Pages

Sunday, February 21, 2021

मौजे मांडाखळी (ता परभणी) ज्वारीच्या आद्यरेषीय पीक प्रात्याक्षिक पाहणी कार्यक्रम संपन्न‍

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्‍वार संशोधन केंद्रातर्फे अखिल भारतीय समन्‍वयीत प्रकल्‍पांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे मांडाखळी येथील शेतकरी श्री कल्‍याण लोहट यांच्‍या शेतावरील ज्‍वारीच्‍या आद्यरेषीय पीक प्रात्‍यक्षिक कार्यक्रमाचे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गावातील ज्‍येष्‍ट नागरीक श्री मुरलीधर लोहट हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर हे प्रमुख पाहुणे म्‍हणुन उपस्थित होते. ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे, विस्‍तार कृ‍षीविद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे, डॉ एल एन जावळे, डॉ ईलियास खान, डॉ मदन पेंडके, डॉ विक्रम घोळवे, श्री कल्‍याण लोहट, श्री शिरीष लोहट, श्री सचिन शिराळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, पोषण मुल्‍याच्‍या दृष्‍टीने आहारात ज्‍वारीच्‍या भाकरीचे महत्‍व सर्वांना कळले आहे. इक्रिसॅटच्‍या सहकार्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित परभणी शक्‍ती या ज्‍वारीच्‍या वाणात लोह व जस्‍त या घटकांचे प्रमाण अधिक आहे. हा वाण खरीप, रब्‍बी, व उन्‍हाळी अशा तीनही हंगामात पेरणीसाठी उपयुक्‍त असुन यापासुन खाण्‍यासाठी ज्‍वारी व चनावरासाठी कडबा उत्‍पादन मिळते. ज्‍वारीच्‍या मुल्‍यवर्धन करून विक्री केल्‍यास शेतकरी बांधवाना अधिक आर्थिक लाभ मिळु शकतो, या करिता शेतकरी उत्‍पादक कंपन्‍यांनी पुढाकार घ्‍यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

यावेळी शेतकरी श्रीकल्‍याण लोहट यांच्‍या शेतातील ज्‍वारीच्‍या पिक प्रात्‍यक्षिकांची पाहणी करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ के आर कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन ज्‍वार कृषीविद्यावेत्‍ता डॉ जी एम कोटे यांनी केले तर आभार श्री सचिन लोहट यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी उपस्थित होते.