Pages

Sunday, March 21, 2021

ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

सेंद्रीय शेतीमध्ये स्थानिक निविष्‍ठाचा वापर करणे गरजेचे ..... डॉ. अे. एस. राजपुत

नागपूर येथील क्षेत्रीय जैविक शेती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि हैद्राबाद येथील शाश्वत शेती केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान सात दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे करण्‍यात आले होते, प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम दिनांक २१ मार्च संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी जबलपूर येथील सेंद्रीय शेती प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. अे. एस. राजपुत हे होते तर प्रमुख पाहूणे म्‍हणुन गाझियाबाद येथील राष्‍ट्रीय सेंद्रीय शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, नागपुर येथील विभागीय सेंद्रीयशेती केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ वाचस्‍पती, प्रमुख अन्वेषक डॉ आनंद गोरे, डॉ जी व्‍ही रमणजानेयुलु आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. अे. एस. राजपुत म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये स्थानिक निविष्‍ठाचा वापर करणे गरजेचे आहे. करोना रोगाच्‍या प्रार्दुभाव परिस्थीतीत सेंद्रीय उत्पादन विक्रिमध्ये ३० ते ३५ टक्के वाढ झाली असून भारत आशियामध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलो आहे तर जगामध्ये आठव्‍या स्थानावरुन पाचव्या स्थानावर पोहोचलो असुन ही बाब सेंद्रीय शेतीकरिता महत्वाची आहे. तर प्रमुख पाहुणे डॉ. गगनेश शर्मा म्‍हणाले की, जमीन सजीव ठेवण्‍याकरिता सेंद्रीय शेतीची कास धरावी लागेल. शेतकरी बांधवानी केवळ सेंद्रीय शेती करू नये तर सेंद्रीय शेतमाल विक्रीचे ज्ञान अवगत करावे, सेंद्रीय शेतमाल प्रक्रिया करून उद्योजक बनावे

मार्गदर्शनात डॉ. के. एस. बेग म्‍हणाले की, जैविक शेती केल्यामुळे जमिनीची उपजाऊ क्षमता वाढते. सेंद्रीय शेतमाला मोठी मागणी असुन सेंद्रीय मालास बाजारपेठ सुविधा विकसित कराव्‍या लागतील. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. प्रविण कापसे यांनी तर आभार डॉ. जी. व्ही. रामानजनेयुलु यांनी मानले.

सदरिल प्रशिक्षण वनामकृविचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण, गाझीयाबाद येथील राष्ट्रीय जैविक शेती केंद्राचे संचालक डॉ. गगनेश शर्मा व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षणात  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्‍यातील तरुण शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला तसेच ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबियातील भारतीय युवकांनी सहभागी घेतला. प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पेरणी, वाण, लागवडीच्या पध्दती, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण व सेंद्रीय मालाची प्रक्रिया इत्यादी विषयावर देशातील नामांकित संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, आयसीएआर संस्थामधील तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी चंद्रकला, व्हिन्यासा, अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्रीधर पतंगे, सतिश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.