Pages

Saturday, July 11, 2020

वनामकृवित डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्मनिर्भरता या राज्यस्तरीय एक आठवड्याच्या वेबिनारचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पाच्‍या वतीने डिजिटल शेती तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी महिलांची आत्मनिर्भरता या राज्यस्तरीय एक आठवड्याच्या वेबिनारच्या समारोप समारंभ दिनांक १० जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे नाहेप प्रकल्‍पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी.  अग्रवाल, पुणे येथीलअभिनव फार्मर्स क्लबचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोडके, भारताच्या प्रथम महिला शेतकरी पुरस्कार प्राप्त  बारामती येथील प्युर ऑरगॅनिक ग्रुपच्‍या अध्यक्षा सौ स्वाती शिंगाडे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज  गोखले, आयोजक प्राचार्या डॉ. जयश्री झेंड, नाहेपचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाळ शिंदे, आयोजन सचिव डॉ  वीणा भालेराव उपस्थित होते.

मार्गदर्शनात प्रमुख अतिथी मा डॉ आर. सी. अग्रवाल म्‍हणाले की, महिला शेतकऱ्यांची कृषि विकासात महत्‍वाची भूमिका आहे. आज शेतकरी बांधव मोबाईल फोन उपयोग कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्राप्‍त करण्‍यासाठी करत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा आधारेच कृषिक्षेत्रात चौथ्या हरितक्रांती कडे वाटचाल चालू आहे. केवळ मोठ्या प्रमाणावर अन्न उत्पादनापेक्षा ही सकस आहार, पोषक अन्न निर्मितीकडे आपण वळलो आहोत. शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग फवारणीसाठी करण्यात येऊ लागला आहे. पिकावरील कीड – रोग प्रादुर्भाव ड्रोन व रिमोट सेन्‍सींन तंत्रज्ञानद्वारे शोधून केवळ तेवढ्याच वनस्पतींवर कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचु शकतो, पिकावर होणारा अतिरिक्‍त किडकनाशकांचा मारा कमी होतो, पोषक अन्न मिळण्यास मदत होते असेही ते म्हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी महिलांना डिजिटल शेतीद्वारे अनेक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्क्रांतीची दालने उघडली आहेत. अगदी साक्षर असलेल्या महिला देखील स्मार्टफोनचा उपयोग करून स्मार्ट शेती करत आहेत. कोरोना रोगाच्‍याकाळात उत्पादक हे ग्राहकाच्या शोधात, तर ग्राहक शुद्ध, सकस, सेंद्रिय शेती उत्पादनाच्या शोधात असताना ही संधी ओळखून डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग हा या दोघांमधील दुवा म्हणून करता येईल. डिजिटल तंत्रज्ञानाची जोड शेतकरी महिलांनी दिल्यास त्या स्वतः, सुशिक्षित मुली, बेरोजगार व इतर अनेकांना या साखळीमध्ये जोडून आर्थिक क्रांती घडू शकते, असे ते म्हणाले.

श्री ज्ञानेश्वर बोडके आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महिलांना मार्केटिंग अधिक चांगल्या प्रकारे करता येते. महिलांमधील व्यावसायिका वाढवुन ग्राहक हाताळण्यास शिकले पाहिजे. कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव अनेक परप्रांतातील व्‍यवसायिक. महाराष्‍ट्र राज्‍य सोडुन गेले असुन राज्‍यातील युवकांना व्‍यवसायाच्‍या उपलब्‍ध संधीचा उपयोग घ्यावा. महिलांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती उत्पादनांची विक्री अगदी सहज सोप्या पद्धतीने शेतकरी महिला करू शकतील अशी अनेक उदाहरणे देऊन त्‍यांनी महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले.

यावेळी सौ स्वाती शिंगाडे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाल्‍या की, महिलांनी संघटित होऊन विविध व्यवसाय संधी द्वारे आत्मनिर्भर व्हावे. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग ऑनलाइन पेमेंट करणे, ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणे, ऑनलाइन फोनवर मालाच पुरवठा करणे इत्यादी अनेक कामे केली जात आहेत. पूर्वापार चालत आलेली मेहनतीची कामे कमी करून स्मार्ट महिला शेतकरी बनावे, असेही त्यांनी महिलांना आवाहन केले. याप्रसंगी संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी महिलांना कृषी उद्योग आधारित अनेक व्यवसाय सेवा संधीची उदाहरणे देऊन शेतकरी महिलांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याचे आवाहन केले.

डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाच्‍या वतीने कोरोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय विविध ऑनलाईन घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांची माहिती दिली. सहभागी प्रशिक्षणार्थ्‍यी सौ वंदना पाटेकर जालना, अंजुषा कुलकर्णी औरंगाबाद, मोनिका भावसार जळगाव, रूपाली देशमुख ठाणे, लक्ष्मी कोकाटे उस्मानाबाद यांनी या वेबिनार  च्या उपयुक्ततेविषयी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले तर आभार आयोजन सचिव डॉ गोदावरी पवार मानले. प्रशिक्षणात पाचशे जास्‍त महिला, युवती व विद्यार्थी सहभागीझाले होते.