Pages

Saturday, August 15, 2020

कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीतही कृषि विद्यापीठाचे कार्य अविरत चालु आहे ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित ७४ वा स्‍वातंत्र्य दिन साजरा

कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीत ही कृषि विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाचे कार्य अविरत चालु आहे. ऑनलाईन पध्‍दतीने अध्‍यापनाचे कार्य चालु असुन विद्यार्थ्‍यांच्‍या वेळेवर परिक्षा व निकाल लावण्‍यात आले, पुढील सत्राची नोंदणी करण्‍यात आली आहे. जगभरात ऑनलाईन व ऑफलाईन अध्‍यापन व्‍यवस्‍था निर्माण होत आहे. ऑनलाईन पध्‍दती प्रभावी अध्‍यपनाकरिता प्राध्‍यापकांनी स्‍वत:तील कौशल्‍य विकसित करण्‍याचा प्रयत्‍न करावा. काही विद्यार्थ्‍यांना ऑनलाईन पध्‍दतीने अध्‍यायन करणे अशक्‍य असेल तर इतर माध्‍यमातुन त्‍यांच्‍या पर्यंत नोटस व इतर शैक्षणिक साहित्‍य पोहचवावे, त्‍यामुळे त्‍यांच्‍या शिक्षणात कोठेही बाधा येणार नाही याची काळजी घ्‍यावी, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात देशाच्‍या ७४ व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्‍त मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले, यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल , प्राचार्या डॉ जयश्री झेंड, प्राचार्य डॉ उदय खोडके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले की, विद्यापीठाचे विहित संशोधन कार्य कोठेही थांबलेले नाही, ते चालुच आहे. यावर्षी विद्यापीठाने महत्‍वकांक्षी बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठाच्‍या दर्जेदार बियाणास शेतकरी व शेतकरी बियाणे उत्‍पादक कंपन्‍या यांची मोठी मागणी असुन येणा-या खरीप हंगामात पुरेसा प्रमाणात बियाणे उपलब्‍ध करण्‍याचा मानस आहे. यावर्षी बहुउद्देशी बीबीएफ पेरणी यंत्राचे प्रात्‍याक्षिके थेट शेतकरी बांधवाच्‍या १२५ एकर शेतावर पेरणी करून घेण्‍यात आले. तसेच विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स शेतकरी बांधवात मोठी मागणी आहे. कृषि तंत्रज्ञान विस्‍तार करिता ऑनलाईन कार्यशाळा, व्‍याख्‍याने व प्रशिक्षण कार्यक्रमाव्‍दारे विद्यापीठाशी संपुर्ण महाराष्‍ट्रातुन आज लाखो शेतकरी व कृषि विस्‍तारकांशी जोडले गेले आहेत. जागतिक बॅक व आयसीएआर पुरस्कृत विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन पध्‍दतीने विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी, प्राध्‍यापक, संशोधक व‍ विस्‍तार कार्यकर्ते आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय स्‍तरावरील तज्ञांशी जोडला गेला आहे. विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य चालु असुन हरित विद्यापीठाच्‍या दिशेने आपण वाटचाल करत आहोत, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.