Pages

Wednesday, July 8, 2020

वनामकृविच्‍या वतीने कृषी संजीवनी सप्ताहाची ऑनलाइन सांगता

संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील गावात थेट शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक ०१ जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावर्षी दिनांक ०१ जुलै ते ०७ जुलै दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कृषी विभागाच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कृषी संजीवनी सप्ताह अभियान कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात आला. या करिता प्रत्‍येक जिल्‍हयाकरिता विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभागीतील अधिकारी यांची पथके तयार करून थेट शेतक-यांच्‍या बांधावर मार्गदर्शन, विविध प्रात्‍यक्षिके, चर्चासत्र, प्रक्षेत्र भेट, शिवार फेरी, ऑनलाईन मार्गदर्शन ईत्‍यादी पध्दतीने कृषि तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्‍यात आला. सप्‍ताहाची सुरूवात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या पथकांच्‍या वाहनांना हिरवा झेंडा दाखवुन करण्‍यात येऊन सदरील सप्ताहाची सांगता दिनांक ०७ जुलै रोजी परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष आळसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते. कार्यकमास विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री.के.आर.सराफ, वनपस्‍ती रोगशास्त्रज्ञ डॉ. ए. टी. दौंडे, कीटकशास्त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी कृषि संजीवनी सप्‍ताह निमित्‍त परभणी विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या वतीने राबविण्‍यात आलेल्‍या विविध कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, यावर्षीची सोयाबीनची परिस्थिती पाहता पुढील वर्षी शेतकऱ्याने स्वतःचे बियाणे स्वतः वापरावे, ते करत असताना बियाण्याची उगवण क्षमता व आनुवंशिक शुद्धता तपासावी. सोयाबीन मध्ये खत, कीड व रोग, तण व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनेच करावे. पारंपरिक पिकासोबत निर्यातक्षम फळझाडांची लागवड करण्‍याचा सल्‍ला देऊन विद्यापीठातर्फे पेरू, लिंबू, डाळिंब आदी फळझाडांची रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्‍याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष आळसे म्हणाल की, यावर्षी पावसाने सुरुवात चांगली केली आहे, परंतु सोयाबीन उगवणीचे प्रश्न निर्माण झालेत व सध्या बऱ्याच भागात सोयाबीन व कापूस पिवळा पडत असून त्याकरिता विद्यापीठ व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारसीचा अवलंब करावा.

यावेळी शेतकऱ्यांना जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे व खरीप पिकाचे नियोजन याविषयीही विद्यापीठ तज्ज्ञांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. डॉ. यू. एन. आळसे म्‍हणाले की, सद्य परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरलेल्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांना पेरणीनंतर कुठल्याही परिस्थितीत युरिया खत देऊ नये. कपाशी पिकाला पहिला खताचा हप्ता देताना निव्वळ युरिया न देता संयुक्त किंवा मिश्र खताद्वारे शिफारस केलेल्या प्रमाणात खताची मात्रा द्यावी. डॉ. ए. टी. दौंडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकामध्ये जस्त व लोह या मूलद्रव्यांची कमतरता असुन त्याकरिता जमिनी पाण्याचा निचरा करावा तसेच जस्त व लोहाची कमतरता दूर करण्यासाठी चिलेटेड झिंक व फेरस ची फवारणी करावी अथवा ग्रेड दोन मायक्रोन्यूट्रिएंट ची फवारणी करावी. यावेळी त्यांनी सोयाबीनमधील व कपाशी मधील विविध रोगांची सचित्र माहिती देऊन व्यवस्थापन कसे करावे ते सांगितले तर प्रा.डी.डी.पटाईत यांनी यावेळी सोयाबीन व कापूस पिकामधील कीड व्यवस्थापन याविषयी सचित्र माहिती दिली. यावेळी सहभागी शेतकऱ्यांनी पेरूमध्ये पाने पिवळी पडणे, सोयाबीन पिवळे पडणे, मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी आदी समस्यांवर प्रश्न विचारून विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनाकडुन निराकरण करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प उपसंचालक (आत्मा) श्री.के.आर.सराफ यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका तंत्र व्यवस्थापक श्री.रमेश इक्कर यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी बांधवासह तालुका कृषी अधिकारी,  मंडळ कृषी अधिकारी,  कृषी विभागाचे इतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. संपुर्ण कृषि संजीवनी सप्‍ताहा अभियान राबवितांना कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर सर्व रोग प्रतिबंधात्‍मक नियमांचे पालन करण्‍यात आले.