Pages

Thursday, July 9, 2020

वनामकृविच्‍या वतीने सोयाबिन प्रक्रिया लघुउद्योग यावरील राज्यस्तरीय वेबिनार संपन्‍न



महाराष्‍ट्र राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व वंसंतराव नाईक यांच्‍या जयंती निमित्‍त 1 जुलै ते 7 जुलै दरम्‍यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने कृषि संजीवनी सप्ताह राबविण्यात आला. विद्यापीठा अतंर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातर्फे “सोयाबिन प्रक्रिया लघुउद्योग” या विषयावर दि. ७ जुलै  रोजी राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

वेबिनारचे उद्घाटन कार्यक्रम विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर यांच्‍या अध्‍यक्षस्‍तेखाली पार पडला, यावेळी प्राचार्य डॉ उदय खोडके, विभागप्रमुख डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. देवराव देवसरकर यांनी सोयाबिन आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी शेतकरी, उद्योजक व बचत गटाच्या महिलांनी समोर येणे गरजेचे आहे असे नमूद केले. सोयाबीनचे प्रक्रिया तंत्रज्ञानाच्‍या आधारे मूल्यवृद्धी केले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकेल असे प्रतिपादन केले.

प्राचार्य डॉ उदय खोडके आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन हे महत्वाचे नगदी पिक बनलेले आहे. सोयाबीनमध्ये प्रथिने, तेल व इतर पोषक तत्वे यांचे प्रमाण जास्त असून सोयाबीनवर घरगुती किंवा लघु उद्योगस्तरावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे सहज शक्य आहे. यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान महाविद्यालयात उपलब्ध आहे.  या तंत्रज्ञानाचा लघु उद्योजक व बचत गट यांनी घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले. 

प्रमुख वक्त्या विभागप्रमुख डॉ. स्मिता खोडके यांनी सोयाबिन पासून सोयादुध, सोयापनीर, सोयाबीनचे खरमुरे व इतर अनेक पदार्थ सोप्या पद्धतीने तयार करण्याचे तंत्रज्ञान आणि त्यास लागणारी यंत्रसामुग्री ह्याविषयी विडीओ सादरीकरणद्वारे  सविस्तर मार्गदर्शन केले.

वेबिनारचे प्रास्ताविक प्रा. प्रमोदिनी मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. श्याम गरुड यांनी केले. वेबीनारमध्‍ये महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण उद्योजक व महिला बचत गटांचे सदस्य मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला. शेतकरी व उद्योजकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे व शंकाचे निरसन करण्यात आले.