वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परोपजीवी
कीटक संशोधन योजना आणि कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ ऑगस्ट
ते २२ ऑगस्ट या दरम्यान गाजर गवताचे जैविक निर्मूलन सप्ताहाचे आयोजन केले आहे. भारतीय
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. अशोक
ढवण यांच्या हस्ते झायगोग्रामा भुंगे गाजर गवतावर सोडून सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर,
शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव श्री.
रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्य डॉ.जयश्री झेंड,
कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड आदींची प्रमुख
उपस्थित होती.
या प्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, झायगोग्रामा भुंग्याद्वारे गाजर गवताचे पर्यावरणाला काहीही हानी न होता आपण गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो आणि या भुंग्याची संख्या नेसर्गिकरित्या वर्षानूवर्षे वाढत राहते. विद्यापीठात उपलब्ध झायगोग्रामा भुंगे शेतकरी बांधवानी नेऊन आपल्या परिसरात व शेतात सोडावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ.अनंत बडगुजर, परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे, श्री. गणेश खरात, श्री. अनुराग खंदारे, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरत्न खंदारे आदींची उपस्थिति होती.
वनामकृविच्या परोपजीवी कीटक संशोधन योजनेत
झायगोग्रामा भुंगे उपलब्ध
विद्यापीठाती परोपजीवी कीटक संशोधन योजनेत झायगोग्रामा भुंगे यांचे संगोपन आणि उत्पादन सुरू आहे. यावर्षी आता पर्यंत २५-३० हजार भुंग्यांची विक्री झाली अजून शेतकर्यांमध्ये या भुंग्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गाजर गवत हे एक परदेशी तण असून याला शास्त्रीय भाषेत पार्थेनियम हिस्टोरियोफोरस असे म्हणतात. हे तणरुपी गवत अॅस्टीयेशी या कुळात मोडते. याला गाजर गवत अथवा पांढरुफुली या स्थानिक नावाने सुध्दा ओळखतात. गाजर गवताचे मुळस्थान उत्तर अमेरिकेतील मेक्सिको असून जगातील इतर देशात या तणाचा प्रसार मेक्सिको पासून झालेला आहे. आपल्या देशात या गवताचा प्रसार मेक्सिको मधून आयात केलेल्या गव्हाच्या धान्यासोबत बियाणे रुपाने झालेला आहे. भारतामध्ये सर्वप्रथम हे गाजरगवत पुणे येथे १९५५ मध्ये आढळून आले. त्यानंतर या तणाचा झपाटयाने सर्वदूर प्रसार झाला. गाजर गवताच्या नियंत्रणासाठी मनुष्यबळ आणि निरनिराळया रासायनिक तणनाशकाचा वापर करण्याची शिफारस असून सुध्दा कायमस्वरुपी नियंत्रण करणे कठीण आहे. कारण रासायनिक तणनाशके ही महागडी असून त्यांचा वापर वारंवार करावा लागत असल्यामुळे खर्चिक बाब होते. तसेच मनुष्यबळाचा वापर करण्यासाठी या गवताच्या विषारीपणामुळे मजूर वर्ग हे तण उपटण्यासाठी टाळाटाळ करतात. शेतकरी किंवा रहिवाशी त्यांच्या शेतातील किंवा घराच्या आसपासचे गाजरगवत उपटून नाश करतात. परंतू सार्वजनिक जागेतील उदा. रेल्वेमार्ग आणि राज्य रस्त्याच्या, बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाच्या परिसरातील, नदीकाठी किंवा शहराच्या मोकळया जागेतील गाजर गवत नष्ट करण्यासाठी ही बाब नागरीक खर्चिक समजून त्यावर खर्च करणे निरर्थक समजतात. अशा परिस्थितीत गाजर गवताचे जौविक नियंत्रण करणेच योग्य आहे. आपल्या देशात या गवतावर उपजिवीका करणा-या निरनिराळया २२ किडीची नोंद झालेली असली तरीही पाने खाणारा झायगोग्रामा भूंगा (झायगोग्रामा बायकोलोरॅटा) हे सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे. त्या अनुषंगाने गाजर गवताच्या नियंत्रणासाठी परोपजीवी कीटक संशोधन योजना, कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे या भूंग्याचे प्रयोगशाळेत मोठया प्रमाणावर गुणन करुन नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याचे काम मागील ब-याच वर्षापासून सुरु आहे.शेतकऱ्यांचाही सदर भुंगे खरेदीस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो मराठवाड्यासोबतच विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी ही मोठ्या प्रमाणात ह्या भुग्यांसाठी मागणी करतात. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठातून घेऊन आपल्या भागात सोडलेले भुंगे सध्या बऱ्याच भागात स्थिरावलेले दिसतात, अशी माहिती परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी दिली.