मौजे देवलगांव दुधाटे येथे कार्यक्रम संपन्न
कृषिदिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय व शेतीसेवा ग्रुप, पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने दिनांक 1 जुलै रोजी पुर्णा तालुक्यातील मौजे देवलगांव दुधाटे येथे शेतकरी महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे विकसित केलेल्या महिलांचे शेतीकामामध्ये श्रमबचतीच्या विविध साधनांचे प्रात्यक्षिक करुन दाखवुन मार्गदर्शन केले तर विभाग प्रमुख डॉ. जया बंगाळे यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भाच्या कठीण परिस्थितीत शरीर स्वास्थ्यासोबत मन स्वास्थ्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. वरिष्ठ संशोधिका डॉ. सुनिता काळे यांनी ग्रामीण महिलांनी स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी लघुउद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन केले तर डॉ. फरजाना फारुखी यांनी कोरोना परिस्थितीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले. डॉ. शंकर पुरी यांनी कोरोना परिस्थितीमध्ये शेतीकामात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचायत समिती सभापती श्री. माधवराव दुधाटे, उपसरपंच श्री. पांडुरंगराव दुधाटे, श्री. रमेशराव दुधाटे, श्री. मंचकराव दुधाटे, शालेय समितीच्या अध्यक्ष सौ. राधाताई दुधाटे, सौ. स्वातीताई दुधाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शंकर पुरी यांनी केले तर पूर्णा शेतीसेवा ग्रुपचे श्री. प्रतापराव काळे आणि श्री. गोविंदराव दुधाटे यांनी सहकार्य केले. कोरोना विषाणू आजाराच्या प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करुन शेतकरी महिला व शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला.