Pages

Saturday, September 26, 2020

सेंद्रीय पध्दतीने करा पिकांची लागवड ........... शास्त्रज्ञ डॉ. एन. रविशंकर

वनामकृवित आयोजित पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्प व फार्म टु फोर्क, मुबंई यांचे सयुक्‍त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी दिनांक 24 सप्‍टेबर रोजी मोदीपुरम (उत्तर प्रदेश) येथील सेंद्रिय शेती नेटर्वक प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एन. रविशंकर व अकोला येथील डॉ पंजाबाराव देशमुख कृषि विद्यापीठातील विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी बंगलुरू येथील कृषि विद्यापीठाचे माजी संचालक संशोधन डॉ. एम. ए. शंकर होते तर डॉ. वासुदेव नारखेडे, वाशिम येथील प्रगतशील शेतकरी श्री. गोविंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. एम. ए. शंकर म्‍हणाले की, जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, जमिनीचा पोत, पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिंकाना संतुलित अन्नद्रव्याची उपलब्धता होते. सेंद्रिय पदार्थ जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध स्वरुपात आणण्याचे काम करत असून हे एक प्रकारचे जमिनीचे दुधच आहे, ज्यामुळे सुक्ष्मजीवाणू आणि जमिन ही जीवंत राहते, अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमुद केले.

डॉ. एन. रविशंकर यांनी सेंद्रिय पध्दतीने पिकांचे लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, वर्षातुन किमान एक वेळा हिरळवळीचे खत जमिनीत गाडावे, पिकांची लागवड करतांना मिश्र पिक आणि अंतरपिक पध्दतींचा वापर करावा, किंडीचे आणि रोगांचे सेंद्रिय पध्दतीने नियंत्रण करतांना लिंबाच्या पानांचा रस उपयोगात आणावा, शेताच्या बांधावर एरंडीसारखी पिके लावावीत.

डॉ. विनोद खडसे यांनी सेंद्रिय शेतीमध्ये कंपोस्टींगचे महत्व यावर मार्गदर्शन केले. ते म्‍हणाले की, कंपोस्टींगच्या वेगवेगळया पध्दती जसे नॉडेप, मुलस्थानी, परस्थानी, प्राणवायूसहित, प्राणवायूरहित, कुजविणे, सडविणे आदीं शेतकरी बांधवांनी अमलात आणाव्यात. कंपोस्टींग पध्दतीला प्रभावित करणारे घटक उदा. कर्ब : नत्रांचे गुणोत्तर प्रमाण, आर्द्रता, हवेचे प्रमाण, खडयांचा आकार, तापमान, सामु इत्यादीचे महत्व त्यांनी सांगितले.

प्रगतशील शेतकरी श्री. गोविंद देशमुख यांनी त्यांचे अनुभव कथन केले तर डॉ. वासुदेव नारखेडे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे सुत्रसंचालन डॉ ज्योती गायकवाड यांनी केले. सदरिल ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात मोठया संख्‍येने शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी युवक, युवती, विद्यार्थी, उद्योजक सहभागी झाले आहेत.