्‍ध केल्याने ज्या त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना बियाणे खरेदी करता आले, त्यामुळे विद्यापीठ आणि शेतकरी थेट नाते निर्माण होण्यास मदत होत आहे, असे प्रतिपादन करून कृषि प्रदर्शनाचे नेटकेपणाने आयोजन करण्यासाठी अॅड वसंत देशमुख, विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ किरण जाधव, डॉ किशोर झाडे आणि त्यांच्या अधिनस्त असणारे सर्वाबाबत त्‍यांनी गौरवपूर्ण उल्लेख केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्‍य आयोजक अॅड वसंत देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा अद्यापक यांनी केले आभार डॉ किरण जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
सदरिल कृषि प्रदर्शन पुढील चार दिवस चालणार असुन कृषि चर्चासत्राचेही आयोजन करण्‍यात आले आहे. कृषी प्रदर्शनात असणाऱ्या पीक प्रदर्शनातील मुख्य आकर्षण म्हणजे विद्यापीठ विकसित बीटी तंत्रज्ञानासह कपाशीचा वाण नांदेड-४४ तसेच प्रक्षेत्रावर केलेले कापसाचे एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रात्‍यक्षिक, विद्यापीठ विकसित केलेल्या वाणासोबतच विविध खाजगी कंपनी व्‍दारे प्रसारित वाणांची लागवड करण्यात आलेली आहे व सुधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतावर राबविण्यात आले आहे.



सौजन्‍य
रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद औरंगाबाद