Pages

Friday, April 24, 2020

ऑडिओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातुन ३४ गावातील शेतक-यांशी वनामकृवि शास्‍त्रज्ञांनी साधला संवाद

वनामकृवि आणि रिलायन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम, विस्तार शिक्षण संचालकांनी केले मार्गदर्शन
सध्या कोरोना विषाणु रोग प्रतिबंधात्‍मक उपाय देशात व राज्‍यात लॉकडाऊन आहे, अशा परिस्थितीत कृषि शास्‍त्रज्ञ व शेतकरी बांधव यांच्‍यात संवादाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २४ एप्रिल रोजी ऑडिओ कॉन्‍फरन्‍सचे आयोजन करण्‍यात आले होते. या ऑडिओ कॉन्‍फरन्‍स मध्‍ये परभणी जिल्‍हयातील एकुण ३४ गावातील एकुण ४४ शेतक-यांनी सहभाग नोंदविला. या संवाद कार्यक्रमात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता शेत काम करतांना कोणती काळजी घ्‍यावी व सद्यास्थितीत करावयाची कामे या विषयावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी बी. देवसरकर, कृषिविद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, उद्यानविद्या तज्ञ  डॉ. बी. एम. कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत आणि रोगशास्त्रज्ञ डॉ. ए. टी. दौंडे यांनी सहभागी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे फळबाग व्यवस्थापन, खरीप पूर्व नियोजन, जमीन मशागत, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन यावर प्रश्न विचारले.  मार्गदर्शन करतांना डॉ. डी. बी. देवसरकर यांनी करोंना विषाणू परिस्थितीत  शेतकऱ्यांनी शेतीची कामे करत असतांना सामाजिक अंतर जोपासणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फोन्डेशनचे परभणी जिल्हा व्यवस्थापक विलास सवाणे व कार्यक्रम सहाय्यक रामजी राऊत यांनी केले.