Pages

Wednesday, September 30, 2020

बदनापुर (जालना) येथील कृषि विज्ञान केंद्राच्‍या वतीने राष्ट्रीय पोषण महिना निमित्‍त ऑनलाईन महिला प्रशिक्षण संपन्‍न

सोयाबीन हे प्रथिने व उर्जा या पोषक घटकाचे उत्तम सत्रोत.... डॉ. डी. बी. देवसरकर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या बदनापुर येथील कृषी विज्ञान केंद्राच्‍या वतीने राष्ट्रीय पोषण महिना निमित सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती व त्याची पोषण मुल्येया विषयावर जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून दिनांक २९ स्पटेंबर रोजी एक दिवसीये ऑनलाईन पद्धतीने महिला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर हे होते तर प्रमुख व्‍यक्‍त्‍या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या डॉ. स्मिता खोडके, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय मार्गदर्शनात डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, सोयाबीन हे प्रथिने, उर्जा व स्निग्ध पदार्थ यांचे उत्तम स्‍त्रोत आहे. सोयाबीनमधील प्रथिने इतर अन्नपदार्थच्या (वनस्पतीजन्य) तुलनेत जास्त चांगल्या प्रतीची असतात. यामुळे सोयाबीन मधील प्रथिनांची तुलना प्राणीज पदार्थातील प्रथिनांसोबत जसे की अंडी, मांस यांच्या बरोबरीने असते. स्निग्ध पदार्थाचे भरपूर प्रमाण असलेले एकमेव कडधान्य (गळीत धान्याच्या बरोबरीने) म्हणुन याची गणना करण्यात येते.

तांत्रिक सत्रात डॉ. स्मिता खोडके यांनी सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग निर्मिती यावर मार्गदर्शन केले तर सोयाबीन पोषण मुल्ये व त्या पासून विविध पदार्थ निर्मिती यावर विषय विशेषज्ञ (गृह विज्ञान) डॉ. साधना उमरीकरयांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिला शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन हि केले. यावेळी डॉ. एस. डी. उमरीकर, डॉ एस. डी. सोमवंशी, डॉ. आर. एल. कदम  व डॉ. डी. आर. कांबळे द्वारे लिखित  समतोल आहार व पोषक थाळीयावरील घडीपत्रिकेचे विमोचन मान्‍यवरांनी केले.

प्रास्ताविक डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल कदम यांनी केले. कार्यक्रमास राज्‍यातून शेतकरी महिला, लघु उद्योजक व अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.